बनावट नोटा प्रकरण: मौजमजा करण्यासाठी थेट नोटांचा छापखानाच सुरू केला, साडेतीन लाखांच्या नोटा छापल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:45 AM2024-04-11T11:45:04+5:302024-04-11T11:45:50+5:30

इचलकरंजीतही बनावट नोटा

Fake notes case: Live currency printing press started for fun, printed 3.5 lakh notes | बनावट नोटा प्रकरण: मौजमजा करण्यासाठी थेट नोटांचा छापखानाच सुरू केला, साडेतीन लाखांच्या नोटा छापल्या

बनावट नोटा प्रकरण: मौजमजा करण्यासाठी थेट नोटांचा छापखानाच सुरू केला, साडेतीन लाखांच्या नोटा छापल्या

कोल्हापूर : मौजमजा करण्यासाठी सहज पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी शिकल्या-सवरलेल्या तरुणांनी थेट नोटांचा छापखानाच सुरू केला. १० हजार रुपयांच्या बदल्यात २५ हजारांच्या बनावट नोटा देऊन ते कमाई करीत होते. साडेतीन लाखांच्या नोटा छापल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली आहे. मात्र, नोटांनी भरलेली बॅग पुण्यातील मुळा नदीत फेकल्याचे ते सांगत आहेत. पहिल्याच प्रयत्नांत पोलिसांच्या हाती लागल्याचे ते सांगत असले तरी त्यांनी गेल्या चार महिन्यांत लाखो रुपयांच्या बनावट नोटा खपविल्याचा पोलिसांना संशय आहे.

शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात एकत्र आलेल्या मित्रांना खर्चासाठी घरातून मोजकेच पैसे मिळत नव्हते. पैशांची गरज भागविण्यासाठी त्यांनी शक्कल लढविली आणि थेट बनावट नोटा छापण्याचा निर्णय घेतला. सिव्हिल इंजिनिअर केतन थोरात-पाटील हा टोळीचा म्होरक्या बनला. मलकापुरातील (ता. कराड) डिझाइन आर्टिस्ट रोहन मुळे याला हाताशी धरले. नोटांचे डिझाइन तयार करण्यापासून ते छपाई करण्यापर्यंतची जबाबदारी त्याच्याकडे दिली. त्याने कामातील कौशल्य पणाला लावून काले (ता. कराड) येथे एका घरात हुबेहूब नोटांची छपाई केली.

त्या नोटा खपविण्यासाठी केतन याने इंदापुरातील मित्र अजिंक्य चव्हाण आणि काले (ता. कराड) येथील मित्र आकाश पाटील यांना सोबत घेतले. खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा घेणाऱ्या गरजूंचा शोध घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. त्यांनी १० हजारांच्या बदल्यात २५ हजारांच्या बनावट नोटा गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील रोहन सूर्यवंशी याच्याकडे खपविल्या. अशा पद्धतीने त्यांनी अनेकांना बनावट नोटा विकल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.

नदीत नोटांची विल्हेवाट ?

पुणे येथे गेल्या महिन्यात बनावट नोटा छापणारी एक टोळी पुणे पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानंतर आपलेही बिंग फुटेल या भीतीने केतन थोरात-पाटील याने साडेतीन लाखांच्या बनावट नोटांची विल्हेवाट लावण्यास मित्राला सांगितले. त्यानुसार आकाश पाटील याने बनावट नोटांची बॅग पुण्यात मुळा नदीच्या पात्रात टाकल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी नदीपात्रात तीन तास शोध घेतला. मात्र, त्यांना बॅग सापडली नाही.

पोलिसांनी दबाव झुगारला

बनावट नोटांच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तातडीने आणि सखोल तपास करण्याच्या सूचना शाहूपुरी पोलिसांना दिल्या होत्या. कुंदन पुजारी या खासगी सावकार पुत्राचे नाव गुन्ह्यात येताच त्याला वाचविण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी पोलिसांवर दबाव वाढविला. मात्र, पोलिस अधीक्षक कारवाईवर ठाम राहिल्याने रॅकेटचा भांडाफोड झाला.

इचलकरंजीतही बनावट नोटा

इचलकरंजीत एका बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये पाच हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. शाहूपुरी पोलिसांनी पकडलेल्या संशयितांमार्फतच इचलकरंजीतही बनावट नोटा गेल्या आहेत काय ? याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Fake notes case: Live currency printing press started for fun, printed 3.5 lakh notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.