बफर स्टॉकबरोबर निर्यात अनुदान देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 01:14 AM2018-01-03T01:14:32+5:302018-01-03T01:14:36+5:30

Export grant with buffer stocks | बफर स्टॉकबरोबर निर्यात अनुदान देणार

बफर स्टॉकबरोबर निर्यात अनुदान देणार

Next


कोल्हापूर : अतिरिक्त साखरेला प्रोत्साहनपर निर्यात अनुदान देऊच; पण त्याबरोबर केंद्र सरकार साखरेचा बफर स्टॉक करील, असे आश्वासन केंद्रीय व्यापार व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी दिल्लीत मंत्री प्रभूंची भेट घेऊन साखरेच्या घसरलेल्या दराबाबतची वस्तुस्थिती सांगितली.
गेल्या महिन्याभरात साखरेच्या दरात कमालीची घसरण झाली असून, प्रतिकिलो पाच रुपयांनी दर खाली आल्याने साखर कारखानदार अडचणीत सापडले आहेत. शेतकºयांना एफआरपी देण्यासाठी कारखानदारांकडे पैसे नाहीत, साखरेचे दर सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, या मागणीसाठी रविवारी (दि. ३१ डिसेंबर) संजय मंडलिक, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रकाश आवाडे यांनी खासदार शेट्टी यांची भेट घेतली होती. त्यानुसार मंगळवारी शेट्टी यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री प्रभू यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. सट्टाबाजारात तसेच काही व्यापाºयांकडून साखरेचे दर पाडले जात आहेत. याला केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे.
साखर कारखानदारी आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी तातडीने ४० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करावा. त्याचबरोबर निर्यात अनुदान देऊन निर्यातीसाठी कारखानदारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मागील सरकारच्या काळात ज्या पद्धतीने निर्यात अनुदान दिले त्याप्रमाणे यावेळीही अनुदान दिले जाईल, असे आश्वासन मंत्री प्रभू यांनी दिले. त्याचबरोबर बफर स्टॉक करण्याबाबत त्वरित उपाययोजना राबविण्याच्या सूचना प्रभू यांनी केंद्रीय वाणिज्य सचिव रिता देवतिया यांना केल्या.
पाकिस्तानमधून आयात कशासाठी?
देशात साखरेचे उत्पादन वाढले म्हणायचे आणि दुसºया बाजूला पाकिस्तानमधून दोन हजार टन साखर आयात करण्यात आली. पाकिस्तानातून आयात कशी केली? असा सवाल शेट्टी यांनी केला. त्यावर संबंधित आयातीची चौकशी करण्याचे आश्वासन मंत्री प्रभू यांनी दिले.

Web Title: Export grant with buffer stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.