वैचारिक पातळी गमावलेल्या निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:22 AM2019-04-16T00:22:20+5:302019-04-16T00:22:25+5:30

सांगरूळ (ता. करवीर) हे माझे मूळ गाव आहे. कुंभी-कासारी साखर कारखान्याचे कॅशिअर म्हणून काम केले. सहकारमहर्षी मारुतराव खाडे यांच्यामुळे ...

Elections lost to the ideological level | वैचारिक पातळी गमावलेल्या निवडणुका

वैचारिक पातळी गमावलेल्या निवडणुका

Next

सांगरूळ (ता. करवीर) हे माझे मूळ गाव आहे. कुंभी-कासारी साखर कारखान्याचे कॅशिअर म्हणून काम केले. सहकारमहर्षी मारुतराव खाडे यांच्यामुळे सरपंच व विकास संस्थेचे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मारुतराव खाडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक निवडणुका अगदी जवळून पाहिल्या. त्यातील, सन १९७८ला सांगरूळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आठवणीत राहण्यासारखी होती. कॉँग्रेसच्या फुटीनंतर एस कॉँग्रेसतर्फे श्रीपतराव बोंद्रे, राष्टÑीय कॉँग्रेसकडून मारुतराव खाडे तर ‘शेकाप’कडून गोविंदराव कलिकते उभे होते. तत्कालीन राजकारणातील हे तीन दिग्गज एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे असले तरी प्रचारात ईर्ष्या असायची पण द्वेष नसायचा, तिन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या उमेदवारांच्या विजयासाठी जिवाचे रान केले होते. मारुतराव खाडे यांची प्रचारयंत्रणा जरा वेगळी होती. सांगरूळसह बारा वाड्यांतील लोकं सकाळी उठून स्वत:च्या घरातून भाकरी बांधून प्रचारात सक्रिय व्हायचे. प्रचारासाठी आलिशान गाड्यांसह इतर सुविधा नव्हत्या. उलट मतदारसंघातील लोकांनीच खाडे यांना वर्गणी गोळा करून खर्चासाठी पैसे दिले होते. त्यामुळे त्यांच्याकडून प्रचारासाठी पैसे मागून घेण्याचा प्रश्नच नव्हता. ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी मिळेल त्या वाहनांतून गावोगावी जायचे आणि प्रचार करायचा. पार्टीतील महत्त्वाची भूमिका बजावणारे आठ-दहाजण तर पंधरा-पंधरा दिवस त्या-त्या भागातच तळ ठोकत होते. तेथेच कार्यकर्त्यांच्या घरात जेवायचे आणि त्या परिसरात प्रचार करत. उमेदवार त्या भागात प्रचारास गेला की मग त्यांची भेट व्हायची, या भागात कोणाला दुरूस्त करावे लागेल. याचा अहवाल दिला जायचा. त्या रात्री बसूनच पुढची रणनीती ठरवली जायची. एक-एक कार्यकर्ता तर निवडणूक संपेपर्यंत घराचे तोंड बघत नव्हते, इतकी निष्ठा नेत्यांवर असायची. तिन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते प्रचारानिमित्त एकत्र यायचे पण कोणत्याही प्रकारचा वाद-विवाद नसायचा. उलट ‘तुम्ही जोरात हाय, आमची काय डाळ शिजतीय’ असे बोलून वातावरण खेळीमेळीचे व्हायचे. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली तरी कुठेही संघर्ष झाला नाही. दुसऱ्या दिवशी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये मतमोजणी होती. काट्याची टक्कर असल्याने उमेदवारांसह मतमोजणी प्रतिनिधींवर कमालीचा तणाव होता. यामध्ये श्रीपतराव बोंद्रे हे थोड्या मतांनी विजयी झाले पण उमेदवारांनी खेळीमेळीत एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या.
या निवडणुका कोठे आणि आताच्या कुठे? आज निष्ठा म्हणजे काय असते? हे सांगण्याची वेळ आली आहे. त्याला एकटे कार्यकर्तेच जबाबदार आहेत, असे नाही, तर नेतेही तितकेच जबाबदार आहेत. प्रत्येक निवडणुकीत दडपशाहीचे राजकारण करायचे, येनकेन प्रकारे आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे. हे टार्गेट ठेवून द्वेषाचे राजकारण सुरू आहे. परिणामी, खुल्या वातावरणात निवडणुका होत नाहीतच पण वैचारिक पातळी गमावलेल्या निवडणुकांमुळे लोकशाही जिवंत राहील का? हा तुमच्या-आमच्या समोरील खरा प्रश्न आहे.
आनंदराव कासोटे, माजी सरपंच, सांगरूळ

Web Title: Elections lost to the ideological level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.