आठ बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2016 12:30 AM2016-09-20T00:30:12+5:302016-09-20T00:42:06+5:30

जिल्ह्यात दिवसभर उघडझाप : गगनबावड्यात दमदार पाऊस

Eight Bunds Under Water | आठ बंधारे पाण्याखाली

आठ बंधारे पाण्याखाली

Next

कोल्हापूर : जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली असून, सोमवारी दिवसभर उघडझाप राहिली. गगनबावडा तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, विविध नद्यांवरील आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
खरीप पिकाला सध्या दमदार पावसाची गरज आहे. गेले तीन-चार दिवस परतीच्या पावसाने हजेरी लावली असली तरी गगनबावडा वगळता इतरत्र अद्याप दमदार एंट्री झालेली नाही. करवीर, हातकणंगले, कागल, शिरोळ तालुक्यांत एक-दोन मोठ्या सरींचा अपवाद वगळता केवळ भुरभुर सुरू आहे. पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस आहे. कोल्हापूर शहरात सकाळी रिपरिप सुरू होती; पण दुपारनंतर ऊन पडले. सायंकाळनंतर पुन्हा रिपरिप सुरू झाली.
सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०.९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ५३.५० मिलिमीटर झाला आहे. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने विसर्ग वाढला आहे.
राधानगरीतून प्रतिसेकंद २२००, वारणातून ५५८०, कासारीतून २५०, कडवीतून ३२२, तर कुंभी धरणातून १०७५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना फुग आली आहे. पंचगंगा नदीची पातळी २१ फुटांच्या वर गेली असून, आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. (प्रतिनिधी)

शेतकरी गाफील : विद्युत पंप पाण्यावर !

Web Title: Eight Bunds Under Water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.