महापालिका बरखास्तच करा

By admin | Published: June 24, 2015 12:01 AM2015-06-24T00:01:09+5:302015-06-24T00:46:39+5:30

शरद पाटील : हद्दवाढीस जनता दलाचा विरोध; कुपवाडचा विकास ठप्पच

Dismiss the municipality | महापालिका बरखास्तच करा

महापालिका बरखास्तच करा

Next

सांगली : महापालिका स्थापन होऊन १७ वर्षांचा कालावधी लोटला तरी, अद्याप कुपवाड, वानलेसवाडीचा कोणताही विकास होऊ शकलेला नाही. त्यामुळे नव्या गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्यास आमचा विरोध आहे. याउलट ही महापालिकाच बरखास्त करावी, अशी मागणी आम्ही राज्य शासनाकडे करणार आहोत, अशी माहिती जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, महापालिकेच्या बहुसंख्य वस्त्या अजूनही अविकसित आहेत. कुपवाड व वानलेसवाडी या दोन्ही गावांतील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अनेक रस्ते अद्याप खराब आहेत. सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था नाही. पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे. याठिकाणच्या शाळा अजूनही जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जातात. कुपवाड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय गेली पाच वर्षे अपूर्ण अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत माधवनगर, धामणी, अंकली, हरिपूर या गावांचा समावेश महापालिका हद्दीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामागचा उद्देश कळालेला नाही. सध्याच्या महापालिका क्षेत्रातच सुविधा न देऊ शकणाऱ्या या संस्थेने अन्य गावांच्या समावेशाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू नये. संबंधित गावांच्या संमतीशिवाय महापालिकेने याबाबत कोणतेही पाऊल उचलू नये.
महाआघाडीच्या कारभारावर लोकांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला. त्यांच्याकडून अपेक्षाभंग झालेला आहे. त्यामुळे ही पालिकाच बरखास्त करावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत. त्यासाठी चळवळही उभारण्यात येईल. (प्रतिनिधी)


कर्नाटकसारखी भूमिका हवी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ४२ गावांच्या प्रश्नाबाबत शरद पाटील म्हणाले की, कर्नाटकातील सीमाभागातील काही गावांनी ज्यावेळी पाणी व अन्य सुविधांसाठी महाराष्ट्रात येण्याचा इशारा दिला होता, त्यावेळी कर्नाटक सरकारने तातडीने अडीचशे कोटी रुपये मंजूर करून या गावांतील सर्व प्रश्न सोडविले होते. ही गावे आता सुविधांबाबत सक्षम आहेत. महाराष्ट्र सरकारनेही या गावांची भावना समजून घेऊन तातडीने त्यांच्यासाठी निधीची तरतूद करून सुविधा पुरविल्या पाहिजेत. या गावांतील लोकांशी आम्ही प्रत्यक्ष भेटून संवाद साधणार आहोत. त्यांच्यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करू.
शेतकऱ्यांच्या पेन्शनप्रश्नी जनता दलाच्यावतीने २८ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Dismiss the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.