वसुलीसाठी संचालकांनीच आता पुढाकार घ्यावा

By admin | Published: January 30, 2015 12:49 AM2015-01-30T00:49:31+5:302015-01-30T00:52:21+5:30

थकीत संस्था कार्यकर्त्यांच्याच : व्याज सूटसाठी शासनाकडे प्रयत्न गरजेचे

Directors should now take the initiative to recover | वसुलीसाठी संचालकांनीच आता पुढाकार घ्यावा

वसुलीसाठी संचालकांनीच आता पुढाकार घ्यावा

Next

राजाराम लोंढे - कोल्हापूर - जिल्हा बँकेच्या जबाबदारी निश्चितीच्या कारवाईतून वाचण्यासाठी थकीत संस्थांकडील वसुलीबाबत माजी संचालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. विना व अपुऱ्या तारणाने कर्जवाटप केलेल्या संस्था या संचालकांशी संबंधित अथवा त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या असल्याने वसुलीसाठी त्यांना फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. व्याजाने या रकमा फुगल्या असल्या तरी
व्याज सूटसाठी शासनाकडे प्रयत्न करून ही रक्कम कमी करून घेता येऊ शकते.
बॅँकेच्या चौकशीत २८ संस्थांकडील कर्ज हे असुरक्षित कर्ज म्हणून स्पष्ट झाले. या संस्था पाहिल्या तर बहुतांश माजी संचालकांच्या, तर काही त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. शेतकरी सहकारी तंबाखू खरेदी-विक्री संघ, मयूर सहकारी वाहतूक संस्था, महाराष्ट्र स्टेट टोबॅको फेडरेशन, एस. के. पाटील को-आॅप. बॅँक, उदयसिंगराव गायकवाड सहकारी ऊसतोडणी संस्था, कोल्हापूर जिल्हा खरेदी-विक्री संघ, विजयमाला देसाई ऊसतोडणी वाहतूक पूरक व्यवसाय संस्था, भोगावती शेतकरी कुक्कुटपालन संस्था अशा संस्था थेट संचालकांशी संबंधित आहेत; तर उर्वरित संस्था या जवळच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. या संस्थांना कर्ज देण्यासाठी संचालकांनीच शिफारस केलेली आहे. कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी संचालकांनी नियम डावलून कर्जवाटप केले; पण आता संचालकांच्या गळ्याला फास लागल्याने त्या संस्थाचालकांनीही सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. संचालकांनी संबंधित संस्थांच्या संचालकांची भेट घेऊन कर्ज भरण्याची विनंती केली, तर बऱ्यापैकी मार्ग निघू शकतो. संचालकांनी थेट संबंधित संस्थाचालकांची भेट घेऊन कर्ज भरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. व्याजाने कर्जाच्या रकमा फुगल्या आहेत. एन. पी. ए.मध्ये गेल्यापासून त्यावरील व्याज आकारणी बंद झाली आहे. त्यामुळे शासनाकडे सामूहिक प्रयत्न करून, व्याजात थोडी सवलत घेऊन कर्ज भरण्याची तयारी संस्थांनी दाखविली पाहिजे. (समाप्त)

वाटायला संचालक, मार खायला कर्मचारी !
संचालकांनी आपल्या राजकीय सोयीसाठी विनातारण व कागदावरील संस्थांना कर्जपुरवठा करायचा आणि त्याच्या वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी डोकी फोडून घ्यायची का? ‘दौलत’सह अनेक संस्थांच्या कर्जवसुलीवरून कर्मचाऱ्यांवर हल्ले झालेले आहेत. त्यामुळे ज्यांनी कर्ज दिले त्यांनाच चांगल्या प्रकारे त्याची वसुलीही करता येईल, असा कर्मचाऱ्यांमधून सूर आहे.

Web Title: Directors should now take the initiative to recover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.