गणेश विसर्जनावेळी पाटील-महाडिक समर्थकांत घोषणायुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:46 AM2018-09-18T00:46:09+5:302018-09-18T00:46:13+5:30

Declaration war between Patil and Mahadik supporters during Ganesh immersion | गणेश विसर्जनावेळी पाटील-महाडिक समर्थकांत घोषणायुद्ध

गणेश विसर्जनावेळी पाटील-महाडिक समर्थकांत घोषणायुद्ध

Next

कळंबा : माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी नुकत्याच आमदार सतेज पाटील यांच्या घरी दिलेल्या भेटीने व शिवाजी चौकातील उद्घाटनप्रसंगी केलेल्या तडाखेबाज भाषणाने एकीकडे ‘गोकुळ’च्या आगामी वार्षिक सभेसह विधानसभा व लोकसभा निवडणुकीचे वातावरण जिल्ह्यात चांगलेच तापले आहे. सोमवारी कळंबा तलावावर या संघर्षाची प्रचिती आमदार सतेज पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांना आली. सोमवारी गणेश विसर्जननिमित्ताने आमदार सतेज पाटील व शौमिका महाडिक एकाच वेळी सायंकाळी सहा वाजता कळंबा तलावातील गणेश विसर्जन काहिलीनजीक एकमेकांसमोर कार्यकर्त्यांसह उभे ठाकले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
सतेज पाटील यांच्यासोबत यावेळी कळंबाचे सरपंच सागर भोगम, ग्रामपंचायत सदस्य, विविध तालमींचे कार्यकर्ते उपस्थित होते, तर शौमिका महाडिक यांच्यासोबत पाचगावच्या जि. प. सदस्या मनीषा टोणपे यांचे पती प्रकाश टोणपे व महाडिक, भाजप गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विसर्जनस्थळी कार्यकर्त्यांनी केलेल्या जोरदार ‘मोरया’च्या घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला. यावेळी आमदार सतेज पाटील व शौमिका महाडिक कार्यकर्त्यांच्या अचानक घोषणाबाजीने अचंबित झाले. दक्षिणेतील कार्यकर्त्यांमधील राजकीय ईर्षा दोघांनाही यावेळी अनुभवण्यास मिळाली. एकमेकांकडे पाहणे टाळत दोघेही कार्यकर्त्यांमधील ईर्षा निमूटपणे पाहत राहिले. काहीकाळ कार्यकर्त्यांसोबत थांबून पहिल्यांदा शौमिका महाडिक पुढे मार्गस्थ झाल्या, तर आमदार सतेज पाटील कळंबा तलावाची पाहणी करत नागरिकांसोबत सेल्फी काढत विविध मंडळांनी आयोजित केलेल्या प्रसादाचे वाटप करीत कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधत पुढे मार्गस्थ झाले.
तत्पूर्वी, सकाळी अकरा वाजता आमदार अमल महाडिक यांनी कळंबा तलावावर गणेश विसर्जनस्थळी भेट देत नागरिकांना मूर्ती व निर्माल्य दान करण्याचे आवाहन केले. एकंदरीत सोमवारी कळंबा तलावावर दक्षिणचा राजकीय सारीपाट कार्यकर्त्यांसह नागरिकांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनुभवास आला.

Web Title: Declaration war between Patil and Mahadik supporters during Ganesh immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.