मोकाट कुत्री रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न हवेत : उपनगरातही प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:20 AM2018-07-11T01:20:40+5:302018-07-11T01:21:41+5:30

 Collective efforts should be made to stop the slaughter of dogs: In the suburbs the questions are serious | मोकाट कुत्री रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न हवेत : उपनगरातही प्रश्न गंभीर

मोकाट कुत्री रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न हवेत : उपनगरातही प्रश्न गंभीर

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिका, ग्रामपंचायतींनी एकाचवेळी मोहीम राबवायला हवी

चंद्रकांत कित्तुरे ।
कोल्हापूर : मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा केवळ कोल्हापूर शहराचा नाही. शहरालगत असलेल्या उपनगरातही तो तितकाच गंभीर आहे. महापालिकेसह शहरालगतच्या ग्रामपंचायती, जिल्ह्यातील नगरपालिका यांनी एकाचवेळी मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम राबविली, तरच त्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसू शकेल.
शिरोलीत गेल्या आठवड्यात एकाच दिवशी मोकाट कुत्र्याने २७ जणांचा चावा घेतल्याने शहरालगतच्या गावांतही हा प्रश्न तितकाच गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाचगाव, कळंबा, उचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, बालिंगे, शिंगणापूर ही गावे जणू कोल्हापूर शहराचाच भाग बनली आहेत. त्यामुळे तेथील कुत्री महापालिका हद्दीत आणि महापालिका हद्दीतील कुत्री ग्रामपंचायत हद्दीत फिरत असतात. त्यामुळे केवळ
महापालिकेनेच कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम राबवून म्हणावे तसे यश येणार नाही. कारण लगतच्या गावांतील कुत्र्यांमुळे ही संख्या वाढतच जाणार आणि प्रश्न कायम राहणार आहे. यामुळे महापालिकेने ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन प्रसंगी मदतीचा हात देऊन एकाचवेळी ही मोहीम राबविणे आवश्यक आहे. (क्रमश:)

इचलकरंजीत हजार कुत्र्यांची नसबंदी
तीन महिन्यांपूर्वी इचलकरंजीतही मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला होता. नागरिकांतून संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर तेथील नगरपालिकेने या शहरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला. शहरात किती कुत्री असतील याचा नेमका आकडा नसला तरी अंदाजे चार हजार कुत्री असतील, असे गृहीत धरून यातील २००० कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील अरिहंत अ‍ॅनिमल्स वेलफेअर संस्थेला सुमारे ३० लाख रुपयांचे टेंडर देण्यात आले. या संस्थेने गेल्या अडीच-तीन महिन्यात एक हजारांवर कुत्र्यांची नसबंदी केली आहे. येत्या तीन महिन्यांत उर्वरित कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. एखादा प्रश्न युद्धपातळीवर सोडविण्याचा प्रयत्न इचलकरंजीसारखी नगरपालिका करू शकते; मग कोल्हापूर महापालिकेला काय अडचण आहे, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जाऊ लागला आहे.

जयसिंंगपुरात कुत्री पकडण्याची मोहीम
जून महिन्यात जयसिंगपूर शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला होता. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात काहीजण जखमी झाल्यानंतर जयसिंगपूर नगरपालिकेने मोकाट कुत्र्यांना पकडून लांब नेऊन सोडण्याचा ठेका देण्यात आला आहे. तसेच मोकाट कुत्र्यांवर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. येथील ठेकेदाराने २२ जूनपासून कुत्री पकडण्याची मोहीम सुरू केली. आतापर्यंत सुमारे साडेचारशे कुत्री पकडून ती शंभर-दीडशे किलोमिटर अंतरावर नेऊन सोडली आहेत. मात्र, यातील काही कुत्री पुन्हा शहरात दिसू लागल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. त्यामुळे कुत्र्यांना लांब नेऊन सोडण्यापेक्षा त्यांची नसबंदी करणे हाच चांगला पर्याय आहे.

कुत्र्यांना वैतागलाय...तर मग लिहा...
मोकाट कुत्र्यांना तुम्हालाही कधीतरी तोंड द्याव लागले असेल.. तुमचा चावा घेतला असेल अगर अपघात घडवला असेल.. ज्याची आठवण झाली की अजूनही भीती वाटते, संताप होतो. हे कुणाला तरी सांगावसं वाटतं, उपाय सुचवावेसे वाटतात.. तर मग करा आपलं मन मोकळं... लिहा आपल्या भावना, मते आणि पाठवा आमच्याकडे... (शब्दमर्यादा २०० ) आमचा पत्ता- लोकमत भवन, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर, व्हॉटसअ‍ॅप नं.- ८९७५७५५७५४, koldesk@gmail.com

Web Title:  Collective efforts should be made to stop the slaughter of dogs: In the suburbs the questions are serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.