सर्व्हायकल कॅन्सरची खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:07 PM2019-05-22T23:07:49+5:302019-05-22T23:07:54+5:30

डॉ. भारती अभ्यंकर आतापर्यंत आपण सर्व्हायकल कॅन्सरविषयी जाणून घेतले. १) शरीरातील एकमेव कॅन्सर जो होऊ नये म्हणून लस उपलब्ध. ...

Caution of Cervical Cancer | सर्व्हायकल कॅन्सरची खबरदारी

सर्व्हायकल कॅन्सरची खबरदारी

Next

डॉ. भारती अभ्यंकर

आतापर्यंत आपण सर्व्हायकल कॅन्सरविषयी जाणून घेतले.
१) शरीरातील एकमेव कॅन्सर जो होऊ नये म्हणून लस उपलब्ध. २) हा कॅन्सर एच.पी.व्ही. या व्हायरसमुळे होतो. ३) हा होण्यापूर्वीच्या अवस्थेत याचे निदान होते व पिशवी न काढता, थोडासा भाग काढून टाकता येतो.
आता जाणून घेऊया याविषयीची जागरुकता किंवा यासाठी कराव्या लागणाऱ्या तपासणी पद्धतीविषयी. आजार होण्यापूर्वीच तो टाळणे हे केव्हाही हितकारकच ना? तर हा सर्व्हायकल कॅन्सर होऊ नये म्हणून एक प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे.
सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिन :
आपण बघितले की, ही व्याधी शरीर संभोगाद्वारे होणाºया जंतुसंसर्गामुळे होते. त्यामुळे शरीर संभोगाला सुरुवात होण्यापूर्वीच्या अवस्थेतच ही लस दिली गेली, तर या जीवघेण्या आजारापासून सुटका होऊ शकते. त्यामुळे ही लस मुलगी वयात आल्याबरोबर देणे फायदेशीर ठरते. वयाच्या बाराव्या वर्षांपासून ते सव्वीस वर्षांपर्यंत ही लस दिली जाते. या लसीचे तीन डोस घ्यावे लागतात; परंतु नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे की, वयाच्या पंधराव्या वर्षांपूर्वी ही लस वापरली तर केवळ दोन डोस पुरेसे ठरतात. सर्व्हायकल कॅन्सर हा ज्या धोकादायक प्रजातींमुळे होतो. उदा. - १६, १८ हे विषाणू प्रकार. त्यांच्या विरोधात ही लस काम करते. जवळजवळ
२0 ते २५ वर्षे या लसीमुळे संरक्षण मिळते. बुस्टर डोस घेण्याची गरज नाही.
मग, ही लस का वापरली जात नाही? याची किंमत थोडीशी जास्त असल्याने याचा वापर मर्यादित आहे; परंतु आजकाल कितीतरी वायफळ गोष्टींवर आपण खर्च करीत असतो. त्यापेक्षा नक्कीच याची किंमत कमी आहे. फक्त याबद्दलचे ज्ञान आपल्याला नाही.
ही लस २००६ पासून वापरली जात आहे. याचे दुष्परिणाम काहीही नाहीत. अतिशय सुरक्षित असलेली ही लस टोचून घेण्याचा संकल्प करा!
आरोग्य क्षेत्रातील अधिकारी, लोकप्रतिनिधींनी याबद्दल जाणून घेऊन राष्ट्रीय लसीकरणामध्ये याचा समावेश करणे गरजेचे आहे. भावी पिढीसाठी ही खूप मोठी आरोग्यदायी गुंतवणूक ठरेल. ‘भूतान’ हा एक छोटासा देश; पण त्यांनी या लसीकरणाचा पुरेपूर उपयोग करून कॅन्सरची टक्केवारी कमी करण्यात यश मिळविले आहे.
आता वळूया कॅन्सरपूर्वी अवस्थांचे निदान कसे केले जाते? १) यामध्ये प्रथम पॅप टेस्ट केली जाते. यामध्ये गर्भाशयाच्या मुखावरील स्राव एका छोट्याशा कापसाच्या काडीद्वारे किंवा स्पॅच्युलाच्या सहायाने काचेवर पसरवला जातो आणि तपासणीकरिता लॅबोरेटरीमध्ये पाठविले जाते. कॅन्सरपूर्व अवस्थेतील पेशी, कॅन्सरग्रस्त पेशी यांचे उत्तमरीत्या आलेखन या स्लाईडमध्ये होते. या पेशींच्या रचनेवरून त्या पेशी ओळखल्या जातात व त्यानुसार त्याचे निदान केले जाते. सर्व्हायकल पेशी बाहेर टाकल्या जातात आणि लॅबोरेटरीत त्याचे निदान होऊ शकते. हा महत्त्वपूर्ण शोध पॅपनिकोला या शास्त्रज्ञाने लावला.
ही अतिशय साधी, सोपी आणि कमी खर्चिक अशी पद्धत आहे. वयाच्या २१ वर्षांनंतर
६५ वर्षांपर्यंतही केले जाते. साधारणपणे तीन वर्षांनंतर ही तपासणी करणे गरजेचे असते.
२) एच.पी.व्ही. टेस्ट : ही सुद्धा पॅपसारखीच असते. फक्त ही तपासणी खर्चिक असते. टेस्ट निगेटिव्ह असेल तर पाच वर्षांनी पुन्हा टेस्ट करावी लागते. ही टेस्ट थोडी उशिरा म्हणजे तिशीनंतर केली जाते. यामध्येसुद्धा पिशवीच्या तोंडचे पाणी ब्रशच्या सहायाने जारमध्ये जमविले जाते. ही टेस्ट पॅप टेस्टपेक्षा जास्त उपयोगी असते. ही जास्त अ‍ॅक्युरेट असते. फक्त याची किंमत जास्त असल्याने ती सामूहिक तपासणीत वापरता येत नाही. ३) व्ही.आय.ए. : ही पद्धत ग्रामीण भागात जेथे पॅप टेस्ट करणे काही कारणाने शक्य नसते तेथे उपयोगी ठरते. ही कमी खर्चिक आहे. यामुळे निदान करणे सोपे जाते. ४) कॉलपोस्किपी : ‘कॉलपोस्कोप’ हे एक प्रकारचे यंत्र असते. यामध्ये मॅग्निफिकेशान होऊन कॅन्सरपूर्व अवस्थांचे निदान करणे खूपच सोपे जाते. जेव्हा एखादे शंकास्पद लिजन दिसते, त्यावेळी त्याची बायोप्सी घेतली जाते. कॉलपोस्कोमुळे योग्य त्या जागेची बायोप्सी घेणे सोपे जाते. जेव्हा पॅप स्मिअरचा रिपोर्ट कॅन्सरपूर्व अवस्था दाखवितो त्यावेळी कॉलपोस्कची केली जाते व त्या शंकास्पद भागाची ट्रीटमेंट केली जाते. यासाठी ‘लीप’ (छीीस्र) व ‘क्रोयो’ यांसारख्या उपचार पद्धती वापरल्या जातात. यामुळे गर्भाशय काढण्याची गरज राहत नाही. थोडक्यात प्रत्येक स्रीने वयाच्या पंचविशीनंतर दर तीन वर्षांनी पॅप टेस्ट करणे गरजेचे आहे. वयाच्या तिशीनंतर एच.पी.व्ही. टेस्ट दर पाच वर्षांनी करावी.
(लेखिका कोल्हापुरातील स्त्री रोग व
प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ आहेत)

Web Title: Caution of Cervical Cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.