घोषणा झाली, पण... भिरभरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:19 PM2018-04-20T22:19:30+5:302018-04-20T22:19:30+5:30

बुधवारचा दिवस. मुख्यमंत्र्यांची भरगच्च पत्रकार परिषद. मुख्यमंत्र्यांनी ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियानां’तर्गत तब्बल ४००० कोटी रुपयांवर खर्च करून ६०,४१,००० शौैचालये बांधण्यात आली आहेत

 The announcement was made, but ... | घोषणा झाली, पण... भिरभरं

घोषणा झाली, पण... भिरभरं

Next


-उदय कुलकर्णी --
बुधवारचा दिवस. मुख्यमंत्र्यांची भरगच्च पत्रकार परिषद. मुख्यमंत्र्यांनी ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियानां’तर्गत तब्बल ४००० कोटी रुपयांवर खर्च करून ६०,४१,००० शौैचालये बांधण्यात आली आहेत आणि त्यामुळे महाराष्ट हागणदारीमुक्त झाला आहे, अशी घोषणा केली. घोषणा ऐकून अवघा महाराष्ट थक्क झाला.
खरं तर शौचालये बांधण्यासाठी अनुदान ही काही नवी योजना नव्हे. ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तशी अनुदाने ग्रामीण भागात शौचालये बांधणाऱ्यांना पूर्वीही दिली जात होती. अशा काही कामांची पाहणी करण्यासाठी मी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत फिरत होतो. अनेक खेड्यांत घरांजवळ नवी बांधकामे दिसली. कुतूहलानं चौकशी केली. ती शासकीय अनुदानातून उभारलेली शौचालये असल्याचं कळलं. काही ठिकाणी त्या शौचालयांमध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या, तर काही ठिकाणी उत्पन्नाचं साधन म्हणून पी.सी.ओ. सुरू केलेला होता. विचारलं, ‘शेळ्या इथं, पी.सी.ओ. इथं, मग शौचाला कुठं जाता?’ - तर उत्तर मिळालं ‘ते काय पूर्वीपासून जसं चालू आहे तसं चालू आहे’. आता हागणदारीमुक्तीच्या नावावर नव्याने हजारो कोटी रुपये शौचालयावर खर्च झाले आहेत. दुसºया टप्प्यात म्हणे शौचालयांचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. - प्रश्न आहे की, शौचालयांची उभारणी व जनजागृती या दोन्ही गोष्टी एकावेळी करता आल्या नसत्या का? - दुसरी बाब,अजूनही गावागावांत, शहराशहरांत अपंग व्यक्ती आणि महिलांसाठी पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत, त्याबाबतची जाग कधी येणार आहे?
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील गोष्ट. सीताराम पुरुषोत्तम तथा आप्पासाहेब पटवर्धन हे मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजचे स्कॉलर. गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पटवर्धनांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी गांधींबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली; पण गांधींनी त्यांना आधी खेडेगावांत जाऊन मानवी विष्ठा आणि कचरा गोळा करीत ग्रामस्वच्छतेचा आदर्श निर्माण करण्याविषयी सुचवलं. उच्चशिक्षित पटवर्धनांनी कणकवली गाठलं. रोज कावडीतून गावातला मैला गोळा करायला सुरुवात केली. लोकांनी सुरुवातीला वेड्यात काढलं; पण एकत्र केलेल्या मैल्यातून त्यांनी सोनखत बनवलं आणि शेती फुलवून दाखवली. मानवी विष्ठा वाहून नेणाºयांचे कष्ट कमी व्हावेत यासाठी चराचे संडास, गोपुरी संडास असे अनेक प्रकारचे संडास बनवले. कणकवलीत गोपुरी आश्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संडासचे म्युझियमही उभारले. ग्रामस्वच्छता, हागणदारीमुक्त आणि मानवी विष्ठेची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्याच्या कामाला प्रतिष्ठा मिळावी म्हणून आपण काय केले याची पटवर्धन यांनी पत्रकार बैठक घेऊन जाहिरात केल्याचे मात्र आठवत नाही. सध्या मात्र किती हजार कोटी खर्च याच्या जाहिरातीचा जमाना आहे. ग्रामस्वच्छता करायची म्हणजे इस्त्रीचे कपडे घालून नवा कोरा लांब दांड्याचा झाडू घेऊन तोंडाला मास्क घालून, कपड्यावर अ‍ॅप्रन बांधून व हातात ग्लोव्हज घालून छायाचित्रे काढायची म्हणजे निवडणुकीत त्याचा उपयोग करता येतो. ‘कोकण’ गांधींचा आदर्श कोण घेणार? त्यांचा आदर्श घेऊन निवडणुका थोड्याच जिंकता येणार आहेत?
मुख्यमंत्र्यांनी हागणदारीमुक्तीची घोषणा केली हे खरे; पण याच महाराष्टÑात शहराशहरांमध्ये कचºयाचा प्रश्न गंभीर होत चाललाय त्याचं काय? ना कचºयाच्या उठावाची योग्य व्यवस्था आहे, ना कचºयाच्या योग्य विल्हेवाटीची ! कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद अशा सगळ्याच शहरांच्या परिसरात कचºयांचे डोंगर आणि त्यानं पसरणारं अनारोग्य पाहायला मिळायला लागलंय. अधूनमधून हे कचºयाचे ढीग पेटवून दिले जातात आणि प्रदूषणात भर घातली जाते. मध्यमवर्गीय नागरिक शहर स्वच्छतेबाबत अतिजागरूक म्हणून ते ‘गार्बेज वॉक’ काढून आपला संताप व्यक्त करतात. बलात्कार झाला की मेणबत्त्या घेऊन फेरी काढायची. विचारवंताची हत्या झाली की, ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढायचा आणि कचरा फार झाला असं वाटलं तर ‘गार्बेज वॉक’ काढायचा. या पलीकडं जाऊन नागरिकांमध्ये कृतिशिलता यावी यासाठी आपण काय करणार आहोत? मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आपणास माहिती आहे का? २०१७ या वर्षात दर दिवशी सर्वाधिक कचरा निर्माण करणाºया राज्यांमध्ये देशात महाराष्टÑाचा पहिला क्रमांक होता. देशामध्ये दररोज दीड लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. या कचºयापासून देशाला आणि महाराष्टÑाला मुक्ती कशी मिळेल?

( -  लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत   kollokmatpratisad@gmail.com)

Web Title:  The announcement was made, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.