वृत्तपत्र विक्रेते पुन्हा वाऱ्यावर, सरकारविरोधात एल्गार पुकारणार; १९ जुलैला मिरजेत बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 01:31 PM2023-07-13T13:31:06+5:302023-07-13T13:31:27+5:30

असंघटित कामगार महामंडळात विक्रेत्यांचा समावेश केला नसल्याने संताप

Anger over the non inclusion of newspaper vendors in the Unorganized Workers Corporation | वृत्तपत्र विक्रेते पुन्हा वाऱ्यावर, सरकारविरोधात एल्गार पुकारणार; १९ जुलैला मिरजेत बैठक 

वृत्तपत्र विक्रेते पुन्हा वाऱ्यावर, सरकारविरोधात एल्गार पुकारणार; १९ जुलैला मिरजेत बैठक 

googlenewsNext

कोल्हापूर : शेती, फेरीवाले, बांधकाम, उद्योग, शिक्षण, आयटी इंडस्ट्रीजसह विविध विभागातील असंघटित ३४० व्यवसायातील असंघटित कामगारांसाठी राज्य शासनाने राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला. मात्र, ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगत वर्षानुवर्षे घरोघरी वृत्तपत्र पोहोचवणाऱ्या विक्रेत्यांचा यात समावेश केला नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने मागणी करूनही राज्य सरकारने या मागणीला ठेंगा दाखवल्याने वृत्तपत्र विक्रेते आंदोलनाचा एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहेत. या अनुषंगाने मिरज येथे १९ जुलैला पश्चिम महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघटनांची बैठक आयोजित केली आहे.

सर्व संकटावर मात करत रोज घरोघरी वृत्तपत्रे पाेहोचवणाऱ्या विक्रेत्यांना संरक्षण, वैद्यकीय सुविधांमध्ये सवलत, पाल्यांच्या शिक्षणात सवलत मिळावी या उद्देशाने विक्रेत्यांनी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी लावून धरली आहे. यासाठी संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली. सरकारनेही अभ्यासगट तयार करून यावर निर्णय घेण्याचे मान्य केले होते.

मात्र, नुकतेच ३४० व्यवसायांतील असंघटित कामगारांसाठी महामंडळ स्थापन करताना सरकारला वृत्तपत्र विक्रेत्यांची आठवण न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इतर घटकांमध्ये समावेश न करता वृतपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी आहे. मात्र, सरकार यावरही निर्णय घेण्यास दिरंगाई करत आहे.

कोणते घटक समाविष्ट

वृत्तपत्र विक्रेते, या व्यवसायाशी संबंधित मानधनावर काम करणारे कर्मचारी, पायलट, वृत्तपत्राचे गठ्ठे बांधणारे या सर्वांचा या महामंडळात समावेश करावा, अशी मागणी विक्रेत्यांची आहे.

गेल्या २० वर्षांपासून स्वतंत्र कल्याणकारी महामंडळाची मागणी करूनही सरकारने आम्हाला यातून वगळले आहे. याविरोधात राज्यभर एल्गार पुकारणार असून, त्याची दिशा ठरवण्यासाठी येत्या १९ जुलैला मिरज येथे बैठक आयोजित केली आहे. - रघुनाथ कांबळे, राज्य उपाध्यक्ष वृत्तपत्र विक्रेता संघटना.
 

महापूर, कोरोनासह इतर सर्व संकटांत एकही दिवस न थांबता बाराही महिने आम्ही वाचकांना सेवा देतो. मात्र, सरकार आमच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात कुचराई करत आहे. - रणजित आयरेकर, उपाध्यक्ष, कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटना.

२०१३ मध्ये तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे पत्राद्वारे सांगितले होते. मात्र, अद्याप ते झालेले नाही. लवकरच कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आमची व्यथा मांडणार आहे. -किरण व्हनगुत्ते, अध्यक्ष, जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशन

Web Title: Anger over the non inclusion of newspaper vendors in the Unorganized Workers Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.