Kolhapur: दामदुपटीच्या आमिषाने ६५ कोटींनी गंडवले; दोन कंपन्यांविरूद्ध तक्रार

By उद्धव गोडसे | Published: April 26, 2024 12:06 PM2024-04-26T12:06:49+5:302024-04-26T12:07:07+5:30

सेन्स ऑप्शन, ब्रेनवेझ टेक्नॉलॉजीने फसवले : आमशी येथील संशयित

65 crore cheated by Damdupat bait; Complaint against two companies in Kolhapur | Kolhapur: दामदुपटीच्या आमिषाने ६५ कोटींनी गंडवले; दोन कंपन्यांविरूद्ध तक्रार

Kolhapur: दामदुपटीच्या आमिषाने ६५ कोटींनी गंडवले; दोन कंपन्यांविरूद्ध तक्रार

उद्धव गोडसे

कोल्हापूर : गुंतवणुकीवर पाच महिन्यांत दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून राजारामपुरी येथील सेन्स ऑप्शन आणि ब्रेनवेझ टेक्नॉलॉजी या दोन कंपन्यांनी सुमारे ६५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. गुंतवणूकदारांनी याबाबतची तक्रार गुरुवारी (दि. २५) पोलिस अधीक्षक कार्यालयात दिली. 

फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता तक्रारदारांनी वर्तवली. फसवणूक करणाऱ्या दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांचा सध्या पुण्यात मुक्काम असल्याची माहिती गुंतवणूकदारांनी दिली. आमशीमध्ये दामदुप्पटचा भुलभुल्लया अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने दीड वर्षापूर्वी दिले होते.

विविध प्रकारची आमिषे दाखवून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे कारनामे उघडकीस येत असतानाही, गुंतवणूकदार डोळे झाकून कंपन्यांमध्ये पैसे जमा करत आहेत. संदीप बाजीराव पाटील (रा. आमशी, ता. करवीर) आणि त्याचा मेहुणा सुदाम सदाशिव चव्हाण (रा. सांगरूळ, ता. करवीर) या दोघांनी २०२१ मध्ये राजारामपुरी येथील जनता बाजार चौकातील एका इमारतीत सेन्स ऑप्शन आणि ब्रेनवेझ टेक्नॉलॉजी नावाच्या दोन ट्रेडिंग कंपन्या सुरू केल्या. शेअर मार्केटमधील ट्रेडिंगमधून दरमहा २० टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. 

सुरुवातीचे काही महिने २० टक्के परतावा मिळाल्याने हुरळून गेलेल्या गुंतवणूकदारांनी मोठ्या रकमा कंपनीत जमा केल्या. काही जणांनी जमिनी आणि दागिने विकून कंपनीत पैसे भरले. मात्र, जून २०२२ पासून परतावा मिळणे बंद झाले. कंपनीच्या कारभाराबद्दल संशय आल्याने काही गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्यास सुरुवात केली. मात्र, दोन्ही प्रमुखांनी राजारामपुरीतील कार्यालय बंद करून पुण्याला पलायन केले. कोट्यवधी रुपये अडकल्यामुळे काही गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दिला असून, गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी केली आहे.

सोन्याची नाणी, वाहनांचे आमिष

पाच लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास दोन तोळे सोन्याचे नाणे, २० लाखांवर बुलेट, एक कोटीसाठी आलिशान कार भेट देण्याचे आमिष दाखवले जात होते. काही एजंटांना अशा प्रकारची बक्षिसे देऊन कंपनीने गुंतवणूक वाढवल्याची माहिती तक्रारदारांनी दिली.

भूलथापा मारून गंडवले

कंपनीकडे सेबीचे लायसन्स आहे. कंपनीच्या खात्यावर ५०० कोटी रुपये शिल्लक आहेत. कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. सर्व व्यवहार पारदर्शक असतील, अशा भूलथापा लावून कंपनीने गुंतवणूकदारांना गंडवले. गुंतवणूक वाढवण्यासाठी शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी सेमिनारचे आयोजन केले होते.

पैसे मागणाऱ्यांना दमदाटी

परतावे बंद झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा ससेमिरा टाळण्यासाठी दोन्ही संशयितांनी पुण्यात मुक्काम ठोकला. काही गुंतवणूकदारांनी पुण्यात जाऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, संशयितांनी दमदाटी करून त्यांना हाकलून लावले. सध्या तो पुण्यात गुंतवणूक करून घेत असल्याचे तक्रारदारांनी सांगितले.

Web Title: 65 crore cheated by Damdupat bait; Complaint against two companies in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.