कल्याण तळोजा मेट्रो १२ च्या कामाला वेग; ग्रामीण भाग नवी मुंबईशी जोडला जाणार

By मुरलीधर भवार | Published: May 9, 2024 03:34 PM2024-05-09T15:34:39+5:302024-05-09T15:35:24+5:30

कल्याणनंतर डोंबिवलीतही मेट्रोच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला सुरुवात

Speed up work on Kalyan Taloja Metro 12; Rural areas will be connected to Navi Mumbai | कल्याण तळोजा मेट्रो १२ च्या कामाला वेग; ग्रामीण भाग नवी मुंबईशी जोडला जाणार

कल्याण तळोजा मेट्रो १२ च्या कामाला वेग; ग्रामीण भाग नवी मुंबईशी जोडला जाणार

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरांच्याच नव्हे, तर संपूर्ण एमएमआर रिजनच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या महत्त्वाकांक्षी कल्याण तळोजा मेट्रो १२ प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पाचे फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच काही दिवसांत या मेट्रो १२ प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला कल्याण एपीएमसी मार्केट रोड येथे या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. यानंतर सद्यस्थितीत डोंबिवलीच्या कल्याण शीळ रोड परिसरातही मेट्रो १२ चे काम सुरू झाले आहे. 

कल्याण लोकसभा मतदारसंघात मुंबई, ठाणे, नवी मुंबईला जाणारा नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असून त्यांचा प्रवासाचा वेळ कमी व्हावा, आणि जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध व्हावेत, वाहतूकव्यवस्था अधिक गतिमान व्हावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते.  कल्याण तळोजा मेट्रो - १२ हा यापैकी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी तब्बल ५ हजार ८६५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ठाणे आणि त्यापुढील कल्याण डोंबिवली या शहरांसाठीही मेट्रो मार्गाची उभारणी केली जाते आहे. याअंतर्गत ठाणे - भिवंडी - कल्याण या मेट्रो मार्गाची उभारणी वेगाने सुरू आहे. हा मार्ग पुढे कल्याणपासून डोंबिवली आणि कल्याण तालुक्यातील काही गावे, तसेच पुढे तळोज्यापर्यंत जाणार आहे. एकूण २० किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून यात १९ स्थानके आहेत. हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यावर नियमित स्वरूपात अडीच लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात भूमिपूजन झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांच्या कालावधीत प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. कल्याणमधील एपीएमसी मार्केट रोड आणि डोंबिवलीतील कल्याण शीळ रोडवर मेट्रोच्या मार्गाच्या उभारणीचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. लवकरच कल्याण ते बदलापूर मेट्रो १४ या मार्गाच्या कामाला देखील सुरुवात होणार आहे. यामुळे कल्याण ते बदलापूर प्रवास देखील नागरिकांना अवघ्या काही मिनिटात करता येणार आहे.

ग्रामीण भाग नवी मुंबईशी जोडला जाणार!

या मार्गाच्या उभारणीमुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग हा थेट नवी मुंबई, तळोजा या भागांशी जोडला जाणार आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमधील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

मेट्रो १२ मध्ये या स्थानकांचा असणार समावेश!

कल्याण तळोजा (मेट्रो १२) अंतर्गत कल्याण, कल्याण एपीएमसी, गणेश नगर, पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे आणि कोळेगाव, निळजे गाव, वडवली (खुर्द), बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा, या स्थानकांचा समावेश असणार आहे.

Web Title: Speed up work on Kalyan Taloja Metro 12; Rural areas will be connected to Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो