रोज 10 हजार पावलं चाला अन् 21% व्याजदर मिळवा; 'या' बँकेची भन्नाट ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 03:39 PM2018-11-28T15:39:56+5:302018-11-28T15:40:35+5:30

जर तुम्हाला कोणी येऊन सांगितलं की, तुम्ही फक्त चालण्याचं काम करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. तर तुम्ही काय कराल? ऐकून थोडं विचित्र वाटलं ना? पण हे खरं आहे. पायी चालणाऱ्यांना एक बँक त्यांच्या खात्यातील एकूण रक्कमेवर अधिक व्याज देत आहे

ukraine bank offers 21 percent interest rate for doing 10000 steps | रोज 10 हजार पावलं चाला अन् 21% व्याजदर मिळवा; 'या' बँकेची भन्नाट ऑफर

रोज 10 हजार पावलं चाला अन् 21% व्याजदर मिळवा; 'या' बँकेची भन्नाट ऑफर

जर तुम्हाला कोणी येऊन सांगितलं की, तुम्ही फक्त चालण्याचं काम करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. तर तुम्ही काय कराल? ऐकून थोडं विचित्र वाटलं ना? पण हे खरं आहे. पायी चालणाऱ्यांना एक बँक त्यांच्या खात्यातील एकूण रक्कमेवर अधिक व्याज देत आहे. अहो काहीतरीच नाही खरं सांगतोय.... पण यासाठी बँकेने एक अट ठेवली आहे ती म्हणजे, जर जास्त व्याजदर हवा असेल तर दररोज कमीत कमी 10,000 पावलं चालणं गरजेचं आहे. पण तुम्ही यापेक्षा कमी पावलं चाललात तर मात्र तुम्हाला हा ज्यादा व्याजदर मिळू शकणार नाही. 

युक्रेनमधील मोनो बँकने एक खास ऑफर आपल्या खातेधारकांसाठी लॉन्च केली आहे. खरं तर आपल्या खातेधारकांच्या आरोग्यासाठी आणि पायी चालणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने ही योजना राबविली आहे. यामध्ये विचारपूर्वक एक अट ठेवली आहे की, दररोज 10000 पावलांपेक्षा कमी चालणाऱ्या खातेधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. बँकेने यासाठी एका अॅपची मदत घेतली आहे. खातेधारक किती पावलं चालतात हे एका अॅपद्वारे मोजण्यात येणार आहे. यामध्ये एखाद्या खातेधारकाने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर अशा खातेधारकांना दंड ठोठावण्यात येणार आहे. अशा फसवणूक करणाऱ्या खातेधारकांना देण्यात येणाऱ्या व्याजदरात कपात करण्यात येणार आहे. या बँकेची स्थापना तीन वर्षांपूर्वी करण्यात आली होती आणि आता या बँकेच्या खातेधारकांची संख्या 5 लाखांपेक्षा अधिक आहे. 

असं करण्यात येतं काम

बँकेच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी आपल्या स्मार्टफोनमध्ये एक हेल्थ अॅप डाऊनलोड करावं लागतं. हे अॅप त्यांच्या शारीरिक हालचालींना मॉनिटरिंग करतं. अॅपचा सर्व डेटा बँकेकडे असतो. त्यामुळे बँकेला खातेधारकांची माहिती ठेवणं सोपं जातं. तसेच कोण किती पावलं चाललं याचीही माहिती मिळवण्यास सोपं जातं. 

फसवणूक केल्यामुळे व्याजदरात कपात करण्यात येईल

बँकेला जर वाटले की, खातेधारक यामध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक करत असेल तर दंड म्हणून त्यांच्या खात्याचा व्याजदर कमी करण्यात येतो. मोनो बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, दररोज 10 हजार पावलं चालणाऱ्या ग्राहकांच्या खात्यावरील रकमेवर बँक 21 टक्के व्याज देते. परंतु यादरम्यान जर एखादी व्यक्ती लागोपाठ तीन दिवस 10 हजार पावलांपेक्षा कमी चालली तर फक्त 11 टक्के व्याज देण्यात येतं. या बँकेच जवळपास 50 टक्के खातेधारक  21 टक्के दराने व्याज घेत आहेत. 

युक्रेनमध्ये हृदयरोगाने मृत्यू होणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक 

बँकेने राबविलेल्या या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे पायी चालणाऱ्या लोकांना प्रोत्साहीत करणे हा आहे. ब्रिटनप्रमाणे युक्रेनमध्ये लठ्ठपणाने ग्रस्त असणाऱ्या लोकांची संख्या वाढतं आहे. परिणामी हृदय रोगाने ग्रस्त असणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हृदयरोगाने मृत्यूमुखी पडणाऱ्या रूग्णांमुळे युक्रेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे प्रत्येक एक लाख लोकांमध्ये 400 लोकांचा मृत्यू हृदयरोगाने होतो. त्यामुळे मोनो बँकेने खातेधारकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. 

Web Title: ukraine bank offers 21 percent interest rate for doing 10000 steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.