ठळक मुद्देखाकी वर्दीतल्या गायकाचा एक व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियावर पाहिलाच असेल. गायनाविषयी कोणतंही शिक्षण न घेतलेला हा पोलीस गायक फार पूर्वीपासूनच त्यांची कला जोपासत आहे.

जळगाव : खाकी वर्दीतल्या गायकाचा एक व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत फेसबुक, व्हॉट्सअॅपवर पाहिलाच असेल. अवघ्या १ दिवसात या व्हिडिओने फेसबुकवर तब्बल ८ लाखांहून अधिक व्ह्यूज केले आहेत. या पोलिसाच्या अंगातील कला पाहून साऱ्यांनीच त्यांचं कौतुक केलंय. गायनाविषयी कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या हे पोलीस गायक फार पूर्वीपासूनच त्यांची कला जोपासत आहेत, शिवाय त्यांनी अनेक दिग्गज गायकांसोबतही गायन केलेलं आहे. तसंच त्यांना आता अनेक पार्श्वगायनाच्या ऑफर्सही आल्या आहेत. 

आणखी वाचा - पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, भरकटलेल्या बालकांना मिळाले पालक !

जळगाव पोलीस अधिक्षक कार्यालयात कार्यरत असलेले संघपाल राजाराम तायडे असं या खाकी वर्दीतल्या कलाकाराचं नाव आहे. २००७ साली ते पोलीस खात्यात रूजु झाले. मात्र गायनाची आवड त्यांना त्याआधीपासूनच असल्याचं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलंय. २००५ सालापासून ते गायन करत आहेत. पोलीस खात्यात रुजू होण्याआधी त्यांनी अनेक दिग्गज गायकांसोबत गाणंही गायलं आहे. पूर्वीपासूनच सेलिब्रिटी असेलेले तायडे आता प्रकाशझोतात येण्यामागे त्यांचा फेसबुकवर अपलोड झालेला एक व्हिडिओ आहे. 

संघपाल तायडे हे काही दिवसांपूर्वी शिर्डीत बंदोबस्तासाठी तैनात होते. आपलं कर्तव्य बजावताना त्यांना थोडासा वेळ मिळाला तेव्हा त्यांच्या सहकार्यांनी गाण्याची फर्माईश केली. सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी प्रत्येकाच्याच ह्रुदयाला भिडणारं खेळ मांडला हे गाणं गायलं. हे गाणं त्यांच्या मित्रांनी व्हिडिओत कैद करून व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला. व्हिडिओ अपलोड करताच अवघ्या २४ तासात या व्हिडिओला ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. तसंच त्यांची ही कलाकारी पाहून फेसबुकवर त्यांचे फोलोवर्सही वाढले आहेत. संघपाल तायडे यांच्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला त्यांचे अनेक व्हिडिओही सापडतील. त्यांच्या युट्यूब चॅनलवरील गाण्यांनुसार ते जुन्या हिंदी गाण्यांचे शौकीन असल्याचं दिसतंय. तसंच त्यांनी याआधी एका चित्रपटातही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

आणखी वाचा - एका संवेदनशील पोलीस अधिका-यांच्या समयसूचकतेने ‘आॅटिझम’ग्रस्त मनीषचे बहरले आयुष्य

एका मुलाखतीत त्यांनी असंही सांगितलं आहे की, त्यांचे हे गाण्याचे व्हिडिओ पाहून त्यांना अनेक पार्श्वगायनासाठी ऑफर्सही आल्या आहेत. सोशल मीडिया हे कलाकारांसाठी एक व्यासपीठ आहे. कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणारं एक सक्षम व्यासपीठ म्हणजे सोशल मीडिया. आणि या सोशल मीडियामुळेच जळगावच्या संघपाल यांना एक वेगळी ओळख मिळाली.