इथे होतात जखमी चपलांवर उपचार, उद्योगपती आनंद महेंद्राही झाले प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 04:34 PM2018-04-20T16:34:33+5:302018-04-20T16:34:33+5:30

तुम्ही कधी जखमी चपलांसाठी हॉस्पिटल पाहिलं आहे का?

hospital of wounded shoes in haryana | इथे होतात जखमी चपलांवर उपचार, उद्योगपती आनंद महेंद्राही झाले प्रभावित

इथे होतात जखमी चपलांवर उपचार, उद्योगपती आनंद महेंद्राही झाले प्रभावित

googlenewsNext

चंदीगड- आपल्याला दुखापत झाली किंवा आपण आजारी पडलो की हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जातो. माणसांप्रमाणेच प्राण्यांसाठीही हॉस्पिटल आहेत. जेथे जखमी- आजारी प्राण्यांवर उपचार केले जातात. पण तुम्ही कधी जखमी चपलांसाठी हॉस्पिटल पाहिलं आहे का? ऐकायला ही गोष्ट जरा विचित्र वाटत असली तर अशा प्रकारचं एक हॉस्पिटल चंदीगडमधील जिंदमध्ये आहे. 'जखमी चपलांचं हॉस्पिटल' असा मोठा बॅनर या स्टॉलच्या बाहेर लावला आहे. म्हणजेच तुटलेल्या चपला शिवण्यासाठीचा हा स्टॉल आहे. पण स्टॉल चालविणाऱ्या व्यक्तीने वेगळीच युक्ती लावून त्याच्या स्टॉलचं मार्केटिंग केलं आहे. विशेष म्हणजे जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून चपलांवर उपचार केले जातील, असंही त्यांनी पोस्टरवर लिहिलं आहे.

चपलांवर उपचार करणाऱ्या या डॉक्टरांचं नाव डॉ. नरसीराम  (वय 55 वर्ष) आहे. त्यांच्याकडे चपलांवर उपचार करण्याठी एक पेटी आहे. त्यामध्ये ब्रश, बूट पॉलिश करण्याचं सामान अशा विविध वस्तू आहेत. चपला दुरूस्तीसाठी हे हॉस्पिटल सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरु असतं. हरियाणातील जिंद शहरातल्या पटियाला चौकात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या या हॉस्पिटलच्या बाहेर असणारे रंगीत पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. 

नरसीराम  यांच्या कामाचं कौतुक महेंद्रा ग्रुपचे चेअरमॅन आनंद महेंद्रा यांनी केलं आहे. आनंद महेंद्रा यांनी ट्विट करत म्हटलं की, या व्यक्तीला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये मार्केटिंगचं शिक्षण देण्यासाठी असायला हवं होतं. या व्यक्तीच्या कामाला बढावा देण्यासाठी मला त्याच्या व्यावसायात छोटीशी गुंतवणूक करायला आवडेल, असं त्यांनी म्हटलं. आनंद महेंद्रा यांना 'जखमी चपलांचं हॉस्पिटल'च्या पोस्टरचा फोटो व्हॉट्सअॅपवर मिळाला होता. पण हा फोटो कुठला आहे हे त्यांना माहिती नव्हतं. महेंद्रा यांनी ट्विट केल्यावर तो फोटो हजारो लोकांनी लाइक केला तसंच त्याला अनेक रिट्विटही मिळाले. आनंद महेंद्रा यांच्या ट्विटनंतर त्यांच्या कंपनीमधील काही लोकांनी जिंदमध्ये नरसीराम यांची भेट घेत त्याच्या कामाबद्दल त्यांना सन्मानित केलं. कंपनीच्या ट्रॅक्टरवर बसवून त्यांना संपूर्ण शहरात फिरवलं. इतकंच नाही, नरसीराम यांना आर्थिक मदत देण्याचंही ते म्हणाले. नरसीराम यांनी आता आनंद महेंद्रा यांना भेटण्याची इच्छा व्यक्ती केली आहे. 


नरसीराम हे गेल्या तीस वर्षापासून चपला शिवण्याचं काम करत आहेत. बुडणाऱ्या व्यवसायाला वाचविण्यासाठी त्यांनी ही मार्केटिंगची पद्धत शोधली. लोकांना दुकानाकडे आकर्षित करणं हा त्यामागील उद्देश होता. 
 

Web Title: hospital of wounded shoes in haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.