नागरिकांची कामे होणार प्रभागातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:01 PM2018-11-23T22:01:53+5:302018-11-23T22:02:44+5:30

नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवकांनी व्यक्त केला सूर

The work of the citizens will be going on | नागरिकांची कामे होणार प्रभागातच

नागरिकांची कामे होणार प्रभागातच

Next
ठळक मुद्देप्रभाग समितीच्या रचनेवर भर देणारसमन्वय व परिपक्वतेचे राजकारण करणार

जळगाव : मनपाची स्थापना झाल्यापासून प्रभाग समित्यांची रचना करण्यात आलेली नाही. किरकोळ गोष्टींसाठी देखील नागरिकांना महापालिकेत यावे लागते. असे न होता नागरिकांची बहुतांश कामे ही प्रभागातच व्हावी यादृष्टीने प्रभाग समित्यांचे कार्यालय हे प्रभागात आणण्यासाठी प्रभाग समितीची रचना करण्यावर भर दिला जाणार असल्याचा सूर मनपातील नवनियुक्त स्वीकृत नगरसेवकांनी व्यक्त केला.
मनपातील नवनियुक्त भाजपा व शिवसेनेच्या पाचही स्वीकृत सदस्यांच्या उपस्थितीत लोकमत शहर कार्यालयात चर्चासत्राचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी भाजपाचे नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, राजेंद्र मराठे, महेश चौधरी शिवसेनेचे नगरसेवक अमर जैन हे उपस्थित होते. सुरुवातीला ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी सर्व नगसेवकांचे स्वागत केले. चर्चासत्रात सर्व नगरसेवकांनी आगामी काळात शहर विकासाच्या दृष्टीने कोणत्या प्रश्नांवर भर देण्यात येईल यावर आपली भूमिका मांडली. तसेच सर्व पक्षांच्या नगरसेवकांच्या सहकार्याने शहरातील प्रश्न मार्गी लावण्यात येतील असा सूर व्यक्त केला.
समन्वय व परिपक्वतेचे राजकारण करणार - कैलास सोनवणे
मनपातील विद्यमान सदस्यांमध्ये अनुभवी नगरसेवक असलेले कैलास सोनवणे यांनी सांगितले की, शहराचा विकास करण्यासाठी नेहमी समन्वय व सकारात्मक भूमिकेचे राजकारण करण्यावरच भर आतापर्यंत दिला आहे. भविष्यात देखील असेच राजकारण केले जाणार आहे. विरोधकांना सोबत घेवून विकासकामांचा वेग वाढविण्यावर भर दिला जाईल असे मत कैलास सोनवणे यांनी व्यक्त केले. जळगावकरांनी भाजपावर जो विश्वास दाखविला तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल असेही सोनवणे म्हणाले.
मिळालेल्या संधीचे सोने करणार - राजेंद्र मराठे
राजेंद्र मराठे म्हणाले, भारतीय जनता पक्षात अनेक वर्षे काम केल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेत सत्ता मिळवल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी एका साधारण कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली. या संधीचे सोने करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. शिवाजी नगर उड्डाणपूलाचे बांधकाम लवकर व्हावे यासाठी प्रयत्न क रण्यात येईल. स्थानिक नागरिकांचे म्हणणे देखील प्रशासनाकडे मांडण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासह आरोग्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असेही मराठे यांनी सांगितले.
जामनेरच्या विकासाप्रमाणेच जळगावचा विकास व्हावा - अमर जैन
शिवसेनेचे नगरसेवक अमर जैन म्हणाले, भाजपाचा विजय हा केवळ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विकासाच्या अजेंडावरच झाला. शिवसेनेनेदेखील विकासाच्याच मुद्यावर निवडणूक लढली. मात्र, यामध्ये यश मिळाले नाही. गिरीश महाजन यांनी निवडणुकीच्या काळात जी आश्वासने दिली आहेत. ती आश्वासने पूर्ण करण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा आहे. गिरीश महाजनांनी जामनेरप्रमाणेच जळगावचा विकास देखील करावा. सुरेशदादा जैन यांनी सांगितल्याप्रमाणे सत्ताधारी भाजपाला विकासकामे करण्यासाठी वर्षभर संधी दिली जाईल. मात्र, जळगावकरांचा अपेक्षा पूर्ण न झाल्यास शिवसेना आपली भूमिका नक्की घेईल. तसेच महापौरांना काम करण्याची संधी आमदारांनी द्यायला हवी त्यामध्ये हस्तक्षेप करू नये असेही अमर जैन म्हणाले.
आरोग्य व स्वच्छतेच्या प्रश्नांवर अधिक भर देणार- महेश चौधरी
पहिल्यादांच मनपात स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रवेश केलेले महेश चौधरी म्हणाले की, पहिल्यापासून मला आरोग्याच्या प्रश्नावर काम करण्याची आवड आहे. त्यामुळे मनपात देखील आरोग्याच्या प्रश्नावर मी काम करेल. सध्या शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. स्वाईन फ्ल्यूचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत शहरात स्वच्छतेच्या प्रश्नावर अधिक भर देण्याचा प्रयत्न राहणार आहे. आमदारांनी सर्व नगरसेवकांना आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात काम करण्याची मुभा दिली असल्याने नागरिकांचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडविण्याची संधी आम्हाला आहे. विरोधकांनी देखील आमच्या विकासकामांची दखल घ्यावी असे काम करण्याचा प्रयत्न आमचा राहील.
नगरसेवक डायरीचा विषय मार्गी लावू - विशाल त्रिपाठी
नगरसेवक डायरीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यामुळे नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील व प्रशासनावर देखील वचक राहणार आहे. त्यामुळे नगरसेवक डायरीचा विषय मार्गी लावू असे विशाल त्रिपाठी यांनी सांगितले. यामुळे प्रशासन व नगरसेवकांची प्रतिमा देखील सर्वसामान्यांमध्ये उंचावणार आहे.प्रशासनाचे सहकार्य घेवूनच कामे के ले जाणार आहे. आधी दोन वेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून दाखल झालो होतो. मात्र, तेव्हा भाजपा विरोधात होती. आता आमचा पक्ष सत्तेत असून काम करताना अनेक बंधन असली तरी विकासाच्या मुद्यात ती बंधने आड येवू न देता नागरिकांचे प्रश्न सोडविले जातील असे त्रिपाठी म्हणाले.

Web Title: The work of the citizens will be going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव