आम्हाला इंग्रजांचे कौतुक का वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:17 PM2018-08-31T13:17:03+5:302018-08-31T13:17:24+5:30

ब्रिटिशकालीन इमारती दिमाखात उभ्या असताना अलीकडे बांधलेल्या वास्तूंना गळती लागते, बोगद्यात पाणी साचते, महामार्गाच्या चौपदरीकरणाचा भराव खचतो हे कशाचे द्योतक आहे? आम्ही स्वार्थापलीकडे कर्तव्यपूर्ती विसरत आहोत काय?

Why do we feel British? | आम्हाला इंग्रजांचे कौतुक का वाटते?

आम्हाला इंग्रजांचे कौतुक का वाटते?

googlenewsNext

- मिलिंद कुलकर्णी
लोकशाही राज्यव्यवस्थेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाके असतात. परंतु अलीकडे प्रशासन वर्चस्ववादी भूमिकेत आले असून लोकप्रतिनिधी बचावात्मक पवित्र्यात आहेत. अभ्यास, अनुभव नसल्याने लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या सल्ल्याने निर्णय घेतात. जळगावच्याजिल्हा परिषदेत अधिकारी ठेकेदार बनल्याचा आरोप पदाधिकारी व सदस्य करतात. पण हे धाडस अधिकारी कसे करतात, त्यांना लोकप्रतिनिधींचा धाक का वाटत नाही, याचे उत्तर कोण देणार?
स्वातंत्र्य दिन असल्याने आॅगस्ट महिन्यात देशभक्तीला मोठे उधाण आलेले असते. वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण केले जाते. स्वातंत्र्यानंतर देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा, सिंहावलोकन केले जाते. यंदाही हे सगळे घडले.
समाजमाध्यमांवर डीपी बदलण्यापासून तर देशभक्तीपर सुविचारांची रेलचेल होती. मात्र त्यातील दोन संदेश हे मार्मिक आणि लक्षवेधक असे होते. पहिल्याचा आशय असा होता, चला १५ आॅगस्ट आटोपला. काल आपण सारे भारतीय होतो, आज परत आपापल्या जातीच्या कोषात जाऊया...विद्यमान स्थितीवर मार्मिक भाष्य मोजक्या शब्दात केले गेले. दुसºया संदेशात व्यंगात्मक पद्धतीने इंग्रजांना दूषणे देत त्यांच्या काळातील विकासकामे, शिस्त, वक्तशीरपणा या गुणांचे कौतुक केले होते. ‘बरे झाले इंग्रज गेले’ अशा आशयाच्या त्या ओळींमध्ये आता भारतीय नागरिक कसे मुक्त स्वातंत्र्य उपभोगत आहे, असे मांडले होते. नियोजनाचा अभाव, बेशिस्त, सार्वत्रिक भ्रष्टाचार या बाबींचा उहापोह त्यात करण्यात आला होता.
या दोन्ही संदेशांमधून भारतीय समाजाची दुखरी नस हेरली गेली आहे. आम्ही वर्षातून केवळ दोन दिवस ‘भारतीय’ नागरिक असतो. शालेय जीवनात केवळ पाठ्यपुस्तकातील ‘प्रतिज्ञा’ वाचण्यापुरते आम्ही भारतीय नागरिकत्वाची कर्तव्ये पालन करीत असतो. इंग्रजांनी दीडशे वर्षे भारतावर राज्य केले. सोन्याचा धूर निघणाºया देशाला अक्षरश: लुटले. काही मंडळी अजूनही इंग्रजांच्या प्रेमात आहेत. त्यांच्या काळातील कामांचे, प्रशासन व्यवस्थेचे गुणगान करणारे लोकदेखील आहेत. परंतु संख्येने कमी असलेल्या इंग्रजांनी भारतावर राज्य केले, त्याची अंमलबजावणी त्यांनी आम्हा भारतीयांकडूनच केली, हे कसे विसरता येईल? विश्वेश्वरैया यांनी केलेली धुळे शहराची नगररचना किंवा सिंचनाचा प्रयोग नजरेआड कसा करता येईल का? इंग्रजपूर्व काळात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांनी उत्कृष्ट राजव्यवस्था, सामाजिक समतेचा इतिहास घडविला आहे. त्यामुळे इंग्रजांनीच अमुक केले हे तद्दन खोटे आणि अपुºया माहितीवर आधारित असे वक्तव्य असते.
ब्रिटिशकालीन वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत, आणि अलीकडे उभारलेल्या इमारती निकृष्ट कशा असा मुद्दा हिरिरीने मांडला जातो, त्याचे निराकरण करणे मात्र अवघड आहे. कारण हे वास्तव आहे. इंग्रजांच्या अचूक नियोजन, कठोर अंमलबजावणीचा परिपाक या इमारतींमधून दिसून येतो. त्यांचा धाक असल्याने कामे निकृष्ट होण्याचा प्रश्नच उद्भवला नसावा. आता आम्हीच सरकार, आम्हीच लोकप्रतिनिधी आणि आम्हीच ठेकेदार असल्याने कोणाचा कुणाला धाक राहणार आहे? त्याचा परिणाम म्हणून पंतप्रधानांच्या मतदारसंघातील निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळतो, १०० वर्षे जुन्या पुलाची आयुर्मर्यादा संपल्यानंतरही जळगावातील शिवाजीनगरच्या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू राहते, उद्घाटनापूर्वीच जळगावातील नाट्यगृहाला गळती लागते, पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्थाच न केल्याने नवीन बजरंग बोगद्यात तळे साचते, साक्री ते धुळे या नव्याने चौपदरीकरण केलेल्या महामार्गाचा भराव खचू लागतो, या गोष्टींमधून आमच्या सार्वजनिक नीतिमत्ता, देश आणि समाजाविषयी असलेल्या आत्मीयतेचा अभाव यातून दिसून येतो.
आम्ही काहीही केले तरी आमचे काय वाकडे होणार आहे, अशा भावनेतून अनिर्बंध वर्तन सुरू असल्याने अशा गोष्टी घडत असाव्यात. आपल्याच बांधवांचे आम्ही जीव गमावतो आहोत, आणि तरीही चौकशा दडपल्या जातात, कारवाया थंड बस्त्यात पडतात.
सत्ता कुणाची, राजकीय पक्ष कोण यापेक्षा ही भावना वाढीस लागते आहे, हे गंभीर आहे. देश एकविसाव्या शतकात जात आहे, माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, असे पालुपद प्रत्येकवेळी लावत असताना आम्हाला एखादे काम करताना ते निर्दोष, अचूक का करता येऊ नये.
जमिनीतून पाणी वर येत आहे, हे नैसर्गिक आहे, तर ते रोखण्याचा किंवा तळमजला न करण्याचा निर्णय का होत नाही? बोगद्याकडे उतार असल्याने पाणी येणार हे सामान्यांना सहजपणे उमगते, ते आमच्या अभियंत्यांना काम झाल्यावरही लक्षात का येऊ नये, असे उद्विग्न करणारे प्रश्न पडत राहतातच.
जनतेच्या करातून विकासकामे होत असतात. मग ही विकासकामे चांगली व्हावीत, टिकाऊ असावीत अशी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे आहे काय? ब्रिटिशकालीन वास्तू या ऐतिहासिक ठेवा म्हणून आम्ही जपतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ले आजही वैभव टिकवून आहे. मग आमची एखादी सार्वजनिक इमारत, पूल, रस्ता, बोगदा असा टिकावू का असत नाही? माहिती अधिकार, जनहित याचिका, लोकप्रतिनिधी असे सगळे असताना हे घडते कसे, याचे गमक काय?
धाक का वाटत नाही?
कर्तव्यात कसूर केल्यानंतरही कारवाईला विलंब होत असल्याने कायद्याचा आणि प्रशासनाचा धाक राहिलेला नाही, हे खरे कारण आहे. भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर, गुन्हा घडल्यानंतर आरोपीला वाचविण्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न होतात. जात-पात, धर्म, प्रांत अशी किनारदेखील त्या विषयाला जोडली जाते. अन्यायाची भावना व्यक्त होते. समाजाची खºया अर्थाने दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असतो.

Web Title: Why do we feel British?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.