नव्या पिढीने डॉ.बाबासाहेब यांचे विचार समजून घ्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:25 PM2018-04-14T13:25:08+5:302018-04-14T13:25:08+5:30

चर्चासत्रातील सूर

Understand Dr. Babasaheb's views | नव्या पिढीने डॉ.बाबासाहेब यांचे विचार समजून घ्यावेत

नव्या पिढीने डॉ.बाबासाहेब यांचे विचार समजून घ्यावेत

Next
ठळक मुद्देबाबासाहेबांच्या आठवणींना दिला उजाळासर्व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा

सुशील देवकर / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १४ - नव्या पिढीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घेतले पाहिजेत. केवळ नोकरी मिळविण्याचे साधन म्हणून शिक्षणाकडे न पाहता ज्ञान मिळविण्यावर भर दिला पाहिजे, असा सूर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’तर्फे आयोजित चर्चासत्रात आंबेडकर चळवळीतील मान्यवरांनी व्यक्त केला.
‘लोकमत’ कार्यालयात झालेल्या चर्चासत्रात केंद्रीय जल आयोगाचे संचालक मिलिंद पानपाटील तसेच डॉ. मिलिंद बागुल, मुकुंद सपकाळे, मालती गायकवाड, अनिल सुरडकर, राजेंद्र पारे, बापूराव पानपाटील, ज्ञानेश्वर सपकाळे, डी.एम. अडकमोल, अनिल अडकमोल, यशवंत मोरे हे सहभागी झाले होते.
पिचलेल्या समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून दिले बळ
डॉ. मिलिंद बागुल म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला अतिशय महत्त्व दिले. जी व्यक्ती शिक्षण घेते, त्या व्यक्तीचा, तिच्या कुटुंबाचा अथवा परिसराचाच विकास होईल असे नाही तर पर्यायाने देशाचाही विकास होईल, असे डॉ.बाबासाहेबांचे ठाम मत होते. शतकानुशतके पिचलेल्या समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून बळ देण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. भारतीय लोकशाहीला मजबूत केले.
वर्ग व जातीविहीन समाजनिर्मितीचे बाबासाहेबांचे स्वप्न
मुकुंद सपकाळे म्हणाले की, बाबासाहेबांनी १९१३ मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात असताना कास्टिंग इंडिया हा प्रबंध लिहिला. डॉ.केतकर यांनी जाही संस्थेसंदर्भात जी मते मांडली होती, ती त्यांनी त्यातून खोडून काढली. वर्ग व जातीविहीन समाजनिर्मिती व्हायला हवी, असे बाबासाहेबांचे मत होते. बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांचे ग्रंथ हे सामाजिक क्रांतीचे शस्त्र आहेत. त्याचे चिंतन बुद्धिवंतानी केले पाहिजे. शिक्षित वेगळे आणि विद्वान वेगळे. शिक्षितांचे रूपांतर विद्वानांमध्ये झाल्याशिवाय सामाजिक क्रांती होणार नाही, असे बाबासाहेबांचे मत होते.
संपूर्ण विश्वात बाबासाहेबांच्या ज्ञानाचा ठसा
मिलिंद पानपाटील म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात भारतातच नव्हे संपूर्ण विश्वात बाबासाहेबांच्या ज्ञानाचा ठसा उमटलेला दिसतो. बाबासाहेबांनी १९५६ पर्यंत जो इतिहास रचला, जी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यामाध्यमातून भारतच नव्हे विश्वाला मार्गदर्शन होत आहे. आज कोणत्याही समस्येला सामोरे जात असताना या ग्रंथांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. बाबासाहेबांनी लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी जिवाचे रान केले. समाजासाठी आयुष्य झोकून दिले. बाबासाहेबांना अपेक्षित समाजरचना, त्यांना अपेक्षित असलेला भारत व जग निर्माण करण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजे. संपूर्ण विश्व बुद्धमय व्हावे, सदाचाराचे साम्राज्य निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न करायला हवेत.
पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रवेशाने प्रबोधनाच्या युगास प्रारंभ
ज्ञानेश्वर सपकाळे म्हणाले की, प्राचीन समाजात वर्णभेद होता. शूद्र, अतिशूद्र व स्त्रियांना शिक्षण नाकारले होते. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटली होती. मनुष्य धर्मातच अडकला होता. आधुनिक प्रबोधन नव्हते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रवेशामुळे प्रबोधनाचे युग सुरू झाले. महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर मांडलेली मोफत, सक्तीच्या शिक्षणाची मागणी बाबासाहेबांनी सायमन कमिशनसमोर मांडली. त्यामुळेच मुंबई प्रांतात मोफत व सक्तीचे शिक्षण सुरू झाले.
१५० देशात बाबासाहेबांची जयंती
डी.एम. अडकमोल म्हणाले की, बाबासाहेबांकडे भारतातच नव्हे तर परदेशातही मोठ्या आदराने पाहिले जाते. १५० देशात त्यांची जयंती साजरी होते. जिल्ह्यातही बाबासाहेब अनेकदा येऊन गेले. कडगाव येथील युवक बाबासाहेबांचा बॉडीगार्ड होता. आजच्या युवा पिढीने बाबासाहेबांना समजून घ्यावे. आपसातील भेद संपवून एकत्र यावे. बाबासाहेबांना तेच अपेक्षित होते.
प्रत्येक स्त्रीने माता रमाई बनण्याचा प्रयत्न करावा
मालती गायकवाड म्हणाल्या की, बाबासाहेबांना समाजातील स्त्रीचे जे स्थान अभिप्रेत होते, ते आज शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रीला मिळालेले बघायला मिळते. पूर्वी चूल आणि मूल एवढेच तिचे विश्व होते, त्यातून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच त्यांना बाहेर काढले. प्रत्येक स्त्रीने माता रमाई बनण्याचा प्रयत्न करावा.
सर्व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा
अनिल अडकमोल म्हणाले की, सर्व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेब झटले. त्यांचा शिक्षणावर अधिक भर होता. तुमच्याकडे २ रुपये असतील तर १ रुपयाची भाकर आणि १ रुपयाचे पुस्तक घ्या. पुस्तक तुम्हाला जगायला शिकवेल, अशी शिकवण बाबासाहेब कार्यकर्त्यांना देत. बाबासाहेब कार्यकर्त्यांना कसे समजावून सांगता येतील, यासाठी प्रयत्न करीत आहोत.
बौद्ध धर्म स्वीकारल्याने विकास
बापूराव पानपाटील म्हणाले की, बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला. गावकुसाबाहेरील लोकांना भाकरीचा प्रश्न होता. मात्र बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचा विकास झाला. यशवंत मोरे म्हणाले की, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली क्रांती झाली नसती तर आज बदल दिसला नसता. अनेक राजे, महाराजे होऊन गेले. मात्र या दोघांचे ध्येय शिक्षणात बदल झाला पाहिजे. चांगल्या वातावरणात प्रगती होते.
बाबासाहेबांना अपेक्षित शिक्षण व आजच्या शिक्षणात तफावत
राजेंद्र पारे म्हणाले की, बाबासाहेबांनी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेतले. सामाजिक, धार्मिक, राजकीय, ऐतिहासिक असे सर्व विषयात ज्ञान मिळविले. मूळ विषयाचा ते सखोल अभ्यास करून ज्ञानार्जन करीत. आजचे शिक्षण व बाबासाहेबांना अपेक्षित असलेले शिक्षण यात तफावत आहे.
बाबासाहेबांमुळेच मिळाली ८ तासांची ड्युटी
अनिल सुरडकर म्हणाले की, बाबासाहेबांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविले. आधी १० तास काम करावे लागत होते. ते ८ तासांवर आणले. आठवड्यातून १ दिवस विश्रांती मिळावी म्हणून हक्काची सुटीही बाबासाहेबांमुळेच मिळाली.

Web Title: Understand Dr. Babasaheb's views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.