जळगाव जिल्ह्यात ५ वाघांचे मृत्यू होऊनही वनविभाग ढीम्मच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:13 PM2018-08-13T12:13:46+5:302018-08-13T12:15:04+5:30

‘लालफिती’चा फटका

Though five tigers die in Jalgaon district, | जळगाव जिल्ह्यात ५ वाघांचे मृत्यू होऊनही वनविभाग ढीम्मच

जळगाव जिल्ह्यात ५ वाघांचे मृत्यू होऊनही वनविभाग ढीम्मच

Next
ठळक मुद्देकॉरिडॉरचा प्रस्ताव ५ वर्षांपासून धूळखात१० वर्षात सातत्याने वाघांचे मृत्यू

जळगाव : सशक्त व जैवविविधता संपन्न जंगलांअभावी अनेक ठिकाणी वाघांचे अस्तित्व लुप्त होत चालले असताना जिल्ह्यात मात्र वाघांचे अस्तित्व गेल्या अनेक वर्षांपासून बऱ्यापैकी आहे. परंतु गेल्या दहा वर्षात ५ वाघांचा वेगवेगळ्या घटनात मृत्यू होऊनही वाघांसाठी वनक्षेत्र वाढविण्याचा, कॉरिडॉर निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे ५ वर्षांपासून धूळखात पडून आहे. वनविभाग आणि लोकप्रतिनिधींची अनास्था यास कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
मुक्ताईनगर तालुुक्यात पुन्हा एका वाघाचा मृतदेह रविवारी आढळून आल्याने वाघांच्या सुरक्षिततेसह अनेक मुद्दे उपस्थित झाले आहे.
संरक्षित वनक्षेत्रासाठीचे प्रस्ताव बनविणे सुरू - उपवनसंरक्षक
जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक डी.डब्ल्यू. पगार म्हणाले की, मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या प्रयत्नांनी हा परिसर वाघांसाठी संरक्षित वनक्षेत्र (टायगर कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) म्हणून घोषित होऊ शकले.
आता या जागेला सलग तारेचे कुंपण (मेटल फेन्सींग) किंवा सोलर कुंपण करण्याचा सुमारे ३३.२० लाखांचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. तसेच रस्ता दुरूस्ती, पाणवठे व वनक्षेत्र वाढविण्याचे प्रस्ताव तयार होत आहेत. संरक्षित वनक्षेत्र विकसित झाले की ‘धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्र’ (क्रिटीकल टायगर हॅबिटॅट) आपोआपच तयार होईल. मात्र ‘धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्र’ साठी प्रस्ताव अद्याप शासनाकडे पाठविलेला नसल्याचे सांगितले.
वाघांच्या सुरक्षेसाठी जनआंदोलन
वन्यजीव संरक्षण संस्थेचे संस्थापक बाळकृष्ण देवेरे यांनी सांगितले की, घटनास्थळी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सभासदांनी धाव घेतली. वाघाचा मृत्यू ही अतिशय गंभीर बाब आहे. सद्यस्थितीत वढोदा रेजंमधील वाघ सुरक्षित नाहीत. वाघांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबविण्यात यावी. कायमस्वरूपी गस्ती पथकाची निर्मिती करण्यात यावी, तसेच हे क्षेत्र तात्काळ क्रिटीकल वाईल्ड लाईफ हॅबीटॅट म्हणून घोषित करावे, यासाठी शासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे. परंतु प्रस्ताव लालफितीत अडकल्याने वाघांच्या जीवावर बेतले आहे. आता निर्णय न झाल्यास वाघांच्या आणि वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी जनआंदोलन उभारण्यात येईल. घटनास्थळी वन्यजीव संस्थेचे राहुल सोनवणे, सतीश कांबळे, वन्यजीव अभ्यासक रविंद्र फालक, स्कायलेब डिसुजा, वासुदेव वाढे, प्रसाद सोनवणे, बाळकृष्ण देवरे यांनी भेट दिली.
वाघाच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय
जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक डी.डब्ल्यू. पगार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यात पूर्णा नदीपात्रात वाघाचा मृत्यू झाल्याचे समजले असून तिकडेच चाललो असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. मात्र मृत्यू कसा झाला? घातपात आहे का? याबाबत विचारणा केली असता त्याबाबत माहिती नसून तेथे गेल्यावरच कळेल असे सांगितले. त्यामुळे सायंकाळी उशीरा पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वाघाला पाण्यातून काढण्यात आले असून चार-पाच दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असावा. त्याचा मृतदेह कुजला आहे. वाघाच्या कमरेला नायलॉनची दोरी बांधलेली आढळून आली. मात्र घातपात आहे की नाही? ही बाबत तपासानंतरच स्पष्ट होईल.
वढोद्यात ८ तर यावल वनक्षेत्रात ४ वाघ
जिल्ह्यात वढोदा वनक्षेत्रात ८ तर यावल वनक्षेत्रात ४ असे १२ वाघ आहेत. त्यात २-३ वाघीण आहेत. त्यामुळे प्रजनन प्रक्रिया सुरू राहून वाघांच्या संख्येत भविष्यात आणखी वाढ होणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना हक्काचे वनक्षेत्र मिळाले पाहिजे. त्यासाठी वनक्षेत्र वाढविणे, कॉरिडॉर निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. जळगाव व यावल वनविभागाने २०१३ मध्येच ‘मेळघाट- वढोदा- यावल- अनेर’ कॉरिडॉरसाठी प्रस्ताव दिला आहे. मात्र त्यावर गेल्या ५ वर्षात काहीही कार्यवाही झालेली नाही.
वढोदा वनक्षेत्र अभयारण्य घोषित करणे आवश्यक... केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या सक्षमीकरण समितीचे सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी सांगितले की, वढोदा वनक्षेत्रात ८ वाघ आढळले आहेत. तर दुसरीकडे जेथे केवळ १ वाघ आहे, असे वनक्षेत्र देखील भविष्यात वाघांची संख्या वाढेल, या उद्देशाने अभयारण्य म्हणून घोषित केल्याची उदाहरणे आहेत. असे असताना वढोदा वनक्षेत्र अभयारण्य घोषित करण्याची गरज आहे. तरच तेथे व्याघ्र प्रकल्प करता येईल. शासन व वनविभाग मात्र प्रयत्न करताना दिसत नाही.
वाघाचा मृत्यू चिंताजनक बाब
एकीकडे वाघ लुप्त होत असताना जिल्ह्यातील जळगाव व यावल वनक्षेत्रात वाघांची संख्या वाढत आहे. असे असताना या वाघांसाठी संरक्षित वनक्षेत्र निर्माण करणे अपेक्षित असताना त्याकडे वनविभाग व शासनाचे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे सातत्याने वाघांचे मृत्यू होण्याचे प्रकार घडत आहेत.
गत दहा वर्षात ५ वाघांचे मृत्यू झाले असून त्यात एका बछड्याचाही समावेश आहे. २००९ च्या काळात कुºहा वढोदा रस्त्यावर पट्टेदार वाघाचा एक महिन्याचा छावा अपघातात दगावला होता.
त्यानंतर १ एप्रिल २०१६ रोजी वायला शिवारात १५ वर्षांचा पट्टेदार वाघ तोंड फाटलेल्या अवस्थेत मृत आढळून आला होता.
२३ मार्च २०१८ सुकळी शिवारात १६ वर्ष वयाची वाघीण मृत्यू पावल्याचे आढळून आले. तर यावल वनविभागाच्या हद्दीतही तिढ्या भागात वाघीणीची हत्याचा झाल्याची घटना घडली होती. मात्र ती सिद्ध होऊ शकली नव्हती. इतक्या घटना एकामागोमाग एक घडत असतानाही केंद्र व राज्य शासन व वनविभाग वाघांच्या संरक्षणाच्यादृष्टीने प्रस्ताव मार्गी लावण्यास गंभीर नसल्याचेच चित्र दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यात वाघांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या असून यातील काही घटना नैसर्गिक नाहीत. त्यामुळे वाघांचा मृत्यू चिंताजनक बाब आहे. -सुनील रिठे, व्याघ्र अभ्यासक

Web Title: Though five tigers die in Jalgaon district,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.