अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे फौजदाराच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 01:02 AM2018-09-02T01:02:44+5:302018-09-02T01:03:03+5:30

चोरट्यांचे पोलिसांना आव्हान : मेडीकल दुकानही फोडले

Thieves in the house of a man in Mangalore, Amalner taluka | अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे फौजदाराच्या घरी चोरी

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे फौजदाराच्या घरी चोरी

Next

अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील मंगरूळ येथे पोलीस उपनिरीक्षकाच्या घरासह मेडिकल दुकान फोडून सुमारे ३७ हजारांचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १ सप्टेंबर रोजी पहाटे घडली.
मंगरूळ येथे हर्षल धर्मराज सैंदाणे यांचे मेडिकल दुकानाच्या शटरचे कुलूप कटरने कापून दुकानातील ३७ हजार रुपये रोख आणि चांदीची लक्ष्मीची मूर्ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तर समोरच असलेल्या पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या घराचे कुलूपही चोरट्याने कटरने कापून दुसऱ्या मजल्यावरील कपाटातील वस्तू चोरून नेल्या आहेत . मात्र घरातील व्यक्ती गावाला गेलेल्या असल्याने तेथे काय चोरले गेले हे समजू शकले नाही.
पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील , विजय साळुंखे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी हर्षल सैंदाणे यांच्या फिर्यादीवरून भादंवि ४५७ , ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एएसआय सुभाष साळुंखे करीत आहेत.
जळगावात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या
जळगाव शहरात आदर्श नगरातील मकरा पार्कमध्ये दोन ठिकाणी तर समता नगरात एक अशा तीन ठिकाणी एकाच रात्री घरफोड्या झाल्याच्या घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्या. समता नगरात विमलबाई सोनार (वय ७०) यांच्या बंद घरात खिडकीची जाळी काढून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व ३५ हजार रुपये रोख असा अडीच लाखाच्यावर मुद्देमाल लांबविला.
समता नगरात विमलबाई सोनार या एकट्या राहतात. मध्यरात्री चोरट्यांनी खिडकीची जाळी उचकवून घरात प्रवेश केला. सुटकेसमध्ये ठेवलेले ७ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, ७ ग्रॅमची अंगठी व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी व ३५ हजार रुपये रोख काढून घेत चोरट्यांनी ही सुटकेस बाहेरच्या खोलीत फेकून दिली होती. विमलबाई सकाळी उठल्या असता त्यांना सुटकेस बाहेर व उघडी दिसली. घरातील अन्य वस्तूही त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विमलबाई यांचे नातेवाईक संजय सोनार यांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
आदर्श नगरातील मकरा पार्कमध्ये अनिल रत्नाकर शिंदे व कैलास रामदास पाटील यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोन्ही घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. अनिल शिंदे हे पुणे येथे तर कैलास पाटील हे अष्टविनायक दर्शनाला गेलेले आहेत.
दोन्ही कुटुंब परिवारासह बाहेरगावी असल्याने घरांना कुलूप होते. सकाळी संजय चव्हाण यांना शिंदे यांच्या घराचा दरवाजा उघडा व कुलुप तुटलेले दिसल्याने त्यांनी शिंदे यांच्याशी संपर्क साधला. घरात रोकड किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Thieves in the house of a man in Mangalore, Amalner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.