जळगाव जिल्ह्यात ७८ गावांचा पाणीपुरवठा बंद, ८ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:45 PM2018-02-17T12:45:08+5:302018-02-17T12:50:10+5:30

सामूहिक योजनांचा वीज पुरवठा खंडित केल्याने नागरिकांचे हाल

Stopped supply of 78 villages | जळगाव जिल्ह्यात ७८ गावांचा पाणीपुरवठा बंद, ८ कोटींची थकबाकी

जळगाव जिल्ह्यात ७८ गावांचा पाणीपुरवठा बंद, ८ कोटींची थकबाकी

Next
ठळक मुद्दे१२ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीतसर्वच गावातील नागरिकांचे हाल

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १७ - वीज बिलांच्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडित केल्याने जिल्ह्यातील सामूहिक पाणी पुरवठा योजनेतील ७८ गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे या सर्वच गावातील नागरिकांचे हाल होत आहेत.
विविध ठिकाणच्या पाणी योजनेची वीज बिलांची थकबाकी एकूण ८ कोटी ६० लाख ७२ इतकी झाली आहे. याबाबत वीज वितरण विभागाने वारंवार कळवूनही वीज बिले न भरल्याने शेवटी जवळपास गेल्या महिनाभरापासून या विविध ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने पाणी पुरवठा बंद पडला आहे.
अशी आहे बिलांची थकबाकी
जामनेर तालुक्यातील तोंडापूर पाणी योजनेत १७ गावे असून सुमारे १४ लाखांवर थकबाकी आहे. याचप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील कळमडू पाणी योजनेत ३ गावे असून ८ लाख ७५ हजार थकबाकी झाली आहे. आडगाव ता. एरंडोल योजनेत १६ गावांचा समावेश असून २८ लाख बाकी आहे. तर भुसावळ, मुक्ताईनगर व बोदवड या ८० गाव पाणी योजनेत ३४ गावे असून २ कोटी ९५ लाख रुपये थकबाकी आहे. वरणगाव ता. भुसावळ योजनेची १७ लाख थकबाकी झाली असून ५ गावांना फटका बसला आहे.
१२ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत
सामूहिक पाणी योजनांकडून जवळपास ११ कोटी ९४ लाख रुपये पाणीपट्टी वसुली व्हायची आहे. वसुली होत नसल्याने वीज बिले भरणे शक्य नसल्याने ही वेळ आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी पाणीपट्टीची थकबाकीही लवकरात लवकर भरणे आवश्यक आहे.
हातपंप व विहिरींकडे धाव: पाणी पुरवठा बंद झाल्याने अनेक गावांमध्ये हातपंप आणि विहिरींवर पाण्यासाठी धाव घ्यावी लागत आहे. तर काही ठिकाणी विशेष राष्ट्रीय पेयजल योजनेचा आधार मिळाला आहे. जुने स्त्रोत पुन्हा वापरात आणले जात आहे. मात्र या समस्येवर लवकर तोडगा काढावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Stopped supply of 78 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.