Lok Sabha Election 2019 : जळगाव जिल्ह्यात आज प्रचार तोफा थंडावणार, प्रशासकीय तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:16 PM2019-04-21T12:16:21+5:302019-04-21T12:17:13+5:30

नवीन खासदार निवडीसाठी उरले केवळ ४८ तास

Presentation in Jalgaon district will stop the gun, administering the preparation and speed | Lok Sabha Election 2019 : जळगाव जिल्ह्यात आज प्रचार तोफा थंडावणार, प्रशासकीय तयारीला वेग

Lok Sabha Election 2019 : जळगाव जिल्ह्यात आज प्रचार तोफा थंडावणार, प्रशासकीय तयारीला वेग

Next

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा रविवार, २१ एप्रिल शेवटचा दिवस असून गेल्या १३ दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी ६ वाजता थंडावणार आहे. मतदानासाठी आता केवळ ४८ तास शिल्लक असून २३ रोजी मतदार राजा नवीन खासदाराची निवड करणार आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा प्रशासकीय तयारीलाही वेग आला आहे.
१३ व्या लोकसभेसाठी १० मार्च रोजी निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाली. युती, आघाडी होण्यासह उमेदवारी घोषित करण्यासाठी या काळात पक्षांना मोठी कसरत करावी लागली. यंदा तर अधिसूचना जारी होण्यासाठी काही दिवस शिल्लक असतानादेखील अनेक पक्षांकडून उमेदवारी जाहीर झालेली नव्हती तर भाजपच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार बदलविण्यात आला. त्यामुळे यंदा सुरुवातीपासूनच अधिकच चुरस दिसून आले.
२८ मार्च रोजी अधिसूचना जारी होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली व ४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झाले. ५ एप्रिल रोजी छाननीच्या दिवशी भाजपच्या अगोदर घोषित करण्यात आलेल्या उमेदवार स्मिता वाघ यांचा अर्ज अवैध ठरला. त्यानंतर ८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर जळगावसाठी १४ तर रावेरसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत.
तेव्हापासून प्रचाराचा धडाका सुरू झाला. त्यामुळे जळगाव शहरासह जळगाव व रावेर अशा दोन्ही लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापले होते.
स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाका
उमेदवारी जाहीर झाल्यापासून सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असतानाच जिल्हाभरात स्टार प्रचारकांच्याही ठिकठिकाणी सभा झाल्या़ यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमळनेर, रावेर, जळगाव अशा तीन ठिकाणी सभा घेतल्या़ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भुसावळ येथे सभा होण्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जिल्हाभरात प्रचारात सहभागी असल्याचे चित्र आहे. भाजपकडूनच पंकजा मुंडे यांच्या जळगाव व चोपडा येथे सभा झाल्या तर राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार छगन भुजबळ, आमदार जितेंद्र आव्हाड, चित्रा वाघ, फौजिया खान आदींच्या सभा झाल्या़ तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची कुºहा येथे सभा झाली़ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भुसावळ व जळगाव येथे प्रचार सभा झाल्या. यासोबतच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी २१ रोजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची चाळीसगाव येथे सभा होणार आहे.
प्रशासनाकडून जय्यत तयारी
निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून त्यासाठी कर्मचारी नियुक्ती, एसटी बसेस्ची व्यवस्था करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. यामध्ये जळगाव मतदार संघासाठी १० हजार ५३७ तर रावेर मतदार संघासाठी ८ हजार ३८ असे एकूण १८ हजार ५७५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
तीन तासात काढावे लागणार प्रचाराचे साहित्य
२१ रोजी संध्याकाळी ६ वाजता प्रचार संपल्यानंतर तीन तासात सर्वच उमेदवार, राजकीय पक्षांना आपापले प्रचार साहित्य काढून घ्यावे लागणार आहे. संपर्क कार्यालय असो अथवा कोठेही सार्वजनिक ठिकाणी प्रचार होणार नाही, असे सर्व साहित्य काढून घ्यावे लागणार आहे.
सोशल मीडियावरील प्रचारालाही बंदी
प्रचार थांबल्यानंतर सोशल मीडियावरदेखील प्रचार करता येणार नाही. या व्यतिरिक्त वृत्तपत्रात जाहिरात द्यायची असल्यास ती माध्यम प्रामाणिकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे. यात २१ रोजी झालेल्या कार्यक्रमांचे वृत्त मात्र २२ रोजीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करता येणार असल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले.
४८ तासानंतर २६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात
जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघातील १४ व रावेर मतदार संघातील १२ अशा एकूण २६ उमेदवारांचे भवितव्य २३ रोजी मतदान यंत्रात बंद होणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क मतदारांना बजावता येणार आहे.

Web Title: Presentation in Jalgaon district will stop the gun, administering the preparation and speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.