ठळक मुद्दे गस्तीवर कर्मचारी वाढविल्याचा फायदा जबरी चोरीचा गुन्हा दाखलचोरट्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,९ : हाताची घडी घालून शेजारच्या प्रवाशाच्या शर्टाच्या खिशात असलेला मोबाईल चोरताना रईस उर्फ बाबा समशेर खान पठाण (वय १८, रा. गेंदालाल मील,जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या साध्या गणवेशातील पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता नवीन बसस्थानकात रंगेहाथ पकडले. पोलिसांच्या हाताला झटका देऊन पसार होण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर येथील रहिवाशी साबीरखॉ मुनीरखॉ पठाण (वय ६०) हे तहसील कार्यालयात अवर कारकून म्हणून निवृत्त झाले आहेत. पेन्शनच्या कामासाठी ते गुरुवारी जळगावात आले होते. दिवसभर काम आटोपल्यानंतर सायंकाळी ते बसस्थानकात आले. सहा वाजेच्या जळगाव-अमळनेर बसमध्ये चढत असताना रईस हा हाताची घडी घालून त्यांच्या शेजारी थांबून बसमध्ये चढण्याचे नाटक करीत होता. रईस हा पोलिसांच्या रेकॉर्डवर असल्याने तेथे ड्युटीला असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे सूरज पाटील व दीपक पाटील यांनी त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले होते. हाताची घडी असताना साबीर खॉ यांच्या शर्टाच्या खिशातून त्याने अलगद मोबाईल काढला. हा प्रकार साबीर खॉ यांच्या लक्षातही आला नाही. ते बसमध्ये चढले तर पोलिसांनी चोरट्याला पकडून ठेवले. त्यानंतर सूरज पाटील यांनी साबीरखॉ यांना बसमधून उतरवून मोबाईल चोरीचा प्रकार लक्षात आणून दिला. या चोरट्याला तेथून स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले.


वाढत्या चो-यांमुळे वाढविली गस्त
बसस्थानकातून दरराज मोबाईल व पैसे चोरी जाण्याचे प्रकार घडत असल्याने अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी बसस्थानकात गर्दीच्या वेळी कर्मचारी वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी त्यांचे साध्या गणवेशातील दोन कर्मचारी बसस्थानकात तैनात केले आहेत. त्याचा परिणाम म्हणून हा चोरटा हाती लागला. कुराडे यांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनलाही गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला  त्याच्याविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.