खड्डे उठले जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:35 PM2019-07-15T14:35:26+5:302019-07-15T14:42:17+5:30

दीड महिन्यात रस्त्यांनी घेतला पाच जणांचा बळी

PATH RIED Jeevar | खड्डे उठले जीवावर

खड्डे उठले जीवावर

Next

जळगाव : शहरातील रस्त्यांनी गेल्या दीड महिन्यात पाच जणांचे बळी घेतले. शहरात दळण-वळणासाठी असलेले रस्ते नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. त्यामुळे घरुन कामाला निघालेला व्यक्ती घरी परत येईलच, याची कुठलीही शाश्वती राहिलेली नाही. खराब रस्ते, त्यात पडलेले मोठ मोठे खड्डे यामुळे वाहन चालविणे काय, पायी चालणेही कठीण झाले आहे. रोज होणारे छोटे- मोठे अपघात यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. तरीही लोकप्रतिनिधी काही एक हालचाल करायला तयार नाहीत...
अशा आहेत दीड महिन्यातील महत्वाच्या घटना
महामार्गावर विद्युत सहायक ठार
- मित्राला सोडून घरी परत येत असताना दुचाकी कारवर आदळून अविनाश बापू पाटील (३०, अयोध्या नगर, जळगाव, मुळ रा.मोहाडी, ता. धुळे) हा तरुण विद्युत सहायक जागेवरच ठार झाल्याची घटना जून महिन्यात मध्यरात्री बारा वाजता महामार्गावर विद्युत कॉलनीजवळ घडली होती.
दुचाकी घसरुन तरुण ठार
- राजेंद्र दिलीप पाटील (३३, रा.खेडी, ता.जळगाव) या तरुणाचा १ जून रोजी राका फर्निचरजवळ दुचाकी घसरुन अपघात झाला होता. तीन दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला होता.
आमदारांच्या कारला अपघात
-आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या वाहनाला २ जून रोजी पाळधी, ता. धरणगावनजीक अपघात झाला होता. या अपघातात त्यांचे वाहन डीपीच्या तारांवर चढल्याने आमदारांनी चार फूट उंचावरून उडी घेत वाहनातून बाहेर पडल्याने ते बचावले होते.
दुचाकी अपघातात सायकलस्वार वृध्द ठार
- जयप्रकाश नारायण चौकातून सायकलने जाणाऱ्या हुसेन युसुफ अली यांना मागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जोरदार धडक दिल्याने ते ठार झाले होते. २९ मे रोजी ही घटना घडली होती.
डंपरच्या धडकेत सायकलस्वार ठार
- बॅँकेत पेन्शन घेण्यासाठी सायकलीने जात असलेल्या मुरलीधर वेडू शिंदे (७३, रा.आयोध्या नगर, जळगाव, मुळ रा.मोहाडी, ता.धुळे) यांना समोरुन माती घेऊन येत असलेल्या भरधाव डंपरने चिरडल्याची घटना ११ जून रोजी एस.टी.वर्कशॉपजवळ घडली होती. शिंदे यांच्या डोक्यावरुन टायर गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन ते जागीच गतप्राण झाले होते.
चारचाकीच्या धडकेत विद्यार्थी जखमी
- रस्त्याने सायकलीने जात असलेल्या सुमीत महेंद्र माळी (१२, रा. रवीकिरण पार्क,पिंप्राळा) या बालकास मागून आलेल्या चारचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना जून महिन्यात घडली होती. या अपघातात सुमीतच्या पायास गंभीर दुखापत झाली आहे.
उद्योजकाला मिनी ट्रकने चिरडले
- द्वारका इंडस्ट्रीजचे संचालक अनिल श्रीधर बोरोले (६८, रा़ पोस्टल कॉलनी) यांची दुचाकी चित्रा चौकाजवळील खड्ड्यामुळे उधळली आणि ते दुचाकीसह रस्त्यावर पडले़ त्याचवेळी मागून येणाºया मिनी ट्रकने त्यांना चिरडले आणि त्यांचा करुण अंत झाला. १३ जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली.
--------
अजिंठा चौफुली ते टॉवर चौकापर्यंत ३४ खड्ड्यांचा धोका
शहर विकासासाठी कोट्यवधींच्या निधीच्या कागदोपत्री गप्पा ठोकणाºया महापालिकेच्या हद्दीतील टॉवर चौक ते अजिंठा चौफुलीपर्यंत प्रवास करणाऱ्यांना नियमित ३४ खड्ड्यांमधून वाट काढत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे़ प्रचंड रहदारी असलेला हा रस्ता जीवघेणा ठरू लागला आहे़ छोट्या वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदीच हवी, असा सूर आता वाहनधारकांमधून उमटू लागला आहे़
या धोकादायक खड्डयांपासून सावधान
-अजिंठा चौफुलीकडे जात असताना जुन्या बसस्थानकासमोरील ओबड- धोबड रस्ता धोकादायक आहे, या ठिकाणी काळजी घ्या़
-थोड पुढे गेल्यानंतर डाव्या बाजुला मोठा खड्डा आहे त्यापासून बचाव करा
-चित्रा चौक ओल्यांडल्यानंतर अगदी थोड पुढे गेल्यावर एक भला मोठा खड्डा आहे तो अत्यंत धोकादायक आहे़
-बेंडाळे चौकात सिग्नल ओलांडल्यानंतर दोन धोकदायक खड्डे आहेत
-ट्रॅव्हल्सच्या पार्किंगजवळ असलेल्या हॉटेलच्या अगदी समोर एक मोठा खड्डा रस्त्याच्या मधोमध आहे, त्यावर लक्ष ठेवा वेग जोरात असल्यास अपघाताची शक्यता
-अजिंठा चौफुलीवर रस्त्याच्या डाव्या बाजूला भला मोठा खड्डा आहे त्यात वाहन गेल्यास उलटू शकते़
धोकादायक स्पॉट
एसटीवर्क शॉपचा पॉइंट सर्व वाहनधारकांना अगदीच धोकादायक वाटतो़ या ठिकाणी तीन ठिकाणाहून वाहनांची वर्दळ सुरू असते़ या ठिकाणी एका मिनिटाला ८० वाहने धावतात, (सुटी नसलेल्या दिवशी हा आकडा वाढेल) यात रिक्षा व दुचाकींचा अधिक समावेश असतो़ या पाठोपाठ नेरी नाका हा धोकादायक असल्याचे काही वाहनधारकांचे म्हणणे आहे़
चित्रा चौकात चारही बाजूने वाहनांची वर्दळ
चित्रा चौकातील एका भल्या मोठ्या खड्डयाने अनिल बोरोले यांचा बळी घेतला़ या चित्रा चौकात रविवारी सर्व्हेक्षण केले असता दुपारी दीड वाजेच्या सुमारास चारही बाजूने वाहनांची प्रचंद वर्दळ होती़ एका मिनिटात या चौकात ७८ वाहने जमा झाली होती़ या ७८ वाहनांमध्ये चार अवजड वाहनांचा समावेश होता़ ही वाहने छोट्या वाहनांन अगदीच चिटकून धावत असतात त्यामुळे थोडाही बॅलन्स बिघडला तर थेट वाहनांच्या चाकाखाली येऊन अपघाताची शक्यता असते़
-------
गल्ली-बोळातील रस्तेही ठरताहेत जीवघेणे
जळगाव : विकासाचे आश्वासन देत महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळविणाºया भाजपने १० महिने उलटले तरी कोणते ठोस काम केले ? असा प्रश्न उपस्थित करीत मनपाच्या ठिसाळ कारभारामुळे शहरातील रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. यामुळे आता महामार्गासह शहरातील गल्ली-बोळातील रस्तेही जीवावर उठले आहे, असा आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे.
चित्रा चौकात खड्ड्यामुळे अपघात होऊन उद्योजक अनिल बोरोले यांचा बळी गेला. त्यामुळे मनपाच्या कारभाराबाबत विविध क्षेत्रातून संताप व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनपातील काही नगरसेवकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी सत्ताधाºयांच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
आश्वासने हवेत विरली
विकास कामांचे आश्वासन देऊन भाजपने मनपामध्ये सत्ता मिळविली. विकासासाठी ‘करोडों’ची उड्डाणे घेण्याचे स्वप्न शहरवासीयांना दाखविली गेली व वर्षभरात शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचे सांगितले गेले. मात्र आता सत्ता मिळवून १० उलटले तरी विकास कोठे झाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विकासाचे पोकळ आश्वासने हवेत विरली असल्याचेही नगरसेवकांचे म्हणणे आहे.
पावसाळ्यात कशी जाग आली?
अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांची अत्यंत दूरवस्था झाली आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही रस्त्यावरून वाहने चालविणे जिकरीचे ठरत आहे. पावसामुळे तर अधिकच हाल होतात. त्यात अमृत योजनेच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यासह वेगवेगळ््या ठिकाणी असलेले खड्डे बुजविण्यासाठी भर पावसाळ््यात सत्ताधाºयांना जाग आली का, पावसाळ््यापूर्वीच ही कामे का केली नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
---------------
आता जनआंदोलनाची गरज सोशल मीडियावर संताप
केवळ बोलून होणार नाही आता जनआंदोलनाची गरज असल्याचा सूर सोशल मीडियावर उमटला़ नागरिकांनी या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे़ पोलीस झोपले होते का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे़
नागरिकांनी सोशल मीडियावर मांडले मुद्दे
-हा वर्दळीचा चौक आहे. मात्र, घटनेच्या वेळी वाहतूक पोलीस हजर नव्हते़ घटना झाल्यानंतर तब्बल २५ मिनीटे उशीरा आले. त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई करावी़
-टॉवर चौक ते अजिंठा चौफुलीपर्यंत बंदी असताना या चौकात अवजड वाहन आलेच कसे? सकाळी १० वाजेपर्यंत, रात्री ७.३० वाजेनंतरच अवजड वाहनांना प्रवेश आहे. सायंकाळी ६ वाजेदरम्यान वाहन आले असतानाही पोलीस झोपले होते का ?
-आधीच्या व आताच्या सत्ताधाºयांमध्ये कुठलाही फरक नसून, आता जनआंदोलनाची गरज आहे. काहींनी जनहित याचिका तर काहींनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरींपर्यंत प्रश्न नेण्याची तयारी दर्शवलीे.
 

Web Title: PATH RIED Jeevar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.