८०० वर्षांचा मराठी कवितेचा प्रवास उलगडणारी संगीतमय मैफिल : अमृताहुनी गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:10 AM2018-06-17T01:10:22+5:302018-06-17T01:10:22+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘सांस्कृतिक वैभव’ या सदरात अमळनेर येथील साहित्यिक रमेश पवार यांनी कवितेचा प्रवास उलगडणाऱ्या ‘अमृताहुनी गोड’ या संगीतमय मैफिलीचा घेतलेला आढावा.

Musical film adaptation of 800 years of Marathi poetry: Amruthunini God | ८०० वर्षांचा मराठी कवितेचा प्रवास उलगडणारी संगीतमय मैफिल : अमृताहुनी गोड

८०० वर्षांचा मराठी कवितेचा प्रवास उलगडणारी संगीतमय मैफिल : अमृताहुनी गोड

Next



‘परिवर्तन जळगाव’ या संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती होती. नाटक, साहित्य असं सतत कामं करणारी संस्था म्हणून परिचित आहेच. नाटकासोबतच संगीतामध्येदेखील त्यांचं काम पाहून थक्क झालो. अडीच तास सुरू असलेली संगीतमय मैफिल इतकी मोहक होती की कोणीही पाणी प्यायलापण जागचं हललं नाही. ह्या मैफिलीचे सूर मनात अजून रुंजी घालताहेत.
पूज्य साने गुरुजी पवित्र स्पर्शानं पावन अमळनेर नगरीत मानवतावादी मूल्य आशयावर संवाद आणि आपल्यातील कला-गुणांना व व्यक्त होण्यास एक संधी उपलब्ध व्हावी, युवकांना आनंदी जगण्याचं नि लढण्याचं बळ मिळावं या हेतूने खान्देशस्तरीय युवा श्रमसंस्कार छावणी शिबिर २८ ते ३१ मे दरम्यान अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आले.
विविध कार्यक्रमांतर्गत ३० मे सायंकाळी रोजी ‘परिवर्तन जळगाव’ निर्मित ‘अमृताहुनी गोड’ या ८०० वर्षांचा प्रवास उलगडणारा काव्यमैफिलीचा बहारदार कार्यक्रम सादर झाला.
कविता हा आदिम वाङ्मय प्रकार आहे. माणसाला माणूसपण प्राप्त झाल्यावर माणूसपणाच्या आविष्कारात पाहिल्यांदा जी अभिव्यक्ती झाली ती कविता असं मानलं जातं. सर्व भाषांमध्ये कवितेला प्रदीर्घ आणि अखंड परंपरा आहे. ह्याच कल्पनेमधून ८०० वर्षांच्या मराठी भाषेचा शोध घेणं ही कल्पनाच सुंदर पण अवघड आहे.
हर्षल पाटील यांची संकल्पना व दिग्दर्शनातून साकारलेली ही मैफिलची सुरुवात झाली ती रंगकर्मी शंभू पाटील यांच्या मधाळ रसाळ ओघवत्या निवेदनातून. चक्रधर स्वामींच्या लीळाचरित्रातील ‘हत्तीच्या दृष्टांताने’ आणि मग भजन, अभंग, ओवी, शाहिरी पोवाडे, लावणी, गाणी आणि कविता यांची सुरेल मैफिल. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, चोखोबा, जनाई, सावता, कान्होपात्रा, शेख महंमद, फादर स्टीफन या साºयांच्या रचनांनी प्रत्येक टप्प्यावर एक उंचीचा प्रवास. केशवसुत, बालकवी, महानोर बोरकर, कुसुमाग्रज, भालचंद्र नेमाडे, विंदा करंदीकर, आरती प्रभू, अशोक कोतवाल, अशोक सोनवणे, रमेश पवार आणि मुक्ताई, जनाई ते बहिणाबाई यांच्या जनमनावर मोहिनी घालणाºया ओळी. नामदेव ढसाळ, मल्लीका अमर शेख यांच्या कवितेतील विविध पैलू आणि कंगोरे शंभू पाटील यांनी निवेदनातून साकार केल्याने उपस्थित्यांना एक नव्या भावविश्वात गेल्याचा आनंद झाला.
जनाईचा-धरिला पंढरीचा चोर- मंजुषा भिडे, चंदू इंगळे यांनी उतुंग आवाजातलं ‘विंचू चावला; देवा रे देवा’ एकनाथांचे भारूड, हर्षदा कोल्हटकरांनी ठसक्यात सादर केलेली महानोरांची ‘राजसा जवळी जरा बसा’, लावणीने मैफिल एका उंचीवर आणून ठेवली. सुदीप्ता सरकार यांचा धीरगंभीर बंगाली आवाज, बहिणाबाईची तावडी कविता गातो तेव्हा हा खूप विलक्षण अनुभव ठरतो. हर्षल पाटील, भूपेंद्र गुरव, मनीष गुरव, प्रतीक्षाजी, सोनाली पाटील साºयांच्या सादरीकारणाला श्रोत्यांनी प्रचंड दाद दिली. वारकरी परंपरेची कवाडे खुली झाली. मराठी नवप्रवाह ते बंडखोर कवितांचा विशालपट श्रोत्यांसमोर उभा राहिला.
मराठी, हिंदी, बंगाली, उर्दू असे सारे भाषा प्रकार, त्यांची आदान प्रदान, जात-पात-धर्म-पंथ या पलीकडे जाऊन पूज्य साने गुरुजींनी आंतरभारतीची संकल्पना आणि तिची बलस्थाने यांचा अनोखा संगम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून जीवनमूल्याचा एक संदेश पेरण्याचं कार्य या कर्मभूमीत घडलं.
सादरीकरण उत्तरोत्तर रंगत गेलं. शंभू पाटील यांचं सूत्रसंचालन आणि कलावंतांचं सादरीकरण एक पर्वणीच. आजपर्यंत मुंबई, पुणे येथील खूप कार्यक्रम पाहिले, पण आपल्या मातीमधील कलावंतांचा कलाविष्कार हादेखील इतका सुंदर नव्हे, तरे काकणभर सरस असतो ही किती आनंददायीं गोष्ट आहे . परिवर्तनने हा घडवलेला बदल खान्देशी अभिमानाचा विषय आहे. खरंच प्रतिभावंत माणसं, कवी जन्मात येतात तेव्हा गावाची देहू नि आळंदी होते.
-रमेश पवार, अमळनेर

Web Title: Musical film adaptation of 800 years of Marathi poetry: Amruthunini God

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.