गहाणवटीचा ऐवज- डोके (५)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:46 AM2018-06-13T00:46:37+5:302018-06-13T00:46:37+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात साहित्यिक प्रा.अनिल सोनार यांचा विशेष लेख गहाणवटीचा ऐवज- डोके.

Mortgage Interest - Head (5) | गहाणवटीचा ऐवज- डोके (५)

गहाणवटीचा ऐवज- डोके (५)

Next

हिंदी चित्रपटसृष्टीला उर्फ बॉलीवूडला बंगाली, मराठी इत्यादी चित्रपटसृष्टीहून कमअस्सल का मानली जाते, काही कळत नाही. वास्तविक एका सुसंकृत, सज्जन माणसात जे जे गुण असतात, ते सर्व या सृष्टीतल्या लोकांमध्ये असतातच. नुसते असतात असे नाही तर अगदी खच्चून भरलेले असतात. उदाहरणार्थ देवभोळेपणा, ईश्वरावरच असीम श्रद्धा.
सिनेमावाल्यांचा कामाचा भार
देवदेवतांवरच असतो,
मोलकरणी ‘सीता’ बाय,
तर नोकर ‘रामू’ काका असतो
यामुळे होते काय की ओठांना सतत देवदेवतांचे स्मरण राहाते. आता प्रामाणिकपणा या गुणाबद्दल बघू. प्रामाणिकपणात नट्या आघाडीवर असतात. त्यांच्या सौंदर्याचं रहस्य कशात आहे हे त्या कधीच दडवून ठेवत नाहीत. त्यावरून कळतं की-
अभिनेत्रींच्या सौंदर्याचं जन्म रहस्य विविध साबणांमध्ये असतं,
म्हणून तर साबणांच्या जागी त्यांच्या आईवडिलांचं नाव नसतं
अर्थात हा त्यांचा प्रामाणिकपणाही गोंधळात टाकणारा असतो. सिनेसृष्टी म्हणजे जाहिरातींवर उभी असलेली इमारत. तिथे-
जाहिरातींच्या कसबावर
बैलसुध्दा राहातो गाभण
सौंदर्य रहस्य म्हणून सांगते
प्रत्येक नटी वेगळाच साबण.
यामुळे गडबड अशी होते की, सौंदर्योत्सुक तरुणी ते सगळेच साबण खरेदी करून आणतात आणि वापरतातही. पण होते असे की, प्रत्येक साबण बहुदा असा विचार करतो की, ‘तो साबण तिला सुंदर करेलच, मग मी कशाला.’ या भानगडीत त्या तरुणींचे सुंदर व्हायचे राहूनच जाते.
खरं बोलणं, सत्यवादी असणं, हा एरवीही तसा दुर्मिळच गुण, पण या सृष्टीत तो सढळपणे आढळतो. एक अभिनेत्री समोरून येताना दिसताच मी माझ्या सिनेपत्रकार मित्राला म्हणालो, ‘ती बघ सत्यवादी नसणारी खोटारडी अभिनेत्री’ त्यावर हसून माझा मित्र म्हणाला, ‘ती पूर्णपणे खोटं बोलणारी नाहीये.ऐक-
ती अभिनेत्री खरंसुद्धा
बोलून जाते अधून-मधून,
मी विचारलं, ‘विवाहित’?
ती म्हणाली, ‘अधून-मधून’
ती तरी काय करणार बिचारी. माझ्या या अति उत्साही पत्रकार मित्रासारखे नट्यांच्या संदर्भात कायम उत्सुक असणारे पत्रकार काय विचारतील आणि काय लिहितील, सांगता येत नाही. माझा हा पत्रकार मित्रच घ्या-
नटीबद्दल उत्साह दाखवणार नाही
मग तो पत्रकार कसला,
तिच्या लग्नाच्या बातमीबरोबरच
पुत्रप्राप्तीबद्दलही लिहून बसला
जिद्द हाही मोठा गुण इथल्या मंडळींमध्ये असतो. एकेकाळी प्रदीपकुमार, भारतभूषण इत्यादी ठोकळेबाज मख्य चेहऱ्यांनीही एका मागोमाग एक चित्रपट गाजवले होते. इकडे महंमद रफी गायचा, तिकडे भारत भूषणचा ‘बैजू’ हीट व्हायचा. जमाना बदलला तरी आपल्या चेहºयाला अभिनयाचा स्पर्शही होऊ न देणारे हिरो आजही आहेत. फरक आहे तो या नव्यांच्या जिद्दीत. त्यांच्या अभिनयाला उंची गाठून देण्याच्या क्तृप्त्यात कसे ते बघावं.
नटाने आपल्या अभिनयाला
शेवटी उंचावर नेलेच.
डोंगरावर युनिट नेऊन
शिखरावर शुटींग केले.
निर्जिव अभिनय म्हणणाºयांना
त्याने चोख उत्तर दिले.
निर्जिव चेहरा तसाच ठेवून
मरण दृष्य ‘जिवंत’ केले.

-प्रा.अनिल सोनार

Web Title: Mortgage Interest - Head (5)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.