सांस्कृतिक श्रीमंती जपणारे जळगावचे व.वा वाचनालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 03:42 PM2019-07-03T15:42:33+5:302019-07-03T15:42:54+5:30

१४२ वर्षांची परंपरा असलेल्या जळगाव येथील व.वा. वाचनालयाचा वर्धापन दिन १ जुलै रोजी साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर वाचनालयाचा जळगावच्या जडण-घडणीत असलेला सहभाग, वाचनालयाला मान्यवरांनी दिलेल्या भेटी, सांस्कृतिक परंपरा, वाचनालयाचे सर्वांगीण उपक्रम याचा ज्येष्ठ पत्रकार तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय पाठक यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत घेतलेला आढावा.

Jalgaon University Library | सांस्कृतिक श्रीमंती जपणारे जळगावचे व.वा वाचनालय

सांस्कृतिक श्रीमंती जपणारे जळगावचे व.वा वाचनालय

Next

माणसाच्या विचारांचे, अनुभवांची प्रतिबिंबे दाखवणारे आरसे म्हणजे पुस्तके होय असे म्हटले जाते. पुस्तकेच आपले खरे गुरू, मार्गदर्र्शक असतात. आज माहिती विस्ताराच्या मायाजालात, प्रचंड गतीने होत असलेल्या संशोधनाच्या काळात, शिक्षणाच्या विस्तारात नवी माहिती ही शब्दबध्द होत आहे, ग्रंथबध्द होत आहे. गतकाळाची माहिती देण्याचे, वर्तमानात मार्गदर्शन करण्याचे आणि भविष्याचा वेध घेण्याचे काम या पुस्तकांच्या माध्यमातूनच होते. माणसाला वैचारिक उंची आणि बौद्धिक खोली या पुस्तकांमुळेच प्राप्त होते. ही उंची आणि खोली देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वाचनालये करत असतात. जळगावच्या वल्लभदास वालजी वाचनालयाने गेली १४२ वर्षे हे कार्य करत जळगावची सांस्कृतिक श्रीमंती वाढवली जपली.
या व. वा. वाचनालयाची स्थापना १ जुलै १८७७ मध्ये झाली. त्यावेळी लहानशा जागेत झाली. त्यावेळी या वाचनालयाचे नाव ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ असे होते. सुरुवातीला या लायब्ररीचे केवळ दहा सभासद होते.
या नेटिव्ह शब्दातच पारतंत्र्याची खूण होती. या लायब्ररीला मोठी नवी इमारत असावी या कल्पनेला तत्कालिन कमिशनर पोलन यांच्यामुळे चालना मिळाली. प्रारंभी १९०९ मध्ये लॅमिग्टन टाऊन हॉल-सध्याचे टिळक सभागृह उभे राहिले. या वाचनालयाच्या प्रारंभीच्या जडणघडणीत कै.आबाजी राघो म्हाळस, कै.अण्णाजी रंगो रानडे, कै.केशव महादेव सोनाळकर आणि कै.हरी विष्णू कोल्हटकर यांचा मोठा वाटा असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर व.वा. वाचनालयास जिल्हा वाचनालय म्हणून मान्यता मिळून वार्षिक अनुदान सुरू झाले. कालांतराने गरजेनुसार वाचनालयाचा विस्तार करण्यासाठी १९६४ मध्ये हरिभाऊ पाटसकर यांच्या हस्ते नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ पार पडला आणि इमारत उभी राहिली. गरजेनुसार विस्तारत गेली.
महाराष्ट्रातील बहुतेक मान्यवर साहित्यिकांची, विव्दानांची व्याख्याने वाचनालयात होऊ लागली आणि वाचनालय हे जळगावचे खऱ्या अर्थी सांस्कृतिक केंद्र बनले. जळगावकरांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाददेखील मिळू लागला. १९५५ मध्ये केशवसुतांचा पन्नासावा स्मतिदिन मोठ्या प्रमाणात या वाचनालयाने साजरा केला. यावेळी झालेल्या कविसंमेलनाचे आणि परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी विंदा करंदीकर होते. ग्रंथालय परिषदेचे अधिवेशन घेण्याचा मानदेखील या वाचनालयाने घेतला होता. १९६७ मध्ये जळगाव जिल्ह्यातील साहित्यिकांना एकत्र आणून साहित्य संमेलन प्रथमच घेण्यात आले. इतकेच नव्हे तर राज्य नाट्य स्पर्धेतदेखील वाचनालयाने वेळोवेळी सहभाग घेत पारितोषिके पटकावली.
वाचनालयाने १९७८ मध्ये वसंत व्याख्यानमाला सुरू केली आणि जळगावकरांना वैचारिक मेजवानी मिळू लागली. वाचनालयाबाहेरचे मैदान हे श्रोत्यांना कमी पडू लागले.
विठ्ठलराव गाडगीळ, श्री.ज.जोशी, अमरेंद्र गाडगीळ, कॉम्रेड डांगे, सेतू माधवराव पगडी, ग.प्र.प्रधान यांच्यासारखे अनेक साहित्यिक, वक्त्यांनी या व्याख्यानमालेला लावलेली हजेरी ही मोठी जमेची बाजू ठरली. १९९६ मध्ये राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट वाचनालयाचा आंबेडकर पुरस्कार या वाचनालयाने पटकावला. महाराष्टÑातील बहुसंख्य साहित्यिक, कलावंत यांनी या वाचनालयास भेट दिली आहे.
या वाचनालयाने आयोजित केलेल्या व्याख्यानमाला, राज्य नाट्य स्पर्धेत घेत असलेला सहभाग, शालेय विद्यार्थ्यांसाठी एकांकिका स्पर्धेंचे आयोजन, १९९९ पासून सुरू झालेली महाविद्यालयीन स्तरावरील कै.काकासाहेब अत्रे स्मृती वादविवाद स्पर्धा आज राज्यातील एक प्रतिष्ठेची वादविवाद स्पर्धो समजली जाते. वाचनालयाने मुले व मुली यांच्यासाठी स्वतंत्र अशी अद्ययावत अभ्यासिका सुरू करून अभ्यासासाठी जागा नसलेल्या दोनशेवर मुलांची सोय केली आहे.
दोन सुसज्ज वातानुकूलित हॉलमध्ये सतत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. त्यामुळेच आज जळगावचे व.वा.वाचनालय हे सांस्कृतिक मानबिंदू ठरले आहे.
-विजय पाठक, जळगाव

Web Title: Jalgaon University Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.