जळगाव मनपा निवडणूक : भाजपात गेले नाही म्हणून हद्दपारीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:14 PM2018-07-17T12:14:37+5:302018-07-17T12:15:25+5:30

विधानसभेत मुद्दा उपस्थित

Jalgaon Municipal Election: Notice of Deportation for not going to the BJP | जळगाव मनपा निवडणूक : भाजपात गेले नाही म्हणून हद्दपारीची नोटीस

जळगाव मनपा निवडणूक : भाजपात गेले नाही म्हणून हद्दपारीची नोटीस

Next
ठळक मुद्दे‘राष्टÑवादी’च्या अश्विनी देशमुख यांची अजित पवार यांच्याकडे तक्रार

जळगाव : मनपा निवडणुकीत भाजपाकडून घाऊक पक्षांतराचा मुद्दा राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दुसऱ्यांदा विधानसभेत उपस्थित केला. सोमवारी कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोलतांना त्यांनी जळगावमध्ये राष्टÑवादी कॉँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी देशमुख या भाजपात गेल्या नाहीत, म्हणून भाजपा नेत्यांनी त्यांचे पती विनोद देशमुख यांना पोलिसांमार्फत हद्दपारीची नोटीस पाठविल्याचा सनसनाटी आरोप केला आहे.
मनपा निवडणूक १ आॅगस्ट रोजी होत आहे. या निवडणुकीत भाजपाकडून राष्टÑवादी कॉँग्रेस, खाविआ व इतर पक्षातील नगरसेवकांना प्रवेश देण्यात आला. पक्षांतरामुळे चारच नगरसेवक राष्टÑवादी काँग्रेसकडे राहिले. राष्टÑवादीच्या नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला नाही, म्हणून अश्विनी व त्यांचे पती विनोद पंजाबराव देशमुख यांच्यावर खोटा ३०७ गुन्हा दाखल केला. त्यानंतर विनोद देशमुख यांना भाजप नेत्याने पोलिसांच्या माध्यमातून हद्दपारीची नोटीस बजावली आहे. या नोटीसीची प्रत अजित पवार यांनी सभागृहात सादर करीत खळबळ उडवून दिली.
जळगावच्या राजकारणाविषयी विधानसभेत, काय म्हणाले अजित पवार?
राजकारण कोणत्या स्तराला चाललेय याचे जळगावमधील एक उदाहरण..भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नाही म्हणून माझ्यावर व पतीवर खुनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला, त्यानंतर दोन वर्षासाठी हद्दपारीची नोटीस काढली, अशी तक्रार राष्टÑवादीच्या नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी केली आहे. सध्या जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक सुरु आहे. तेथील भाजपाच्या एका नेत्याने राष्टÑवादी, मनसे व इतर नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करावा म्हणून बैठक बोलावली. त्या बैठकीला अश्विनी देशमुख गेल्या नाहीत. त्यामुळे कुठे तरी त्या नेत्याचा ‘इगो’ दुखावला. राष्टÑवादीचे इतर नगरसेवक पक्षात आले, मात्र अश्विनी देशमुख आल्या नाहीत. म्हणून त्यांना व त्यांच्या पतीला हजर नसलेल्या गुन्ह्यात अडकविले. त्या भांडणाचे, घटनेचे व्हीडीओ रेकॉर्डींग, सीसीटीव्ही पोलिसांकडे आहे. त्यात कुठेच अश्विनी व त्यांचे पती दिसत नाही. आणि त्यांच्यावर ३०७ चा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. त्या घटनेत कुठेही गंभीर दुखापत नाही. जिल्हा रुग्णालयाचे प्रमाणपत्रही किरकोळ दुखापतीचे आहे. तरीही कलम कमी केलेले नाही, कारण त्या गुन्ह्यात विनोद देशमुख यांना जामीन मिळू नये, आणि पराभूत व्हावे असे कटकारस्थान केले.
विधीमंडळात पुढे बोलताना अजित पवार म्हणतात, भाजपाच्या एका नेत्याने ३० लाख रुपये आणि निवडणुकीचा खर्च अशी आॅफर दिली. त्यात तथ्य आहे. दिलीप वळसे पाटील तुम्हाला पण माहिती आहे, अनेक लोक पक्ष सोडून मनसेचे पण गेले, राष्टÑवादीचे गेले... अश्विनी देशमुख यांनी मला पत्र दिले आहे. यासंदर्भातील फोटो, व्हीडीओ अध्यक्षांना व्हॉटस्अ‍ॅप व इमेल केले आहेत. विनोद पंजाबराव देशमुख यांना १६ रोजी हजर राहिल्यास आपल्याविरोधात चौकशीचे काम एकतर्फी पूर्ण करण्यात येईल व त्याच्या परिणामास तुम्ही जबाबदार राहाल अशी नोटीस सचिन सांगळे उपविभागीय अधिकारी, जळगाव उपविभाग यांनी काढली आहे. हे राजकारण, हे निवडणुकीचे उमेदवार व त्यांना अशा प्रकारे तडीपारीच्या नोटीसा. आम्ही पण १५ वर्ष सरकारमध्ये होतो पण अशा प्रकारचे हीन दर्जाचे राजकारण कधी केले नाही. सत्तेच्या जोरावर निवडणुका जिंका, लोकशाही मार्गाने लढा, पण निष्पाप महिलेला अशी वागणूक व पतीला तडीपारीची नोटीस काढतात ही अवस्था आहे अध्यक्ष महोदय...
विनोद देशमुखांना दिली हद्दपारीची नोटीस
जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला पाच, जळगाव शहर एक व जळगाव तालुका एक असे सात गुन्हे दाखल आहेत. त्यातील जिल्हा पेठचे तीन, जळगाव तालुका एक व जळगाव शहर एक असे पाच गुन्हे न्यायालयात प्रलंबित दाखविण्यात आले आहेत तर मविप्र व केळी आंदोलन हे दोन गुन्हे पोलीस तपासावर असल्याचे दाखविण्यात आले आहेत. २००९ व २०१० मध्ये कलम १४३, १४७ प्रमाणे, तसेच आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल आहे. २०११ मध्ये कलम १४३ प्रमाणे दोन गुन्हे, २०१३ मध्ये कलम ४५२, १४३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. २०१३ मध्ये पुन्हा ३५४ चा गुन्हा दाखल आहे. २०१८ या चालु वर्षात कलम ३०७ व कलम १४३, १४७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.यातील सहा गुन्हे राजकीय आहेत.
पोलिसांचा देशमुखांवर गंभीर ठपका...
विनोद देशमुख यांना सचिन सांगळे यांनी नोटीस बजावली आहे. त्यात म्हटले आहे की, जळगाव शहर, जिल्हा पेठ व तालुका पोलिसात आपणाविरुध्द गुन्हे दाखल असून वेळोवेळी अटक करण्यात येऊन बराच काळ जेलमध्ये राहून देखील तुमच्या वर्तनात बदल झालेला नाही. तुम्ही काही एक काम धंदा करीत नसून आपण रिकामटेकड्या साथीदारांसह फिरत असतात. तुम्ही अतिशय आडदांड व खुनशी वृत्तीचे असून रस्त्याने जाणाºया कोणासही शिवीगाळ करुन मारहाण करीत असतात. चोरी करुन मिळालेल्या पैशातून दारु पिऊन परिसरातील लोकांना दमदाटी करीत असतात, खंडणी वसूल करीत असतात. लूटमार करणे, मारहाण करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. महाराष्टÑ बॅँक कॉलनी व महाबळ परिसरात तुमच्या अशा वागण्याने परिसरातील लोकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला असून निर्भयपणे जीवन जगणे कठीण झाले आहे. कायद्याची तुम्हाला अजिबात भीती राहिलेली नाही. तुमच्या अशा वागणुकीमुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी धारणा निर्माण झाली आहे, म्हणून आपणास तडीपार का करण्यात येऊ नये? यासाठी तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येत आहे. तुम्ही मुदतीत हजर न राहिल्यास तुम्हाला काहीही सांगायचे नाही असे गृहीत धरुन एकतर्फी निर्णय घेण्यात येईल.

राष्ट्रवादी काँग्रेसची जळगावतच नव्हे तर राज्यातही ताकद कमी झाली आहे. भाजपावर बेछूट आरोप होत आहेत. अजित पवार यांनी विधानसभेत केलेल्या आरोपात काहीही अर्थ नाही. मी विनोद देशमुख यांना ओळखतही नाही. त्यांना ३० लाख रुपये कोणी देवू केले त्याचे नाव त्यांनी समोर आणावे. तडीपारीची नोटीस सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली गेली आहे. गुन्हे दाखल असल्याशिवाय ही नोटीस देता येत नाही.
-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

भाजपाच्या बैठकीला गेलो नाही, त्यामुळे काही लोकांनी तुम्हाला त्रास होईल असा सूचक इशारा दिला होता. मात्र हा त्रास इतका भयानक असेल अशी कल्पना नव्हती. माझ्या पतीला सुपारीचेही व्यसन नाही. अवैध पैसा कधी घरात आणला नाही व आमची ती परंपराही नाही. पवार घराण्यावर आमचा विश्वास आहे. काही जणांनी घरी येऊन ३० लाख रुपये व निवडणूक खर्चाची आॅफर दिली होती. ही सारी वस्तुस्थिती अजित पवार यांना सांगितली.
-अश्विनी देशमुख, नगरसेविका

मला सुपारीचेही व्यसन नाही. त्यामुळे दारु तर लांबच आहे. तसेच एकाही गुन्ह्यात मला अटक झालेली नाही. सहा गुन्हे राजकीय आहेत. त्यातील चार गुन्हे निकाली निघालेले आहेत. अशा प्रकारचे खालच्या दर्जाचे राजकारण कधी पाहिलेले नाही. मी व पत्नीने भाजपात प्रवेश केला नाही म्हणून मला हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली. सोमवारी वकीलांमार्फत म्हणणे सादर केले आहे. २३ रोजीची तारीख मिळाली आहे.
-विनोद देशमुख

Web Title: Jalgaon Municipal Election: Notice of Deportation for not going to the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.