जळगावातील जैन दीक्षार्थी वर्षाकुमारी व मधुकुमारी आज करणार आयुष्यातील शेवटची आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:25 PM2018-12-07T12:25:29+5:302018-12-07T12:27:31+5:30

१४ रोजी गुजरातमध्ये दीक्षा सोहळा

Jain dikshitari today will make the last arti | जळगावातील जैन दीक्षार्थी वर्षाकुमारी व मधुकुमारी आज करणार आयुष्यातील शेवटची आरती

जळगावातील जैन दीक्षार्थी वर्षाकुमारी व मधुकुमारी आज करणार आयुष्यातील शेवटची आरती

Next
ठळक मुद्दे८ व ९ रोजी भरगच्च कार्यक्रमसंगीतमय मंत्रोच्चारात पूजन

जळगाव : शहरातील सुरेश सुराणा यांच्या दोन्ही मुली वर्षाकुमारी व मधुकुमारी या १४ डिसेंबर रोजी गुजरातमधील शंखेश्वर या तीर्थक्षेत्रावर जैन भगवती दीक्षा घेणार असून या दीक्षा सोहळ््यानिमित्त ८ व ९ रोजी जळगाव येथे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तत्पूर्वी ७ डिसेंबर रोजी संध्याकाळी दोन्ही दीक्षार्थी बहिणींची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून संध्याकाळी श्री वासूपूज्य जैन मंदिरात त्या आपल्या आयुष्यातील भगवंतांची शेवटची आरती करतील, अशी माहिती दीक्षा महोत्सव समितीचे प्रमुख दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या दीक्षा समारंभानिमित्त दोन दिवस खान्देश सेंट्रलच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ््याविषयी माहिती देण्यासाठी गुुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दिलीप गांधी यांच्यासह सहप्रमुख महेंद्र जैन, प्रदीप मुथा, दीक्षार्थी वर्षाकुमारी, मधुकुमारी, या दोन्ही बहिणींचे वडील सुरेश सुराणा, रिकेश गांधी, प्रीतेश चोरडिया, प्रवीण छाजेड आदी उपस्थित होते.
मिरवणुकीने सुरुवात
७ रोजी संध्याकाळी दीक्षार्थी बहिणींची त्यांच्या नवीपेठेतील घरापासून ते काँग्रेस भवन समोरील श्री वासूपूज्य जैन मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. जैन दीक्षा घेतल्यानंतर आरती करता येत नसल्याने ही मिरवणूक मंदिराजवळ पोहचल्यानंतर याच मंदिरामध्ये दोन्ही बहिणी आपल्या आयुष्यातील शेवटची आरती करणार आहे.
संगीतमय मंत्रोच्चारात पूजन
८ रोजी सकाळी ९ वाजता महाधार्मिक पूजन सोहळा होणार आहे. संगीतमय मंत्रोच्चारात व वाद्याच्या गजरात हा सोहळा होणार असून यासाठी खास अहमदाबाद येथील संगीतकार व विधीकार येणार आहेत. त्यानंतर दुपारी अडीच वाजता शहरातील सर्व महिला मंडळांच्यावतीने सांझी व नाटिका कार्यक्रम होणार आहे. यामध्ये मधुकुमारी व वर्षाकुमारी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाºया नाटिका सादर होण्यासह धर्म, देव-देवता यांचेही दर्शन या कार्यक्रमातून होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
८ रोजी संध्याकाळी ७ वाजता सकल जैन संघातर्फे अभिनंदन सोहळा होणार असून या सोहळ््यासाठी माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खासदार ईश्वरलाल जैन, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संघपती दलुभाऊ जैन, भागचंद बेदमुथा, माणकचंद बेद, राजेश जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी शहरातील जैन धर्मीय संस्थासह इतरही संस्थांच्यावतीने दीक्षार्थी बहिणींचा सत्कार करण्यात येणार असल्याचे दिलीप गांधी म्हणाले.
सर्व वस्तूंचा करणार त्याग
९ रोजी सकाळी साडे आठ वाजता श्री वासूपूज्य जैन मंदिरापासून दोन्ही बहिणींची वर्षीदान मिरवणूक (वरघोडा) काढण्यात येणार आहे. या दोन्ही दीक्षार्थी संसारजीवन सोडत असल्याने या मिरवणुकीत त्या आपल्या सर्व वस्तूंचा त्याग करतील. श्री वासूपूज्य जैन मंदिरापासून मिरवणुकीस सुरुवात होऊन ती खान्देश सेंट्रल मॉल येथे पोहचेल व सकाळी ११.३० वाजता संघ स्वामीवात्सल्य हा कार्यक्रम होईल. संध्याकाळी साडे सात वाजता ‘संयम संवेदना’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये दीक्षा जीवन, त्यातील दिनचर्या, संयमाविषयी तसेच संसार सोडण्यामागील उद्देश याचे दर्शन घडणार आहे. शहरात या पूर्वी कधीही असा कार्यक्रम झाला नसेल, असा हा कार्यक्रम होईल, असेही गांधी यांनी सांगितले.
१२ रोजी जळगावातून प्रस्थान
दीक्षार्थी दोन्ही बहिणी १२ डिसेंबर रोजी जळगाव येथून शंखेश्वरकडे (गुजरात) प्रस्थान करणार असून १३ रोजी त्या तेथे पोहचतील. तेथेदेखील त्यांची १३ रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे. १४ रोजी प.पू. आचार्य विजय मुक्तीचंद्र सुरीश्वरजी म.सा. व प.पू. आचार्य विजय मुनीचंद्र सुरीश्वरजी म.सा. यांच्या सान्निध्यात मधूकुमारी व वर्षाकुमारी या दीक्षा घेणार आहे.
४० वर्षानंतर योग
जैन मूर्तीपूजक संघात तब्बल ४० वर्षानंतर जळगाव शहरात हा दीक्षा समारंभ होत आहे. त्यामुळे समाजबांधवांमध्ये चैत्यन्याचे वातावरण असून सकल जैन संघातील पदाधिकारी परिश्रम घेत आहे.
शांताई व प्रेमाई धर्म सभागृह
या सोहळ््यासाठी खान्देश सेंट्रल परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपास शांताई व प्रेमाई धर्म सभागृह असे नाव देण्यात आले आहे. दीक्षार्थी बहिणींच्या आजी शांताबाई तर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या आई प्रेमाई या दोन्ही अत्यंत धार्मिक वृत्तीच्या महिला. त्यामुळे त्यांचे नाव या मंडपास देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या सोहळ््यास उपस्थित राहण्याचे आवाहन दीक्षा महोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Jain dikshitari today will make the last arti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.