पावसाच्या दडीने जळगावच्या बाजारात मुगाच्या आवकवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 10:56 AM2018-09-13T10:56:45+5:302018-09-13T10:57:34+5:30

गहू, तांदूळ, डाळीचे भाव स्थिर

Impact on the arrival of Muga in Jalgaon market through rainy season | पावसाच्या दडीने जळगावच्या बाजारात मुगाच्या आवकवर परिणाम

पावसाच्या दडीने जळगावच्या बाजारात मुगाच्या आवकवर परिणाम

Next
ठळक मुद्देडाळींचा दिलासा८ ते १० दिवसात होणार चित्र स्पष्ट

जळगाव : जळगावच्याबाजारपेठेत उडीदाची आवक सुरू झाली असून मुगाच्या आवकवर मात्र पावसाच्या दडीने परिणाम झाला आहे. शेवटच्या टप्प्यात पावसाची आवश्यकता असतानाच गेल्या २१ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मूग उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढण्यासह बाजारपेठेतही त्याचा परिणाम जाणवणार असल्याचे चिन्ह आहे. दरम्यान, गहू, तांदूळ, डाळ यांची मागणीनुसार पुरेसी आवक असल्याने आठवडाभरापासून त्यांचे भाव स्थिर आहे.
सप्टेंबर महिन्यापासून बाजारात नवीन उडीद, मुगाची आवक सुरू होते. मात्र मुगाला शेवटच्या टप्प्यात आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने मुगाच्या शेंग्या भरण्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पिकाच्या उताºयावरही परिणाम होणार आहे. पुढील आठवड्यापासून आवक वाढण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी पावसामुळे होणारा परिणाम बाजारातही जाणवणार असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. जळगावच्या बाजारपेठेत जळगाव, धरणगाव तालुक्यासह अहमदनगर, चिखली, मेहकर, अकोला या भागातून मुगाची आवक होते. मात्र यंदा अद्यापही दरवर्षाच्या तुलनेत आवक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भावावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे थोड्याफार प्रमाणात उडीदाची आवक सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, कर्नाटकातून थोडीफार नवीन उडीदाची आवक सुरू आहे. जळगावात दररोज २०० क्विंटल उडीदाची आवक सुरू असून मूग मात्र केवळ ५० क्विंटलच्या जवळपास येत आहे.
८ ते १० दिवसात होणार चित्र स्पष्ट
भाद्रपद महिना सुरू होताच उन्हाचाही चटका वाढला असून उडीद-मुगाची आवक वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या उडीदाचा ३५०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल भाव असून मुगाला ३८०० ते ४६०० रुपये भाव मिळत आहे. कर्नाटकमधून येणाºया चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव ५००० रुपये प्रती क्विंटलपर्यंत आहेत. मात्र येता ८ ते १० दिवसात आवक व भावाचे खरे चित्र स्पष्ट होईल, असे जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी सांगितले.
गहू, तांदूळ स्थिर
मागणीनुसार धान्याची आवक सुरू असल्याने धान्य व डाळींचे भाव स्थिर आहेत. १४७ गहू २४०० ते २५०० रुपयांवर स्थिर असून लोकवन गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये, शरबती गहू २५०० ते २६०० रुपये आणि चंदोसीचे भाव ३६०० ते ३८०० रुपयांवर स्थिर आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे. तांदुळाचे भावदेखील स्थिर आहेत.
डाळींचा दिलासा
बाजारात उडीदाची आवक सुरू झाली असून पुढील आठवड्यात ती वाढण्याची शक्यता आहे. मुगाची आवक कमी असली तरी डाळींचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांना तेवढा दिलासा आहे. बाजारपेठेत मुगाची डाळ ६६ ते ७० रुपये प्रती किलोवर स्थिर असून उडीद डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलो, तूरडाळ - ५६ ते ६० आणि हरभरा डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.

Web Title: Impact on the arrival of Muga in Jalgaon market through rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.