वाकडीतील मातंग समाजाचा पहूर पोलीस स्टेशनवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:36 PM2019-03-27T22:36:31+5:302019-03-27T22:37:09+5:30

भर उन्हात लोटांगण, दिवसभर ठिय्या आंदोलन

A frontal attack on Matang Samaj's on-duty police station | वाकडीतील मातंग समाजाचा पहूर पोलीस स्टेशनवर मोर्चा

वाकडीतील मातंग समाजाचा पहूर पोलीस स्टेशनवर मोर्चा

googlenewsNext

पहूर, ता. जामनेर - वाकडी, ता. जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे बेपत्ता होऊन नऊ दिवस उलटले तरी या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले मुख्य आरोपी माजी सरंपच चंद्रशेखर वाणी यांना अटक होत नसल्याच्या निषेधार्थ वाकडीतील चांदणे कुटुंबीयांसह मातंग समाज बांधवांनी बुधवारी पहूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून दिवसभर ठिय्या आंदोलन केले. पोलीस स्टेशनमध्ये आंदोलकांचा उद्रेक होऊन डीवाएसपी ईश्वर कातकडे यांच्या अंगावर विनोदच्या पत्नीने मंगळसूत्र व बांगड्या फेकल्या. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ठिय्या सुरु ठेवण्याचा निर्णय चांदणे कुटुंबाने घेतलो.
वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे हे १९ मार्चपासून बेपत्ता असून याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र यात केवळ तिघांना अटक झाली असून मुख्य सूत्रधार माजी सरपंच चंद्रशेखर वाणी यांना अद्यापही अटक झालेली नाही. त्यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी विनोदचे भाऊ राजेंद्र, बाळू व विजय तसेच विनोदची पत्नी नंदा चांदणे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी बारा वाजता पहूर बसस्थानक परिसरातून मोर्चाला सुरुवात होऊन तो साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनवर धडकला. तेथे चंद्रशेखर वाणी मुर्दाबाद, शेखर वाणीला अटक करा, पहूर पोलीस हाय हाय... अशा घोषणांनी पोलीस स्टेशन परिसर दणाणला. आंदोलनात दीडशे ते दोनशे मातंग समाज बांधव व पदाधिकारी सहभागी झाले होते. तेथे विनोदच्या पत्नीने हंबरडा फोडत जोरजोरात डोके आपटले. हा प्रकार सुरू असताना डीवायएसपी ईश्वर कातकडे बाहेर न आल्याने आंदोलक अधिकच संतप्त झाले. विनोदच्या पत्नी थेट डीवायएसपींच्या कॅबीनमध्ये बसलेल्या कातकडेंकडे पोहचल्या. तेथे त्यांनी तपासाबाबत जाब विचारला. नातेवाईकांनी तिला बाहेर आणल्यावर मोठा गोंधळ उडाला.
डीवाएसपींवर मंगळसूत्र व बांगड्या फेकल्या
डीवायएसपी कातकडे बाहेर आल्यानंतर विनोदची पत्नी नंदा चांदणे, मुलगा तेजस, मुलगी व विनोदचा भाऊ बाळू यांनी भर ऊन्हात लोटांगण घेतले. त्या वेळी कातकडे यांनी तपास सुरू आहे, मला दोन दिवस द्या, असे आवाहन केले. मात्र चांदणे कुटुंबीय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. याच वेळी विनोदच्या पत्नीने गळ््यातील मंगळसूत्र व बांगड्या काढून ईश्वर कातकडे यांच्या दिशेने भिरकविल्या. त्यामुळे पुन्हा वातावरण चिघळले.
जलसंपदा मंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस
नऊ दिवसांपासून विनोद बेपत्ता असला तरी पोलीस मुख्य आरोपीला अटक करीत नाही. मातंग समाजावर अन्याय होत आहे. असे लहुजी संघर्ष सेनेचे नाना भालेराव यांनी आरोप केला आहे. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दबावाखाली पोलीस अधिकारी काम करीत असल्याचा आरोप विनोदचे भाऊ राजेंद्र चांदणे यांनी यावेळी केला. लहूजी सेनेचे युवा अध्यक्ष स्वप्नील सांळुखे यांच्यासह समाज बांधवांनी पोलिसांबद्दल संताप व्यक्त केला.
मुलाची प्रकृती खालावली
चंद्रशेखर वाणीला अटक करा अन्यथा त्याच्या पत्नीला किंवा नातेवाईकाला अटक होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन मधून कोणीही हलणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. उन्हात विनोद चांदणे यांच्या मुलाची प्रकृती खालावली. माझा मुलगा उन्हात मेला तरी चालेल अशी संतप्त भावना विनोदची पत्नी व्यक्त करीत होती.
चंद्रशेखर वाणीच्या घराला कुलूप
पोलीस जामनेरातील चंद्रशेखर वाणी यांच्या घरी पत्नीला घेण्यासाठी गेले मात्र घराला कुलूप असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलकांनी ठिय्या सुरूच ठेवला होता.
पोलीस आरोपीच्या संपर्कात
भर ऊन्हात दुपारी बारा पासून ठिय्या सुरू असताना चंद्रशेखर वाणीच्या पत्नीला आणण्याचे सांगून पोलिसांनी आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तपासाच्या नावाखाली पोलीस बनाव करीत असून डीवाएसपी केशवराव पातोंड व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट हे चंद्रशेखर वाणीच्या संपर्कात असल्याचा आरोप विनोदचे भाऊ विजय चांदणे यांनी केला.
दोन दिवसानंतर जळगावात आंदोलन
पहूर येथे पोलिसांनी मांतग समाजाच्या आंदोलनाविषयी गांभीर्य न दाखविल्याने जळगावात दोन दिवसानंतर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे लहूजी सेनेचे रमेश कांबळे यांनी सांगितले.
या वेळी मातंग संघर्ष समिती सल्लागार डी.बी. खरात, लहुजी संघर्ष सेनेचे रामचंद्र मगरे, जिल्हाध्यक्ष नाना भालेराव, तालुकाध्यक्ष सांडू चंदनशिव, दीपक गायकवाड, जयंत अहिरे स्वप्नील साळुंखे यांच्यासह पहूर, शेंदुर्णी, वाकोद, बिलवाडी, जंगीपुरा, पाळधी, वाकडी, जामनेर, नाचनखेडा, गोद्री, फत्तेपूर, लोंढ्री, चिलगाव, दोंदवाडा येथून समाज बांधव उपस्थित होते.
घटनेचा तपास गांभीर्याने केला जात आहे. मी स्वत: सतरा तास यासाठी काम करीत आहे. चंद्रशेखर वाणी यांच्या पत्नीला अटक करण्याची चुकीची मागणी मान्य करणार नाही. आमचा तपास सुरू आहे. डीएनए अहवालसाठी पंधरा दिवस लागतात. चंद्रशेखर वाणी यांच्या घरी पोलीस गेले पण घराला कुलूप होते.
- ईश्वर कातकडे, डीवाएसपी पाचोरा विभाग

Web Title: A frontal attack on Matang Samaj's on-duty police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव