राजकारणाचा नवा अर्थ उलगडणारी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 10:03 PM2019-04-21T22:03:09+5:302019-04-21T22:04:17+5:30

सत्ताधारी भाजपला प्रथमच आव्हानात्मक आणि संघर्षमय घडामोडींना जावे लागले सामोरे; विरोधक आक्रमक, समाजमाध्यमांमुळे राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या आश्वासनांना लगाम ; अवास्तव घोषणांचा पर्दाफाश

Elections that unify the new meaning of politics | राजकारणाचा नवा अर्थ उलगडणारी निवडणूक

राजकारणाचा नवा अर्थ उलगडणारी निवडणूक

googlenewsNext

मिलिंद कुलकर्णी
जळगाव : भारतीय लोकशाही आणि निवडणूक प्रणालीचा विचार केला असता भारतीय मतदाराने नेहमीच प्रगल्भतेने, समंजसपणे मतदान केलेले आहे. विविध जाती, पंथ, धर्म, भाषा, प्रदेश असे वैविध्य असतानाही विचार करण्याची मानसिकता एकच आहे. १९७७ आणि २०१४ या दोन निवडणुकांचा विचार केला तर त्या एका लाटेवर आरुढ होत्या. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुका या सहानुभूतीच्या भावनेवर आरुढ होत्या. यंदाची निवडणूक ही राजकारणाचा नवा अर्थ उलगडून दाखविणारी निवडणूक आहे.
यंदाची लोकसभा निवडणूक वैशिष्टयपूर्ण राहील, असे जे भाकीत वर्तविले जात होते, ते सत्यात उतरत आहे. समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावाने राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या बेफाम आश्वासने आणि बेताल विधानांची पोलखोल होत आहे. सुदृढ आणि निकोप लोकशाहीच्यादृष्टीने हे सुचिन्ह आहे. मतदारांना फार काळ मूर्ख बनवता येणार नाही, असा संदेश यातून जात आहे.
खान्देशातील नंदुरबार वगळता तिन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपने यापूर्वी यश मिळविले होतेच. जळगाव जिल्हा तर बालेकिल्ला म्हटला जातो. परंतु, २०१४ च्या लाटेचा प्रभाव आणि नंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले यश नेते आणि कार्यकर्त्यांच्या डोक्यात गेले. पक्षविस्ताराच्या नावाखाली मित्रपक्षाला दुखावण्यात आले. याचा परिणाम भाजपला या निवडणुकीत भोगावा लागत आहे.
नंदुरबारात निष्ठावंत गटाच्या डॉ.सुहास नटावदकर यांनी बंडखोरी केली. पक्षाला उमेदवार मिळत नसे, त्या काळात पक्ष वाढविण्याचे, प्रसंगी पदरमोड करुन निवडणुका लढणाऱ्या प्रामाणिक आणि निस्पृह फळीतील नटावदकर हे कार्यकर्ते होते. पर्यायी उमेदवार मिळाल्यावर निष्ठावंतांना दूर लोटले जात असल्याचा संदेश त्यांच्या हकालपट्टीतून गेला आहे. धुळ्यात चित्र वेगळे आहे. मुळात अनिल गोटे यांचे भाजपशी फारसे काही सख्य नव्हते. पूर्वीची जनसंघाची पार्श्वभूमी, भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्याशी असलेली मैत्री यामुळे गोटे यांना २०१४ मध्ये भाजपचे तिकीट मिळाले. त्यापूर्वी दोनदा ते स्वबळावर आमदार म्हणून निवडून आले होतेच. महापालिका निवडणुकीतील वर्चस्वाच्या वादावरुन गोटेंची बंडखोरी घडून आली आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाने त्यांची केलेली हकालपट्टी ही औपचारिकता ठरली होती.
जळगाव मतदारसंघात भाजपमधील उमेदवारीचा घोळ म्हणजे कळस आहे. ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘राजकारण हे सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तींचे काम नव्हे’ या वचनांना सार्थ ठरविणारे प्रकार घडले.
रावेर मतदारसंघात भाजपला शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले तर राष्टÑवादीने सक्षम उमेदवार नसतानाही जागा सोडण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत ताणून धरत ‘आघाडीधर्म’ व्यवस्थित निभावला.
लोकसभा निवडणुकीचे निकाल महिन्याने लागतील, त्या निकालाचे परिणाम हे चार महिन्यानंतर होणाºया विधानसभा निवडणुकीवर निश्चित पडतील. यंदा उमेदवारीसाठी जेवढी रस्सीखेच, संघर्ष आणि स्पर्धा दिसून आली, त्याच्या कितीतरी पट स्पर्धा विधानसभा निवडणुकीत दिसून येईल. त्या निवडणुकीचे बिजारोपण मुळात यावेळी केले जात असल्याचे निकालातून स्पष्ट होणार आहे.
अवघ्या पाच वर्षात भाजप हा पक्ष भारतीय राजकारणातील शक्तिशाली, प्रबळ पक्ष म्हणून समोर आला. परंतु, यंदाच्या निवडणुकीत या पक्षाला आव्हानात्मक गोष्टींचा सामना करावा लागला. राष्टÑीय पातळीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेच टीकेचे प्रमुख लक्ष्य आहेत. खान्देशचा विचार केला तर बालेकिल्ला किती ठिसूळ आहे हे अवघ्या दीड महिन्यात दिसून आले. कोणत्याही मतदारसंघात विनासायास प्रक्रिया झालेली नाही. संघर्ष झालाच.अर्थात याला अंतर्गत धोरणे कारणीभूत आहेत.

Web Title: Elections that unify the new meaning of politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.