एकनाथ खडसे लोकसभेच्या मैदानात..! सून रक्षा खडसेंच्या विरुद्ध लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 06:55 PM2024-01-01T18:55:25+5:302024-01-01T18:56:23+5:30

रक्षा खडसे गेल्या 10 वर्षांपासून रावेर लोकसभेचं प्रतिनिधित्व करताय.

Eknath Khadse in Lok Sabha Ground..! will fight against Raksha Khadse? | एकनाथ खडसे लोकसभेच्या मैदानात..! सून रक्षा खडसेंच्या विरुद्ध लढणार?

एकनाथ खडसे लोकसभेच्या मैदानात..! सून रक्षा खडसेंच्या विरुद्ध लढणार?

प्रशांत भदाणे 

जळगाव:- राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी स्वतः जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे ते त्यांच्या सून भाजप खासदार रक्षा खडसेंच्या विरोधात निवडणूक लढतील का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे; आणि ती म्हणजे आगामी काळात होणारी लोकसभा निवडणूक... या निवडणुकीसाठी महायुतीसोबतच महाविकास आघाडीचे नेते कामाला लागले आहेत. जागांचं वाटप, त्याचबरोबर उमेदवार कोण असेल, तो कोणत्या मतदारसंघातून लढेल यावर खल सुरू झाला आहे.

या साऱ्या भाऊगर्दीत मागे राहतील ते एकनाथ खडसे कसले... खडसेंनी आपण जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढायला तयार असल्याचं अगदी ठासून सांगितलं. या मतदारसंघात सध्या त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे खडसे सुनेविरुद्ध मैदानात उतरतील का? अशी चर्चा रंगली आहे. 

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात रावेर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला मिळावी, म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. ही जागा जर आम्हाला मिळाली तर उमेदवारीसाठी माझ्या नावाचा प्राधान्याने विचार करावा, अशी विनंती मी पक्षाकडे केली आहे आणि पक्षाने पण मला केली आहे. मी निवडणूक लढायला उत्सुक आहे, असं खडसे या विषयासंदर्भात म्हणाले आहेत. 
 
दरम्यान, रक्षा खडसे गेल्या 10 वर्षांपासून रावेर लोकसभेचं प्रतिनिधित्व करताय. मोदींचा प्रभाव पाहता त्या हॅट्रिक करायच्या मूडमध्ये आहेत. खडसेंनी उमेदवारीची घोषणा केल्यानंतर त्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, रावेर लोकसभेचे मी दोन टर्म झाले प्रतिनिधित्व करत आहे. पक्षाने मला पुन्हा संधी दिली तर मी पुन्हा याठिकाणी लढायला तयार आहे. शेवटी पक्ष याबाबत निर्णय घेईल, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

येत्या निवडणुकीत रक्षा खडसेंचा पत्ता कापला जाईल, त्यांच्या ऐवजी गिरीश महाजन उमेदवार असतील, असंही बोललं जातंय. त्यावरही रक्षा खडसेंनी म्हणणं मांडलं. गिरीश महाजन हे आमचे नेते आहेत. त्यांचे नाव जर रावेर लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार म्हणून पुढे येत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही प्रचार करू... त्यांना निवडून आणू... असं रक्षा खडसे म्हणाल्या.

दरम्यान, एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेंनी आपापली भूमिका तर जाहीर करून टाकली आहे. पण दोघांना त्यांचे पक्ष उमेदवारी देतील का? दिली तर सासरा आणि सुनेत कोण बाजी मारेल? हे पाहणं महत्वाचं असेल.

Web Title: Eknath Khadse in Lok Sabha Ground..! will fight against Raksha Khadse?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.