पारोळा येथे बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 05:47 PM2019-06-26T17:47:47+5:302019-06-26T17:49:11+5:30

पावणेतीन लाखांच्या दारूसह साहित्य जप्त, चंद्रपूर पोलिसांची कारवाई

Disrupted a fake liquor factory at Parola | पारोळा येथे बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

पारोळा येथे बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

Next

पारोळा : येथील कासोदा रोडलगत असलेल्या के.आर.नगर भागात एका बंद घरात देशी-विदेशी बनावट दारूचा कारखाना चंद्रपूर पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला. यातून सुमारे पावणेतीन लाखांची बनावट दारू व साहित्य जप्त केले. ही कारवाई २५ जून रोजी करण्यात आली.
बनावट दारू विक्रीप्रकरणी आरोपी साहेबराव अशोक देवरे रा. नाणे, ता. जि. धुळे हा चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात होता. त्याची सखोल चौकशी केली असता बनावट दारूचे खोके कुठून भरले, कारखाना कुठे आहे याबाबतची माहिती आरोपीकडून मिळाली. त्यानंतर २६ जून रोजी मध्यरात्री चंद्रपूर येथील रामनगर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक साहेबराव म्हस्के यांना आरोपीने पारोळा येथील कासोदा रोडलगत असलेल्या के.आर.नगरमध्ये एका बंद घरात देशी-विदेशी बनावट दारू तयार करण्याचा कारखाना दाखविला. प्राप्त माहितीवरून २६ रोजी मध्यरात्री पोलिस उपनिरीक्षक दीपक म्हस्के, पो.हे.कॉ. प्रशांत शेंडे, संजय चौधरी यांच्या पथकाने छापा टाकला. बंद घराचे कुलूप तोडून झडती घेतली असता भूषण ठाकरे रा. फागणे, ता.जि.धुळे (पूर्ण नाव माहीत नाही), दीपक पाटील (पूर्ण नाव, गाव, पत्ता माहीत नाही.) यांनी बनावट देशी-विदेशी दारूचा कारखाना उभारला. येथे बनावट दारू तयार करून बाटलीस संबंधित कंपनीचे बनावट बूच, कागदी लेबल लावले जाते.
या कारवाईदरम्यान १ लाख ७३ हजार २८० रुपयांच्या बनावट दारूच्या सीलबंद काचेच्या ९१२ भरलेल्या बाटल्या, १९ खोके, ७ हजार रुपये किमतीचे बनावट दारू मिक्स करण्याचे यंत्र, २० हजार रुपये किमतीचे दारू बाटलीचे बूच सील करण्याच्या दोन मशीन, इतर वस्तू असे एकूण २ लाख ६४ हजार ४०६ रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. बनावट दारू विक्री तसेच ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्याचे पो.हे.कॉ. आबा पंडित पाटील यांच्या फिर्यादीवरून वरील दोन्ही आरोपींच्या विरोधात भा. दं.वि.कलम ३२८, ४२०, ४६८, महाराष्ट्र प्रॉव्हि. अ‍ॅक्ट कलम ६५ (क), (ख), (च) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर पारोळा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांच्यासह पोलीस कर्मचा-यांना पाचारण करण्यात आले.

पारोळा पोलिस अनभिज्ञ
५०० किलोमीटरवरून चंद्रपूर येथील रामनगर ठाण्याच्या पोलिस पथकाने पारोळा येथे येऊन बनावट दारूचा कारखान्यावर कारवाई केली. सर्रास चालत असलेल्या या प्रकाराबाबत पारोळा पोलीस आतापर्यंत अनभिज्ञ कसे राहिले, अशी दबक्या आवाजात चर्चा शहरात सुरू होती.

दोन्ही आरोपी फरार
छापा टाकण्यात आला त्यावेळी जिथे हा बनावट दारूचा कारखाना सुरू होता ते घर बंद होते. त्यामुळे यातील मुख्य आरोपी सापडले नाहीत. ते गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाल्याचे समजले.

Web Title: Disrupted a fake liquor factory at Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.