Coincidence | मंगळग्रह मंदिरावर ‘नऊ’ अंकाचा योगायोग
मंगळग्रह मंदिरावर ‘नऊ’ अंकाचा योगायोग

ठळक मुद्देसोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रत्यक्ष सहभागनऊ कुंडी यज्ञात ३६ जोडप्यांचा सहभाग

अमळनेर : येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात नऊ फेब्रुवारीला आगळ्या-वेगळ्या पद्धतीने ‘नऊ’ चा धार्मिक धमाका पार पडला.
नऊ हा श्री मंगळ ग्रहाचा शुभांक आहे. या पार्श्वभूमीवर नऊ फेब्रुवारी रोजी मंदिरासमोरील नियोजित पाच मजली भव्य इमारतीच्या तळ मजल्यावर नऊ कुंडी श्री गायत्री महायज्ञ झाला. या महायज्ञात ३६ जोडपे सहभागी होते . विशेष म्हणजे याच सुमुहूर्तावर श्री मंगळ ग्रह मंदिराच्या प्रवेशद्वारा समोरील नियोजित पाच मजली इमारतीच्या ६५़ ११५ फुटी स्लॅबच्या कामासही प्रारंभ झाला .
शहरात अशा पध्दतीने पहिलाच धार्मिक विधी झाला. कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रत्यक्ष सहभाग होता. अनेक मान्यवर पूर्णवेळ सोहळा पाहण्यासाठी तर अनेक भाविक यज्ञात आहुती टाकण्यासमयी उपस्थित होते. आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील हे देखील काही वेळ यज्ञविधित सहभागी झाले होते . तर जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. सर्व सहभागी भाविकांना नेते मंडळींनी शुभेच्छा दिल्या .
मंगळ ग्रह सेवा संस्थेने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. पुष्पा भांडारकर, निवृत्त प्रा. सतीश सोनार , छोटूलाल शिंपी यांनी यज्ञविधीचे निरुपणासह संचालन केले. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी , तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गायत्री परिवाराच्या सुनेत्रा भांडारकर यांनी सहकार्य केले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन.पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम , खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, गोटू बडगुजर व मंदिरातील सेवेकऱ्यांनी यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
नऊ अंकाचाच होता बोलबाला...
३६ या अंकातील तीन आणि सहाची बेरीज नऊ होते. ३६ जोडपे म्हणजे ७२ जण. ७२ या अंकातील सात आणि दोनची बेरीजही नऊ होते . शिवाय या महायज्ञास सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी प्रारंभ झाला. यातही आठ अधिक एकची बेरीज नऊ होते. अशा रीतीने नऊ तारीख, नऊ कुंडी यज्ञ , ३६ जोडपे, ७२ जण व आठ वाजून एक मिनिटांचा मुहूर्त असा एकूणच नऊ या शुभांकाचा आगळा-वेगळा व प्रथमच धार्मिक धमाका साजरा झाला.
 


Web Title:  Coincidence
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.