चाळीसगावच्या 'कांद्याची' विदेश वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:11 PM2018-10-29T23:11:41+5:302018-10-29T23:17:16+5:30

चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची जोरदार आवक होत असून गेल्या तीन वर्षात येथील कांद्याची बाजारपेठेने नावलौकीक मिळविला आहे. येथून श्रीलंका, बांग्लादेशात कांदा निर्यात होऊ लागला आहे. दरम्यान, यंदा कांद्याला चांगला भाव मिळत असून दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांची दिवाळी सुरू झाली आहे.

 Chalisgaon's 'Onion External Affairs' | चाळीसगावच्या 'कांद्याची' विदेश वारी

चाळीसगावच्या 'कांद्याची' विदेश वारी

Next
ठळक मुद्देबाजार समितीलाही चांगलेच आर्थिक उत्पन्ननाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकºयांची पावलेही चाळीसगावकडे

जिजाबराव वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : कांद्याची 'कथा' त्याच्या भावातील चढउतारामुळे नेहमीच चर्चेत असते. कांदा कधी वांधा करतो. तर कधी शेतक-यांना उभारीही देतो. अवघ्या तीन महिन्यात येणा-या कांदा पिकाने गेल्या अडीच वर्षात चाळीसगावची नवी ओळख देऊन उत्पादक शेतक-यांना बळही दिले आहे. कांद्याने बाजार समितीला ८९ लाख ९९ हजार रुपये उत्पन्न मिळवून देतांना श्रीलंका, बांगलादेशात बाजारपेठही काबिज केली आहे. कांदा लिलाव सुरु झाल्याने अडीच वर्षात सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
एकेकाळी दुधगंगा म्हणून चाळीसगावचा मुंबईत दबदबा होता. कालौघात ही समृद्धी लोप पावली असली तरी, आता कांदा उत्पादनातही तालुक्याने आघाडी घेतली आहे. उत्पादक शेतक-यांना हक्काचे मार्केट उपलब्ध व्हावे म्हणून अडीच वर्षापूर्वी बाजार समितीच्या नागद रोडस्थित मोकळ्या जागेत कांदा लिलाव सुरु करण्यात आला. अडीच वर्षात बाजार समितीच्या गंगाजळीत कांदा मार्केटमुळे मोठी आर्थिक वृद्धी झाली आहे. दुष्काळ आणि नापिकीच्या गर्तेत रुतलेल्या शेतक-यांनाही कांद्याने हात दिला आहे.

८० टक्के उत्पन्न स्थानिक
बाजार समितीत आवक झालेल्या उत्पादनापैकी ८० टक्क्याहून अधिक कांदा हा चाळीसगाव तालुक्यात पिकवला गेलायं, हे विशेष. चाळीसगाव बाजार समितीत शेजारच्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, पाचोरा, भडगाव, धुळे येथूनही कांदा विक्रीसाठी येतो. अडीच वर्षापूर्वी तालुक्यातील शेतक-यांना नांदगाव अथवा लासलगाव मार्केट मध्ये विक्रीसाठी जावे लागत होते. मात्र स्थानिक मार्केट उपलब्ध झाल्याने उत्पादकांच्या वाहतूक खर्चात मोठी बचत होऊन वेळही वाचला आहे.
कांदा निघाला 'परदेशात'
चाळीसगावच्या कांद्याने श्रीलंका, बांगलादेशाची वारीच सुरु केली असून हजारो टन कांदा तिकडे जात आहे. याबरोबरच उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, गुजरात आदी बाजारपेठांमध्ये चाळीसगावच्या कांद्याने बस्तान बसविले आहे.
११ लाख ५७ हजार क्विंटलची आवक
बाजार समितीच्या कांदा मार्केट मध्ये गत अडीच वर्षाच्या काळात ११ लाख ५७ हजार २४१ क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली असून बाजार समितीला ८९ लाख ९९ हजार असे घसघशीत उत्पन्न मिळाले आहे. कांदा लिलाव सुरु झाल्याने बाजारपेठेचे आर्थिक गणितही वधारल्याचे व्यापारी सांगतात. गत सहा महिन्यातही कांद्याचा ओघ सुरुच असून सप्टेंबर अखेर तीन लाख ७२ हजार ८८८ क्विंटल आवक झाली आहे. सर्वाधिक दर एक हजार ३५३ रुपये क्विंटल नोंदवला गेला. अवघ्या सहा महिन्यात बाजार समितीच्या तिजोरीत २३ लाख ७८ हजाराचे उत्पन्न जमा झाले आहे.
 

Web Title:  Chalisgaon's 'Onion External Affairs'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा