‘आमदारकी’साठी गुडघ्याला बाशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 05:31 PM2019-05-07T17:31:04+5:302019-05-07T17:34:45+5:30

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांच्या तयारीला सुरुवात, दुष्काळ, पाणीटंचाईपासून तर जनतेच्या जिव्हाळ्याच्या, अभिमानाच्या विषयांसंदर्भात इच्छुकांकडून मोर्चेबांधणी

Bushing for knee for 'MLA' | ‘आमदारकी’साठी गुडघ्याला बाशिंग

‘आमदारकी’साठी गुडघ्याला बाशिंग

Next

मिलिंद कुलकर्णी
लोकसभा निवडणुकीत खान्देशातील चारही मतदारसंघात उमेदवारीवरुन मोठी उलथापालथ झाली. विधानसभेच्यादृष्टीने ही रंगीत तालीम होती. सगळ्याच राजकीय पक्षांमधील हा गोंधळ पहाता इच्छुक उमेदवारांनी आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या हालचालींची खबरबात ठेवत असताना जनतेपुढे आपण सतत कसे राहू याचा खटाटोप सुरु आहे. त्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरले जात आहेत. ही निवडणूक रोमांचक ठरेल, असे चित्र आहे.
महाराष्टÑाच्या विधानसभेसाठी आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साडेतीन महिने आता राजकीय पक्षांच्या हाती उरले आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर युती आणि आघाडीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. निकाल अपेक्षेप्रमाणे लागले तर आलबेल राहील. दगाफटका, विश्वासघात असे प्रकार घडले तर पुन्हा म्यान केलेल्या तलवारी बाहेर निघतील. एकमेकांचे उणेदुणे काढले जाईल. युती आणि आघाडीचा फेरविचार होऊ शकेल. केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास गेल्यावेळेसारखा भाजपकडे इच्छुकांचा ओढा असेल. सत्ता न मिळाल्यास काँग्रेस, राष्टÑवादीकडे इच्छुक वळतील.
गेल्या निवडणुकीचा विचार केला तर काँग्रेस, राष्टÑवादी, भाजप आणि शिवसेना या चारही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. खान्देशात २० जागांपैकी सर्वाधिक १० जागा भाजपला मिळाल्या होत्या. पाच जागा जिंकत काँग्रेस दुसऱ्या तर तीन जागा जिंकत शिवसेना तिसºया क्रमांकावर होती. राष्टÑवादी कॉंग्रेस आणि अपक्ष एका जागेवर निवडून आले होते. स्वबळ प्रत्येकाने अजमावले आहे. त्यानंतर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुकीत युती-आघाडी करुन हे पक्ष लढले आहेत. कुरबुरी झाल्या तरी युती-आघाडीशिवाय पर्याय नाही, हेदेखील धुरिणांना कळून चुकले आहे.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरुन झालेली उलथापालथ लक्षात घेऊन इच्छुक उमेदवार हे स्वत:ची प्रतिमानिर्मिती करण्यात मग्न आहेत. स्वयंभू नेते ‘सर्वपक्षसमभाव’बाळगून आहेत. या पक्षाने नाही दिले तर दुसरा...अशा भूमिकेतून प्रयत्न सुरु आहेत. जनतेची स्मरणशक्ती कमकुवत असते हे लक्षात घेऊन निवडणुकीच्या सहा महिने आघी कामाचा झपाटा लावण्याकडे इच्छुकांचा कल दिसत आहे. विद्यमान आमदारदेखील दुष्काळ, टंचाई याविषयी प्रचंड जागरुक असून प्रशासनाशी जुळवून घेत कामे मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
पाण्याचा टँकर, विहीर गावासाठी खुली करणे, कॉलनीत पाण्याचे जार पोहोचवणे, चौक, उद्यान, किल्ले यांचे सुशोभीकरण, जलसंधारण, पर्यावरण, वृक्षारोपण कार्यात सक्रीय सहभाग घेणे अशा माध्यमातून जनतेशी निकटता आणि पुढाकार यासाठी इच्छुकांची धडपड चालली आहे. हे सगळे करीत असताना राजकीय पक्षांमधील नेते, संघटनात्मक पदाधिकारी यांच्याशी संपर्क, संवाद व समन्वय राखला जात आहे. स्वत:विषयी, केलेल्या कामांविषयी ‘फाईल’तयार केली जात आहे. राजकीय पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु आहेच. सर्वेक्षण जरी अद्याप सुरु झालेले नसले तरी कानोसा घेतला जात आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून ‘मुंबई’ला जायची सगळ्यांची तयारी आहे.
यंदाची लोकसभा निवडणूक वैशिष्टयपूर्ण ठरत आहे. मतदानाचे पाच टप्पे आटोपले आणि आता केवळ दोन टप्पे उरले आहेत. विजयाचे दावे सगळे करीत असले तरी ठामपणा त्यात दिसून येत नाही. खान्देशचा विचार केला तर कोणताही उमेदवार विजयाची हमखास खात्री देताना दिसत नाही. विजयाचे गणित जुुळवताना कमी-अधिक मतदान, विविध समाजघटकांचा कल, पक्ष, युती-आघाडीअंतर्गत नाराजी, रुसवे-फुगवे असे घटक परिणामकारक ठरत असतात. गुप्तचरांचे अंदाज, सट्टाबाजाराचा कल, पक्षांतर्गत सर्वेक्षण, आकडेमोड वेगवेगळे निकाल सांगत आहेत.

Web Title: Bushing for knee for 'MLA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.