भादली हत्याकांड : संशयितांकडून उडवाउडवीचे उत्तरे व जबाबात विसंगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:46 PM2018-05-23T12:46:10+5:302018-05-23T12:46:10+5:30

दोन्ही आरोपींना ३ दिवसांची कोठडी

Bhadli massacre: Desperate answers from the suspects and incompatibility with the Jababat | भादली हत्याकांड : संशयितांकडून उडवाउडवीचे उत्तरे व जबाबात विसंगती

भादली हत्याकांड : संशयितांकडून उडवाउडवीचे उत्तरे व जबाबात विसंगती

Next
ठळक मुद्देदोन्ही संशयित म्हणाले, आम्ही निर्दोषन्यायालयात गर्दी

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २३ - तालुक्यातील भादली बु.।। येथील हत्याकांडात अटक केलेले रमेश बाबुराव भोळे (वय ६३) व बाळू उर्फ प्रदीप भरत खडसे (वय ३३) या दोघांनी पाच दिवसाच्या कोठडीत कोणतीच माहिती दिली नाही. त्यांच्याकडून उडवाउडवीचीच उत्तरे मिळाली. जबाबात मात्र विसंगती आढळून आल्याची माहिती नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे यांनी मंगळवारी न्यायालयात दिली. दरम्यान, या संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ३ दिवसांची वाढ केली आहे.
भादली येथील हॉटेल कारागिर प्रदीप सुरेश भोळे, त्यांची पत्नी संगीता भोळे, मुलगी दिव्या व मुलगा चेतन अशा चौघांची २० मार्च २०१७रोजी हत्या झाल्याचे उघड झाले होते. १४ महिन्यानंतर पोलिसांनी बाळू उर्फ प्रदीप भरत खडसे (वय ३३ ) व रमेश बाबुराव भोळे (वय ६२ ) रा.भादली बु.ता.जळगाव या दोघांना १७ मे रोजी अटक करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने या दोन्ही संशयितांना सहायक पोलीस निरीक्षक धारबळे यांनी मंगळवारी न्या.जी.जी.कांबळे यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना २५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
न्यायालयात गर्दी
भादली हत्याकांडातील संशयितांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने न्यायालयात दोघांचे नातेवाईक व बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी रमेश भोळे याची मुलगीही न्यायालयात हजर होती. कामकाज संपल्यानंतर बंदोबस्तात दोघांना नशिराबाद येथे नेण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.
दोन्ही संशयित म्हणाले, आम्ही निर्दोष
न्यायालयात हजर केल्यानंतर न्या.कांबळे यांनी दोन्ही संशयिताना नावे विचारली. त्यांनी नावे सांगितल्यानंतर तुम्हाला काही सांगायचे आहे का? असा प्रश्न न्यायालयाने दोघांना विचारला असता, आम्ही निर्दोेष आहोत, आम्ही काहीच केले नाही असे उत्तर दोन्ही संशयितांनी दिले. काही तक्रार आहे का, असे विचारले असता त्यांनी नकार दिला. त्यानंतर धारबळे यांनी गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून तपासात कमी वेळ मिळाला, आहे त्या वेळेत दोन्ही संशयितांनी कोणतीच माहिती दिली नाही. त्यामुळे सहा दिवस पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी विनंती केली. त्यावर संशयितांचे वकील आसिफ उमर शेख यांनी पाच दिवसात पोलिसांना कोणतीच माहिती मिळाली नाही. त्याशिवाय पोलिसांकडे कोणताच पुरावा नाही. त्यामुळे आता पुन्हा पोलीस कोठडीची गरज नाही. दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवावे अशी विनंती केली. सरकारी वकील आर.जे.गावीत यांनी धारबळे यांनी मांडलेले मुद्दे न्यायालयात मांडले.

Web Title: Bhadli massacre: Desperate answers from the suspects and incompatibility with the Jababat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.