'थर्टी फर्स्ट' पूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाचा 'धिंगाणा'; दुचाकीसह चारचाकीला धडक

By विजय.सैतवाल | Published: December 30, 2023 10:51 PM2023-12-30T22:51:47+5:302023-12-30T22:53:47+5:30

मद्यपी कारचालकाने बॅरिगेट उडवत दुचाकीसह चारचाकीला दिली धडक

A driver hit three two-wheelers and one four-wheeler in Jalgaon. Four people have been injured in this. | 'थर्टी फर्स्ट' पूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाचा 'धिंगाणा'; दुचाकीसह चारचाकीला धडक

'थर्टी फर्स्ट' पूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाचा 'धिंगाणा'; दुचाकीसह चारचाकीला धडक

जळगाव : मद्यधुंद अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आकाशवाणी चौकाकडे जाणाऱ्या प्रेमराज सुभाषराव वाघ (३६, रा. दहिवद, ता. चाळीसगाव) या कारचालकाने आकाशवाणी चौकानजीक तपासणीसाठी लावलेले बॅरिगेट उडवत तीन दुचाकी व एका चारचाकीला धडक दिली. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. मद्यपी कारचालकाला वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडले. ही घटना शनिवार, ३० डिसेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते आकाशवाणी चौकादरम्यान घडली. दरम्यान,  'थर्टी फर्स्ट' पूर्वीच धुमाकूळ घालणाऱ्या कारचालकाला पब्लिक मार बसणार होता, मात्र वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमराज वाघ हा जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे.  शनिवारी रात्री तो कारमधून (क्र. एमएच १२, एमएफ ९४८१) स्वातंत्र्य चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जात होता. यावेळी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेच्यावतीने आकाशवाणीनजीक बॅरिगेट लागून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्या ठिकाणी लावलेल्या बॅरिगेट्स जवळ हा कारचालक न थांबता बॅरिगेट्सला उडवून सुसाट निघाला. त्यात पुढे असलेल्या तीन दुचाकी व एका चारचाकी वाहनाला त्याने धडक दिली.

यामध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी गुणवंत देशमुख, छोटू माधव बोरसे, सिद्धी छोटू बोरसे हे  जखमी झाले. या ठिकाणी हजर असलेले वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक डी.डी. इंगोले, पोहेकॉ चंद्रकांत पाटील,  योगेश पाटील, गुणवंत देशमुख, भाऊराव घेटे, पोकॉ किरण मराठे, विजय पाटील, पंडित साळी यांनी या कारचालकाचा पाठलाग करून त्याला सर्कल जवळच पकडले. या ठिकाणी संतप्त नागरिक त्याला चोप देणार होते, मात्र वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात नेले.

सुदैवाने गर्दी कमी
कारचालकाने बॅरिगेट्सला उडविल्यानंतर एकामागे एक अशा तीन दुचाकी व एका कारला धडक दिली. ही घटना घडली त्यावेळी सुदैवाने या चौकात गर्दी कमी होती, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. 

नागरिकांचा संताप अनावर
कारचालकाने दुचाकी व चारचाकीला धडक दिल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी नागरिकांचा संताप अनावर झाला.  नागरिक कारची तोडफोड करणार होते, त्यावेळी पोलिसांनी तत्काळ कार ताब्यात घेऊन घटनास्थळावरून इतरत्र हलविलली.

पोलिसांना दमदाटी
घटनेनंतर सदर कारचालकाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात असताना त्याने आडमुठेपणा करीत पोलिसांनाही दमदाटी केली.

Web Title: A driver hit three two-wheelers and one four-wheeler in Jalgaon. Four people have been injured in this.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.