जालना शहरात १०० खाटांचे रूग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:20 PM2020-03-26T23:20:14+5:302020-03-26T23:21:41+5:30

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जालना शहरातील शासकीय रूग्णालयासमोरील इमारतीत १०० खाटांचे आयसीयू रूग्णालय होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी दिली.

Three beds hospital in Jalna city | जालना शहरात १०० खाटांचे रूग्णालय

जालना शहरात १०० खाटांचे रूग्णालय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यात मात्र अद्याप एकही रूग्ण आढळून आला नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जालना शहरातील शासकीय रूग्णालयासमोरील इमारतीत १०० खाटांचे आयसीयू रूग्णालय होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी दिली.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशातही वाढत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा सहाशेच्यावर गेला. राज्यातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. असे असतानाही जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रूग्ण सापडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या जात आहे.
जिल्ह्यात ९८८ गावे असून, ७७९ ग्रामपंचायती आहे. गावात बाहेरगावाहून आलेले नागरिक प्रशासनास माहिती देत नसल्याने १९३० आरोग्य सेविका, १४७० आशा वर्कर्समार्फेत गावांमधील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले जात आहे. जवळपास ५ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आतापर्यंत २ लाख ५० हजार ५१ कुटुंबांचे सर्वेक्षण झाले असून ८ हजार १४० लोक बाहेरगावाहून आल्याचे आढळून आले. तर १८०७ लोकांना ताप, खोकला व सर्दी असल्याचे दिसून आले. त्यांची आरोग्य केंद्रांमध्ये तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी सांगितले.
सर्दी, ताप, खोकला असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी २१७ पथकांची नियुक्ती करण्यात आली. हे पथक संशयितांच्या तपासणीबरोबरच जनजागृती करीत आहे. आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण भागात आतापर्यंत ७ लाख पॉम्पलेटचे वाटप करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आरोग्य विभागातील रिक्तपदांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत आहे. जिल्ह्यात ४१ आरोग्य केंदे्र आहे. त्यात जवळपास २९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यासह आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, इतर कर्मचा-यांची बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा सामना करताना आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ४० रुग्णवाहिकांपैकी १०८ च्या १४ रुग्णवाहिका आहे. १०८ रुग्णवाहिकेतून संशयितांना शासकीय रुग्णालयात आणण्यात येते. आरोग्य केंद्रावर प्रत्यक्ष भेटी दिल्या असता, सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी केंद्रात आढळून आल्याचे खतगावकर यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य विभागातर्फे हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला असून, १८ मार्चपासून या क्रमांकावर केवळ ५ कॉल आले आहेत.
ग्रामीण भागात जनजागृती
कोरोना आजारावर अद्यापही औषध निघाले नाही. या आजारावर मात करण्यासाठी सॅनिटायझरने वेळोवेळी हात धूणे, बाहेर न निघणे हे उपाय आहेत. याबाबत ग्रामीण भागातील रूग्णांमध्ये जागृती व्हावी, यासाठी आरोग्य विभागाने जिल्हाभरात ७७ ठिकाणी होर्डिंग, ५००० बॅर्नर, ७ लाख पॉम्पलेट वाटप केले.
आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे. त्यामुळे येणा-या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास खाजगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांनी नुकतीच खाजगी डॉक्टरांची बैठक घेतली असून, सर्व डॉक्टरांनी उपचार करण्यास होकार दिला आहे.
१५३९ खाटांची व्यवस्था : परदेशातून आले ८८ नागरिक
परदेशातून जिल्ह्यात आतापर्यंत ८८ नागरिक आले. तपासणी करून त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले. दर दोन दिवसांनी त्यांची तपासणी केली जाते. परदेशातून आलेल्यांनी बाहेर फिरू नये, असे आवाहन करण्यात आले. विलगीकरण कक्षासाठी जिल्हाभरातील १५ शाळा व महाविद्यालयांसह वसतीगृहही ताब्यात घेण्यात आले. यामध्ये १५३९ खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Web Title: Three beds hospital in Jalna city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.