जालन्यात भुसार मालाच्या दरातील चढ-उतारामुळे उलाढालीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:01 PM2019-01-07T12:01:00+5:302019-01-07T12:02:14+5:30

बाजारगप्पा : सोयाबीन, मक्याची आवक घटली असून, तुरीची आवक चांगली आहे

rate changes due to fluctuating goods in Jalna market | जालन्यात भुसार मालाच्या दरातील चढ-उतारामुळे उलाढालीवर परिणाम

जालन्यात भुसार मालाच्या दरातील चढ-उतारामुळे उलाढालीवर परिणाम

googlenewsNext

- संजय देशमुख ( जालना )

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन, मक्याची आवक घटली असून, तुरीची आवक चांगली असली तरी भावामध्ये चढ-उतार होत असल्याने त्याचा परिणाम उलाढालीवर झाला आहे. बाजरी, रबी ज्वारीच्या दरात सरासरी ३०० रुपयांची घसरण प्रतिक्विंटल झाली आहे. साखरेच्या दरातही किंचितशी वाढ झाली असली तरी मुबलक साठा असल्याने मालाला उठाव नाही. मकर संक्रांत असल्याने तिळाची आवक राजस्थान, गुजरात, पंजाबमधून मोठ्या प्रमाणावर झाली असून, घाऊक बाजारपेठेत एका किलोचा दर हे १४० रुपये असल्याचे दिसून आले. 

जालना बाजारपेठेत सध्या गव्हाची आवक शंभर पोती असून २,०५० ते २,४५० रुपये, भाव मिळत आहे. ज्वारीची आवक ३०० पोती असून, ज्वारीच्या दरात क्विंटलमागे गेल्या आठवड्याच्या तुलनेत २०० रुपयांची घट झाली आहे. बाजरीची आवक आता कमी झाली असून, दररोज केवळ २०० पोती येत आहेत. मक्याची आवक आता ५०० क्विंटलने घटली आहे. तुरीची आवक दोन हजार पोती असून, ४ हजार ६०० ते ५ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. चना डाळीच्या दरात थेट ४०० रुपयांनी घसरण झाली आहे. सोयाबीनची आवक कमी होताच यात १०० रुपयांची किरकोळ वाढ गेल्या काही महिन्यांपासून झाली आहे.

तूर डाळीतही मोठी घसरण दिसून येत असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५०० रुपयांनी भाव कमी झाले आहेत. आज तूर डाळीचे भाव ६ हजार ५०० ते ७  हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत. मूग डाळीचे ६ हजार ५०० ते ७ हजार २०० दर आहेत. मसूर डाळीत २०० रुपयांची घट झाली आहे. 

केंद्र सरकारने चालू महिन्याचा कोटा कमी केल्याने त्याचा क्षुल्लक परिणाम साखरेच्या किमतीवर होऊन शंभर रुपयांची वाढ झाली आहे. संक्रांत आठवड्यावर आली असल्याने तिळासह गुळाला मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारपेठेत चांगल्या दर्जाच्या तिळाचा दर हा  १८० रुपये किलोवर पोहोचला असून, गुळातही किंचितशी तेजी आली आहे. लातूर, विदर्भातून  गुळाची आवक चांगली असली तरी पाहिजे तेवढा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

जालना येथे गेल्या वर्षभरापूर्वी रेशीम कोष खरेदीसाठीच पहिली बाजारपेठे सुरू केली होती. त्यामुळे जालन्यासह अन्य जवळपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्नाटकातील रामनगरम् येथे जावे लागत होते. ती चक्कर वाचली असली तरी, रेशीम कोषालादेखील भाव मिळत नसल्याचे वास्तव आहे. मोसंबीची आवक नगण्य असून, पांढरे सोने अर्थात कापसाची आवकही सीसीआयच्या खरेदी केंद्रावर जेमतेमच आहे.

तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होईल, अशी आशा होती. मात्र, अद्यापही हे केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना त्यांची तूर व्यापाऱ्यांकडे विकावी लागत आहे. काही मोजक्या शेतकऱ्यांनी रबी ज्वारी पेरली असून, ती बाजारात येण्याला अजून अवकाश असल्याने ज्वारीचे दर उतरणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Web Title: rate changes due to fluctuating goods in Jalna market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.