प्रदेशाध्यक्षांची गोपनीय बैठकीतून निवडणुकीची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:35 AM2018-06-04T00:35:52+5:302018-06-04T00:35:52+5:30

: लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या प्रमुख निवडक पदाधिकाऱ्यांची राजूर येथे बैठक घेतली.

Raosaheb Danve's meeting about election policies | प्रदेशाध्यक्षांची गोपनीय बैठकीतून निवडणुकीची चाचपणी

प्रदेशाध्यक्षांची गोपनीय बैठकीतून निवडणुकीची चाचपणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या प्रमुख निवडक पदाधिकाऱ्यांची राजूर येथे बैठक घेतली. त्यात आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात मंथन करण्यासह प्राथमिक व्यूहरचना निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
राजूर येथे रविवारी एका मंगलकार्यालयाच्या लॉन्सवर ही बैठक पार पडली. ही बैठक तब्बल तीन ते सोडेतीन तास चालली. यावेळी भविष्यात शिवसेने सोबत युती झाली तरी ठीक नसता, स्वबळावर लढल्यानंतर विरोधकास नामोहरम करण्यासाठी कोणकोणत्या मुद्यांचा आधार घ्यायाचा याचा कानमंत्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उपस्थितांना दिला. एकूणच या बैठकीत निवडक आणि विश्वासू पदाधिका-यांना निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीदरम्यान सर्वांचे मोबाईल स्विचआॅफ करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अंत्यत शिस्तबध्द पध्दतीने एक, एक विषय घेऊन त्यावर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जालना लोकसभा मतदार संघात खा.दानवे हे १९९९ पासून लोकसभेवर निवडून जात आहेत. १९९९ मध्ये त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कृषीभूषण विजयअण्णा बोराडे तर काँग्रेसकडून जि.प.चे माजी अध्यक्ष ज्ञानदेव बांगर हे होते. त्यावेळी दानवे यांनी विजय मिळवला.
२००४ साली भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उत्तमसिंग पवार यांच्यात थेट लढत झाली. दानवेंनी त्यांचाही पराभव केला. २००९ च्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात आ. कल्याण काळे हे होते. त्यांनी दानवे यांना चांगलाच घाम फोडला होता. त्यावेळी दानवे हे केवळ साडेआठ हजार मतांनी विजयी झाले होते. २०१४ मध्ये दानवेंच्या विरोधात औरंगाबाद येथील काँग्रेसचे नेते कल्याणराव औताडे यांनी लढत दिली. मात्र, मोदी लाटेत दानवे हे तब्बल अडीच लाख मतांनी विजयी झाले.
या चारही निवडणुकीत शिवसेने सोबत भाजपची युती होती, हे विसरून चालणार नाही. त्यावेळी कोणी काम केले आणि कोणी केले नाही, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. आता मात्र, राजकीय परिस्थिती खूप बदलली आहे. शिवसेनेने स्वबळावर निवडणुक लढवण्याची डरकाळी फोडली आहे. त्यामुळे भाजप सतर्क न झाल्यास नवल. त्या दृष्टीने रविवारच्या बैठकीला राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र समजू शकले नाही
युती होवो अथवा न होवो
आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेने सोबत युती झाली तरी ठिक आणि न झाली तरी आम्ही आमची तयारी सुरू केली आहे. आपल्या समोर काँग्रेस आणि शिवसेना या दोन्हींचे आव्हान लक्षात घेवून राजकीयपक्ष म्हणून आम्ही तयारीला लागलो आहोत. निवडणुका या नियोजन करूनच लढवाव्या लागातत, त्यामुळे आजची बैठक बोलावली होती. त्यात आम्ही काय करणार याची प्राथमिक चाचपणी करण्याचा प्रयत्न या बैठकीतून केला आहे.
- रावसाहेब दानवे, खा. तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष

Web Title: Raosaheb Danve's meeting about election policies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.