जालना : तुझे माझ्याशी लग्न झाले नाही, तर दुस-याशीही होऊ देणार नाही, असे म्हणत एका संशयिताने तरुणीचे खासगी फोटो फेसबूकवर टाकले. टाकलेले फोटो काढण्यासाठी दोन लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून गुरुवारी अंबड तालुक्यातील शहागड पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडितेने गोंदी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. ब्युटी पार्लरमध्ये एका महिलेसोबत तिचा पती नारायण हारेर येत असे. त्यातून ओळख झाल्याने आम्ही सर्व कार्यक्रमात जायचो, सार्वजनिक फोटो काढायचो, आमच्यात बहीण भावाचे नाते होते. मात्र ,चार महिन्यांपासून नारायण हारेर हा वाईट उद्देशाने माझा पाठलाग करू लागला. माझ्याशी लग्न कर, तुझे लग्न होऊ देणार नाही, असे म्हणत वारंवार छेड काढू लागला.

एकतर माझ्यासोबत लग्न कर, मी तुझे लग्न होऊच देणार नाही, अशा धमक्या देऊ लागला. माझे लग्न इतरत्र होऊ नये म्हणून  फोटो मिक्स करून व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर अपलोड केले व माझ्या जवळच्या नातेवाइकांच्या मोबाईलवर पाठवले. व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवरील फोटो काढायचे असेल तर मला दोन लाख रुपये द्यावे. तुझ्या बापाने व मावशीने पुन्हा लग्न जमवण्याचा प्रयत्न केला तर जिवे मारण्याची धमकी दिली. बदनामीमुळे मी गुपचूप राहिले. असे फिर्यादीत नमूद आहे. नारायण प्रल्हादराव हारेर  याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक विकास कोकाटे तपास करत आहेत.

लग्नही मोडले
पीडित तरुणीचे १२ नोव्हेंबरला ढाळज  (जि. अहमदनगर ) येथे लग्न जमले होते. मात्र नारायण हारेर याने मुलाकडील नातेवाइकांना पीडितेचे संगणकाच्या साहाय्याने मिक्स केलेले फोटो दाखवले. त्यामुळे तीचे लग्नही मोडले. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.