जरांगे आक्रमक, फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले; अंतरवालीत मोठा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 02:45 PM2024-02-25T14:45:57+5:302024-02-25T15:12:55+5:30

जरांगे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज्यात जे काही चालू आहे, फडणवीसांमुळेच सुरू आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.

Manoj Jarange got up from his seat, went Sagar bungalow of Devendra Fadanvis and said; A big mess in the distance | जरांगे आक्रमक, फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले; अंतरवालीत मोठा गोंधळ

जरांगे आक्रमक, फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले; अंतरवालीत मोठा गोंधळ

मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणावरुन राजकारण होत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अंतारवाली सराटीतून जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, काही लोकांना पुढे करुन मला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मला संपवण्याचं कटकारस्थान होत आहे. त्यामुळे, आता मीच मुंबईतील सागर बंगल्यावर येतो, असे म्हणत जरांगे आपल्या जागेवरुन उठले अन् अधिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. जरांगेंना सहकाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते सागर बंगल्याकडे जातोय म्हणत ते चालत निघाले आहेत. 

जरांगे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज्यात जे काही चालू आहे, फडणवीसांमुळेच सुरू आहे. फडणवीसांच्या म्हणण्याशिवाय काहीही होत नाही. त्यामुळेच, सगेसोयरे अध्यादेश काढण्यासाठी किंवा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांचा विरोध असल्याचं जरांगे यांनी म्हटले. जरांगे यांनी आपल्या भाषणात फडणवीसांवर गंभीर आरोप करताना, तुम्हाला माझा बळी हवा आहे, मग मी सागर बंगल्याकडे येत आहे. यावेळी, मधेच माझा बळी गेल्यास मला सागर बंगल्यावर नेऊन टाका, असेही जरांगे यानी म्हटले. यावेळी, जरांगे यांनी आपल्या अंगावरील ब्लँकेट बाजुला सारुन माझ्या सलाईनच्या पट्ट्या काढून टाका, असे म्हणत जागेवरुन उठण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांना पकडून थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीही जरांगे आपल्या जागेवरुन उठले अन् अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 

फडणवीसांना माझा बळी हवा - जरांगे

"मला संपवण्याचं कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी रचलं आहे. त्यांच्याच माध्यमातून वेगवेगळी लोकं पुढे करून माझ्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. फडणवीसांना माझा बळीच हवा असेल तर मी आज त्यांच्या सागर बंगल्यावर येतो, त्यांनी मला ठार करावं. मी सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार आहे," अशी घोषणाही जरांगे यांनी केली. यावेळी, राजकीय नेत्यांची उदाहरणे देत फडणवीस हे दमदाटी आणि धाक दाखवून पक्ष आणि नेते फोडत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे. तसेच, माझ्यावर करण्यात आलेले आरोप सर्व खोटे असून त्यांनी तक्रार दाखवा मी तुमचं ऐकेन, असेही म्हटले. 

माझ्याविरुद्ध महिलेची एकही तक्रार नाही

माझ्याविरुद्ध महिलेची एक जरी तक्रार सापडली तर तुम्ही म्हणेन ते ऐकेन. गेल्या ३० वर्षात कुठेही माझ्याविरुद्ध महिलेची एक तक्रार असेल तरी मी तुम्ही सांगाल ते ऐकेल, असे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात लक्ष नाही घालून शकत, वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा नाही आणू शकत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी आपल्याविरुद्ध मोठा कट रचला जात असल्याचे म्हटले. माणसं पाठवून मला बदनाम केलं जात असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. 

फडणवीसांनी नेत्यांना संपवलं

देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे जातीजातीत भांडणं लावणं आणि जातीजातीच्या नेत्यांना संपवणे असंच आहे. बहुजन, मराठा आणि ओबीसी संपला पाहिजे, हा त्यांचा डाव आहे, असे म्हणत जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला. तसेच, मला राजकीय देणं घेणं नाही, मला फक्त मराठा समाजाला आरक्षणासाठी लढायचं आहे. माझा बळी घ्या पण सगेसोयरेची अंमलबजावणी करुनच घेणार, सागर बंगल्यावर आंदोलन करायला येणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं. 

Web Title: Manoj Jarange got up from his seat, went Sagar bungalow of Devendra Fadanvis and said; A big mess in the distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.