जालना : १०० टक्के बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:40 AM2018-08-10T00:40:15+5:302018-08-10T00:40:23+5:30

जालना शहरासह तालुक्यात सकल मराठा सामाजाच्या वतीने आयोजित चक्का जाम आंदोलन गुरूवारी शांततेत पार पडले. शहरातील हॉटेल अंबर, एमआयडीसी येथे आंदोलन करणारे आणि पोलीस आमने-सामने आले होते. दोन्ही ठिकाणी सौम्य लाठीमार केल्यावर वातावरण शांत झाले.

Jalna: 100 percent off | जालना : १०० टक्के बंद

जालना : १०० टक्के बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरासह तालुक्यात सकल मराठा सामाजाच्या वतीने आयोजित चक्का जाम आंदोलन गुरूवारी शांततेत पार पडले. शहरातील हॉटेल अंबर, एमआयडीसी येथे आंदोलन करणारे आणि पोलीस आमने-सामने आले होते. दोन्ही ठिकाणी सौम्य लाठीमार केल्यावर वातावरण शांत झाले. सकाळी ९ वाजेपासून चक्का जाम आंदोलनास अंबड चौफुली येथून प्रारंभ झाला. त्यानंतर ठरल्या प्रमाणे मंठा चौफुली, चंदनझिरा, मत्स्योदरी महाविद्यालय- नागेवाडीसह जालना तालुक्यातील जामवाडी, गुंडेवाडी, गोंदेगाव, वाघ्रूळ, माळशेंद्रा जामवाडी, रामनगर, वीरेगाव येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी भजन, भारूड आणि पोवाड्यांनी वातावरणात उत्साह भरला होता. जालना शहरात प्रारंभी मराठा समाजातील युवकांनी मोठी मोटार सायल रॅली काढली. जय भवानी..जय शिवाजी... आरक्षण आमच्या हक्काचे, एक मराठा लाख मराठा.. या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. गांधीचमन येथेही मंडप उभारून ठिय्या आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे अंबड चौफुली येथील आंदोलनात महिला व युवतींची मोठी उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आंदोलना दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. आंदोलन हे अहिंसक मार्गाने होणार असल्याची घोषणा आधीच संबंधितांनी केली होती.
ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यात शहरासह वरुड बु, सिपोरा, अंभोरा, माहोरा, जानेफळ, चिंचखेडा, देऊळगाव उगले, कुंभारी, टेंभुर्णी, नळविहरा, खांमखेडा, अकोला देव, यासह मुख्य रस्त्यावर दिसेल त्या पाटीवर हजारोंच्या संख्येने सकल मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक ठिकाणी टायर पेटवून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
सकल मराठा समाजाकडून देण्यात आलेल्या बंदच्या हाकेत जाफराबाद शहरात सर्व दुकाने बंद ठेवत व्यापारी बांधवांनी मराठा समाजाच्या मागणीस पाठिंबा देण्यात आला. आंदोलन शांततेत सुरु असताना काही हिंसक प्रवृत्तीच्या आंदोलकांनी एका दुकानावर केलेलली दगडफेक वगळता जाफराबाद तालुक्यात बंद शांततेत पाळण्यात येऊन निषेध नोंदविण्यात आला. गुरूवारी शिवाजी चौकात सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आंदोलन केले गेले.
घनसावंगी बंद
घनसावंगी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात गुरूवारी घनसावंगी तालुक्यातील सर्व जण उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद होती.
तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी, चिंचोली, घनसावंगी शहर, रांजणी, राणी उंचेगाव येथील व्यापारी संस्थाने व हॉटेल्स व भाजी मार्केट बंद होती. एकूणच घनसावंगी तालुक्यात बंद शांततेत पार पडला.
परतूर तालुक्यात कडकडीत बंद
परतूर : तालुक्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद पाळण्यात आला असून, ठिकठिकाणी रास्ता रोको, युवकांचे मुंडण, शासनाचा निषेध करण्यात आला, मात्र हे सर्व करत असताना कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याने शांततेचेही दर्शन झाले, हे विशेष.
माराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी बंद ची हाक देत विविध मार्गांनी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सकाळ पासूनच बाजारपेठेतील दुकाने उघडलीच नाहीत, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये बंद होती. रेल्वे स्थानकात व बसस्थानकात प्रवासी नसल्याने शुकशुकाट दिसून आला. तहसील परिसर बँकांचा नेहमी गजबजलेला परिसर निर्मनुष्य होता. जालना - मंठा रोडवर यज्ञापूर, वाटूर फाटा, या राज्य रस्त्यावर सकाळी ९ वाजल्यापासून रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांच्या घोषणांनी शहर दुमदुमले...
मंठा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी पाहाटे पासूनच शहर कडकडीत बंद करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्यावरून पुकारण्यात आलेल्या आंदोलनात मंठा शहरासह तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मराठा बांधवाच्या वतीने मोर्चे, ठिय्या-आंदोलन, रास्ता रोको, उपोषण इत्यादी प्रकारे आंदोलन केले. राज्य सरकारकडून नुसत्या 'पोकळ वसा'आश्वासनांचा भडीमार चालू आहे. राज्य सरकारच्या निषेधार्थ मंठा तालुका सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने राजे संभाजी महाराज चौकात 'ठिय्या आंदोलन करून शासन विरोधी घोषणा देत आंदोलन केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी कडक शिस्तीचे दर्शन घडवत आंदोलन शांततेत केले.
अंबडमध्ये सर्वत्र चिडीचूप शांतता
अंबड : तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी पुकारण्यात आलेले चक्का जाम आंदोलन शांततेत पार पडले. गुरुवार हा अंबड शहराचा आठवडी बाजाराचा दिवस असतानाही सर्वत्र चिडीचूप शांतता दिसली. रस्त्यांवर दुचाकींची तुरळक वर्दळ वगळता अघोषित संचारबंदी लागू आहे की, काय असे चित्र दिसून आले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारचा निषेध करत तब्बल ११०० तरुणांनी रस्त्यात मुंडण करुन घेतले. विशेष म्हणजे महिलांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनात भाग घेतल्याने आंदोलनाची दाहकता वाढली.
भोकरदनमध्ये शंभर टक्के प्रतिसाद
भोकरदन : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ सकल मराठा समाजाच्या वतीने गुरूवारी सकाळी सुरू केलेले चक्का जाम अंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले, असून भोकरदनच्या इतिहासात पहिल्यांदाच बाजारपेठेत आणि रस्त्यावर शुकशुकाट दिसला.
सकाळी ८ वाजेच्या दरम्यान शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार घालून गौरी शिंदे, सुखदा जाधव, मयुरी जाधव, आयुषा जिवरग या मुलीनी शिवप्रतिमेचे पूजन केले. आरक्षणासाठी झालेल्या शहिदांना श्रध्दांजली अर्पण करून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली.
बदनापूरसह तालुक्यात आंदोलनाचे लोण
बदनापूर : शहरासह तालुक्यातील अनेक गावातील फाट्यांवर सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, मुंडण आंदोलन करून शंभर टक्के बंद यशस्वी केला.तसेच अत्यंत महत्वाचा असलेला जालना ते औरंगाबाद हा महामार्ग बंद करण्यात आल्याने गुरूवारी संपूर्ण रस्त्यावर शुकशुकाट होता.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला बदनापूर तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आंदोलकांच्या वतीने जालना-औरंगाबाद महामार्गावर बदनापूर, रोषणगाव फाटा, शेलगाव, खादगाव फाटा, बाजार गेवराई, वरूडी अशा विविध ठिकाणी रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, मुंडण आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो युवकांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात घोषणा देत मराठा आरक्षण देण्याची मागणी केली.

Web Title: Jalna: 100 percent off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.