कमी खर्चात गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:05 AM2018-04-03T01:05:36+5:302018-04-03T16:26:28+5:30

बदलत्या वैश्विक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येकाला कमी खर्चात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सोमवारी येथे केले.

Get high quality education at a low cost | कमी खर्चात गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे

कमी खर्चात गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बदलत्या वैश्विक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येकाला कमी खर्चात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सोमवारी येथे केले.
पद्मभूषण डॉ. बद्रीनारायण बारवाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराजा अग्रसेन फाऊंडेशनच्या वतीने अग्रसेन भवनमध्ये उच्च शिक्षणावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री आ. राजेश टोपे, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, माजी आयुक्त कृष्णा भोगे, महिकोचे राजेंद्र बारवाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. काकोडकर म्हणाले, की उच्च शिक्षणाची सद्यस्थिती गंभीर आहेच. मात्र, सगळे काही सरकारनेच करावे आणि आपण केवळ बघ्याची भूमिका घ्यावी, हे योग्य नाही. यामुळे प्रगती होणार नाही. लोकसहभागातून पुढे होऊन सर्वांनी मिळून काम केल्यास या सर्व क्षेत्रात चांगली स्थित्यंतरे दिसून येतील. शिक्षण क्षेत्रातील बदल करताना प्रस्थापितांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. बदलत्या वेगवान तंत्रज्ञानाचे आव्हान आहे. लोकशाहीतील मतप्रवाह लक्षात घेऊन आपणास काम करावे लागेल. रिअ‍ॅक्टिव्ह होण्यापेक्षा प्रोअ‍ॅक्टिव्ह झाले पाहिजे. २६ कोटी शालेय विद्यार्थ्यांना ८५ लाख शिक्षक तर साडेतीन कोटी उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना १५ लाख शिक्षक असा देशातील शिक्षणाचा पसारा असल्याचे त्यांनी सांगितले. उच्च शिक्षणाचा आजचा दर्जा घसरल्याने ४० टक्के विद्यार्थी रोजगारासाठी पात्र तर ६० टक्के अपात्र ठरत आहेत. तरुणांमध्ये नैराश्याचे वातावरण असून, पंजाबमधील समस्या तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या हे त्याचेच परिणाम असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आजच्या शाळा आणि कॉलेजची रचना कालबाह्य ठरण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना हवा असेल तो अभ्यासक्रम आणि विषय निवडण्याची सुविधा निर्माण व्हायला हवी. भाषेचा अडथळा न येतो, हवे ते घटक उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे. देशात कोचिंग क्लासेसचे ४१ लाख कोटींचे अर्थकारण असून, ते शैक्षणिक बजेटइतके असल्याचे ते म्हणाले. निवृत्त प्राचार्य डॉ. रामलाल अग्रवाल प्रास्ताविक केले. परिसंवादास महिकोच्या कार्यकारी संचालिका डॉ. उषा झेर, उद्योजक सुनील रायठठ्ठा, प्राचार्य जवाहर काबरा, प्राचार्य डॉ. राजेंद्र गायकवाड, प्राचार्य कविता प्राशर, प्रा. बी. वाय. कुलकर्णी, कृषीभूषण विजयअण्णा बोराडे, प्रा. सुरेश लाहोटी, सुरेश अग्रवाल, कवयित्री रेखा बैजल, नारायण बोराडे, दिलीप अर्जुने, शिवाजी मदन, नानासाहेब देशमुख यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, वकील, विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
माजी आयुक्त भोगे : उच्च शिक्षणाचा दर्जा कमालीचा घसरला
समाज व्यवस्था बिघडल्यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा घसरल्याचे स्पष्ट मत माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांनी व्यक्त केले. आजच्या शैक्षणिक परिस्थितीबाबत त्यांनी गांभिर्यपूर्वक विचार मांडून, अपेक्षित बदल सूचविले.
कंत्राटी पद्धतीने काम करणारे प्राध्यापक दोनशे रुपये रोजंदारीवर शिकवण्याचे काम करतात. दारिद्र्य रेषेखाली खरे लाभार्थी तेच आहेत. उच्च शिक्षणावर सरकारचे लक्ष नसल्याचे भागे यांनी परखडपणे नमूद केले.

Web Title: Get high quality education at a low cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.