जळगाव बाजारात वाढत्या थंडीमुळे सुका मेव्याला मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:50 AM2019-01-03T11:50:37+5:302019-01-03T11:50:48+5:30

बाजारगप्पा : महागड्या सुक्या मेव्याची खरेदी सर्वसामान्य नागरिकांकडूनही होताना दिसून येत आहे.

Demand for dry fruits due to rising cold in the Jalgaon market | जळगाव बाजारात वाढत्या थंडीमुळे सुका मेव्याला मागणी 

जळगाव बाजारात वाढत्या थंडीमुळे सुका मेव्याला मागणी 

googlenewsNext

- हितेंद्र काळुंखे ( जळगाव )

जळगावच्या बाजारपेठेमध्ये या सप्ताहात धान्याचे दर जवळपास स्थिर असून, सध्या थंडी वाढल्याने लोकांचा पौष्टिक आहाराकडे कल वाढला असून, सुका मेव्याची मागणी वाढली आहे. असे असतानाही आवक चांगली असल्याने भाव वधारले नाहीत.

भारतात सुका मेव्याची ८० टक्के आवक ही अफगाणिस्तानातून होत असते. तर काजू हे भारतातही उत्पादित होतात. काजूचे भाव ११०० ते ४००० रुपये प्रतिकिलो असून, कॅलिफोर्नियातूनही काजूची आवक होते. दिवाळीपासून सुक्या मेव्याला चांगली मागणी असल्याची माहिती व्यापारी अजय डेडिया यांनी दिली. आता ही मागणी अधिकच वाढली असून, दिवाळीपासून दर जवळपास स्थिर आहेत. बदाम ७६० ते ८००, गोडंबी ८०० ते ९००, राजापुरी खोबरा २८० ते ३२०, पिस्ता २००० ते २४००, मनुके २६० ते ६४०, अंजीर १००० ते २०००, अक्रोड ६०० ते ८००, अक्रोड सोललेले १४००,  खारीक २८० ते ३२०, खजूर ४२० ते १८०० याप्रमाणे प्रतिकिलो भाव असून, या महागड्या सुक्या मेव्याची खरेदी सर्वसामान्य नागरिकांकडूनही होताना दिसून येत आहे.

नवीन डाळी आणि तांदळाची आवक सुरू असून, ग्राहकांकडून हा माल खरेदीस साधारणत: पुढील आठवड्यात वेग येण्याची शक्यता जळगाव दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी वर्तविली आहे. 
शहरात प्रामुख्याने छत्तीसगड, मध्यप्रदेशसह गोंदिया, तुमसर या भागातून नवीन तांदूळ येऊ लागला आहे. याचे भाव गेल्या आठवड्याप्रमाणेच असून, नवीन चिनोर तांदळाचे भाव ३००० रुपये प्रतिक्विंटल आहे. जुन्या चिनोर तांदळाचे भाव ३४०० रुपये प्रतिक्विंटल आहे. तांदळाची आवक आणखी काही दिवसांत वाढण्याची शक्यता असून, तेव्हा दर थोडे कमी होऊ शकतात, असा अंदाजही व्यापारी व्यक्त करतात.

गेल्या आठवड्यात मुगाच्या डाळीचे भाव ७००० ते ७४०० रुपयांवर होते. ते आता थोडे उतरले असून, ६५०० ते ७००० इतके झाले आहेत. उडदाच्या डाळीचे भाव ६००० ते ६३००  रुपये प्रतिक्विंटल कायम आहेत. हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६००० ते ६४००  रुपयांवरून ५८०० ते ६२०० इतके झाले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी तूर डाळीच्या भावात वाढ झाली होती. मात्र आता हा दर ७००० ते ७४००  रुपये प्रतिक्विंटलवरून ६५०० ते ७२०० इतका झाला आहे. जळगावच्या बाजारपेठेत जळगाव, धरणगाव तालुक्यासह अहमदनगर, चिखली, मेहकर, अकोला या भागातून मुगाची आवक होते तर उडदाची जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, कर्नाटकातून आवक होत असते. मात्र, यंदा पावसाच्या कमी प्रमाणामुळे सर्वच ठिकाणाहून येणाऱ्या मालाची आवक घटली आहे. 

सध्या गव्हाचे दर किंचित घसरले आहेत. १४७ गहू २६५० ते २७५०  रुपये प्रतिक्विंटलवरून २५५० ते २६०० इतक्या दरावर आला आहे. तसेच लोकवन गहू २५५० ते २६०० रुपयांवरून २४०० ते २५०० इतक्या दराने विक्री होत आहे. ज्वारी, बाजरी तसेच रबी ज्वारीचे भाव या आठवड्यात स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Demand for dry fruits due to rising cold in the Jalgaon market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.