परिसर स्वच्छतेत रमले न्यायाधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:05 AM2017-12-11T00:05:12+5:302017-12-11T00:05:59+5:30

एरव्ही न्यायदानाच्या कामात व्यस्त असणारे न्यायाधीश चक्क हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छतेत रमले. मग वकील, न्यायालयीन कर्मचारी, नागरिकांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेत संपूर्ण न्यायालयाचा परिसर स्वच्छ केला.

Cleaning in court area | परिसर स्वच्छतेत रमले न्यायाधीश

परिसर स्वच्छतेत रमले न्यायाधीश

googlenewsNext

जालना : येथील जिल्हा न्यायालयाच्या परिसरात रविवारी सकाळी वेगळे वातावरण पाहायला मिळाले. एरव्ही न्यायदानाच्या कामात व्यस्त असणारे न्यायाधीश चक्क हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छतेत रमले. मग वकील, न्यायालयीन कर्मचारी, नागरिकांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेत संपूर्ण न्यायालयाचा परिसर स्वच्छ केला.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश नीरज धोटे यांच्या संकल्पनेतून या स्वच्छताविषयक उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. प्रधान न्यायाधीशांसह जिल्हा न्यायाधीश अनघा रोटे, न्या. एन. पी. कापुरे, न्या. जयश्री पुलारे, न्या. वेदपाठक, न्या. मिश्रा, न्या. बागडे, न्या. पवार, न्या. सोनी आदींनी सकाळी न्यायालयात आल्यानंतर हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छतेला सुरुवात केली. सकाळी नऊ ते एक या वेळेत राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात सर्व न्यायालयीन परिसरातील प्लॅस्टिक वेचण्यात आले. गवत काढण्यापासून तर कचरा भरण्यापर्यंतच्या कामात प्रत्येकजण व्यस्त असल्याचे पाहावयास मिळाले. चार तासांच्या या स्वच्छता मोहिमेत सर्व न्यायालयीन इमारतींचा परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता अभियानातून संकलित केलेला सर्व कचरा नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी घंटागाड्यांमध्ये भरून डंपिंग ग्राऊंडवर नेऊन टाकला. जिल्हा सरकारी वकील विपुल देशपांडे, सहायक सरकारी अभियोक्ता दीपक कोल्हे, अ‍ॅड. वाल्मिक घुगे, कैलास रत्नपारखे, बी. एम. साळवे, अ‍ॅड. तारेख, वकील संघाचे अध्यक्ष एस.एम. चाटे आदींसह दीडशे न्यायालयीन कर्मचा-यांनी या स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला.

Web Title: Cleaning in court area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.