शिवरायांच्या जयघोषाने उत्साह...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 01:06 AM2019-02-20T01:06:23+5:302019-02-20T01:06:29+5:30

रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची ३८९ वी जयंती मंगळवारी मोठ्या उत्साही वातावरण आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.

Celebretaion of Shivaji maharaj jayanti | शिवरायांच्या जयघोषाने उत्साह...

शिवरायांच्या जयघोषाने उत्साह...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची ३८९ वी जयंती मंगळवारी मोठ्या उत्साही वातावरण आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. सकाळपासून युवकांमध्ये उत्साह संचारला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विविध संस्था, संघटनांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊ जय शिवराय, वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श प्रत्येकाने कृतीत उतरविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सार्वजनिक मिरवणुकीच्या शुभारंभ प्रसंगी केले. शिवछत्रपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गांधी चमन येथून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
सकाळी उत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. दुपारी ४ वाजता गांधीचमन येथे शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उद्योजक संजय खोतकर, भास्कर दानवे, माजी आ.अरविंद चव्हाण, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, तहसीलदार बिपीन पाटील, डॉ.संजय लाखे पाटील, इक्बाल पाशा, शेख महेमूद, अंकुश राऊत, विजयकुमार पंडित, दिगंबर पेरे, विश्वास भवर, उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष देविदान, कार्याध्यक्ष रवींद्र राऊत, अंकुश पाचफुले, सचिव अ‍ॅड.रवींद्र डुरे, विमल आगलावे, प्रा.मनीषा भोसले, शीतल तनपुरे, आयेशा खान, रसना देहेडकर, दिनकर घेवंदे, प्रा.राजेंद्र भोसले, राजेंद्र राख, सतीश जाधव, खंडेश जाधव, रमेश अग्रवाल, विलास तिकांडे, गणेश गुजर, इलियास लखारा आदींची उपस्थिती होती.
मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. तर गोविंद गर्जना ढोल पथक आणि प्रयाग शाळेच्या चिमुकल्यांनी लेझीम पथकावर धरलेला ठेका सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. इक्बाल पाशा, अंकुश राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र भोसले आणि आशिष रसाळ यांनी केले तर अंकुश पाचफुले यांनी आभार मानले.
शहिदांना श्रध्दांजली...
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्सव समितीच्या वतीने प्रारंभी शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. देश दु:खात असल्याने मान्यवरांच्या स्वागत समारंभास फाटा देऊन केवळ छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेले भगवे रूमाल देण्यात आले.

Web Title: Celebretaion of Shivaji maharaj jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.